जयंतरावांच्या खेळीला चंद्रकांतदादांचे उत्तर : कॉंग्रेसचे नऊ नॉट रिचेबल  - Election for the post of Mayor of Sangli Municipal Corporation tomorrow | Politics Marathi News - Sarkarnama

जयंतरावांच्या खेळीला चंद्रकांतदादांचे उत्तर : कॉंग्रेसचे नऊ नॉट रिचेबल 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या सत्तेचा व्हीप सध्या तरी सत्ताधारी भाजपच्या बाजूने वाजत आहे.

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या सत्तेचा व्हीप सध्या तरी सत्ताधारी भाजपच्या बाजूने वाजत आहे. मात्र, मंगळवारी होणाऱ्या महापौर पदासाठीच्या निवडणुकीनंतरही हा व्हीप आपल्याच बाजूने राहावा यासाठी भाजपने आपल्या सदस्यांना व्हीप बजावला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या समोर सांगलीतील महापालिकेची सत्ता राखणे मोठे आवाहन असणार आहे. भाजप नेते गाफील राहिल्याचा फायदा जयंत पाटील यांनी घेतला असल्याची चर्चा आहे.

त्याच बरोबर विरोधी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीनेही आपल्या सदस्यांना व्हीप बजावला आहे. भाजपने आमराई क्‍लब येथे अर्ज दाखल करण्याच्या दिवशी झालेल्या बैठकीत आपल्या नगरसेवकांना व्हीप (पक्षीय आदेश) बजावला आहे. तसेच प्रसार माध्यमातूनही व्हीपची जाहिरात दिली आहे. तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीनेही आपल्या नगरसेवकांना व्हीप बजावला आहे. 

प्रत्येक सदस्याने आपल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारास मतदान करणे बंधनकारक केले आहे. यामध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्र व्हीप बजावला असला तरी त्यांनी "व्हीप'मध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने संयुक्‍तपणे ठरवून दिलेल्या महापौर, उपमहापौर पदाच्या उमेदवारांना मतदान करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. 

शरद पवार विधानसभेच्या गॅलरीत पुन्हा बसले नाहीत... त्याला ५४ वर्षे आज झाली...
 

या अधिनियमांचा भंग केल्यास सदस्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम 1986 (1987) चा महाराष्ट्र अधिनियम क्र. 20 चा (3) नुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे आता कोणत्या पक्षाचे सदस्य व्हीपच्या दबावाने आपल्या उमेदवारांना मतदान करतील आणि कोण विरोधात करणार हे उद्याच मतदानानंतर स्पष्ट होईल. 

नॉट रिचेबल सदस्यांची धाकधूक

भाजपचे नऊ सदस्य अर्ज दाखल करण्याच्या दिवशीपासून नॉट रिचेबल आहेत. त्यातील दोघेजण शनिवारी भाजपच्या गोटात सामील झाले. मात्र, अद्याप सातजण संपर्कात नाहीत. त्याचबरोबर कॉंग्रेसचेही नऊ सदस्य नॉट रिचेबल होते. त्यामुळे हे सदस्य उद्या महापौर, उपमहापौर मतदानावेळी कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष आहे. पण, संपर्कात नसलेल्या सदस्यांना व्हीप मिळाला की नाही, त्यांनी पाहिला की नाही हे प्रश्‍न उपस्थित होत असल्याने प्रसार माध्यमातून जाहिरात देऊन तीनही पक्षांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्र कोरोनामुक्त हवा तर पोलिसांनी सक्ती करावीच!

सत्ताधारी भाजपचे नॉट रिचेबल सदस्य राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात मतदान करतील की गैरहजर राहतील की तटस्थ राहतील याबाबत चर्चा रंगली आहे. तर कॉंग्रेसचे नॉट रिचेबल सदस्य कोणती भूमिका घेणार ते गुलदस्त्यात आहे. मात्र व्हीपमुळे नॉटरिचेबल सदस्यांमध्येही धाकधूक आहे. 

मतदान कसे होणार?

महापौर निवडीसाठी प्रथमच ऑनलाईन ऍपद्वारे म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मतदान होत असल्याने उत्सुकता आहे. यामुळे प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहण्याची आवश्‍यकता नाही. मात्र सदस्याने आपले मोबाईल, लॅपटॉप पुर्ण चार्जिंग करुन ठेवावेत. जेथे रेंज येऊ शकते तेथे थांबावे. सदस्याने जो मोबाईल क्रमांक दिला आहे, त्यावर सभेची लिंक दिली जाणार आहे. त्या लिंकवरुन सदस्य सभेला उपस्थित राहू शकतात. हात वरुन मतदान करण्याचे आहे.

काय कारवाई होऊ शकते?

पक्षाचा आदेश अर्थात व्हीप डावलून जे सदस्य विरोधात मतदान करतील त्यांच्यावर सदस्यत्व रद्द होण्याची कारवाई होऊ शकते. मात्र त्याविरोधात 30 दिवसात विभागीय आयुक्तांकडे दाद मागावी लागते. तेथे सुनावणी पुर्ण झाल्यानंतर निकालाविरोधात नगरविकास मंत्र्यांकडे अपील करता येते. तेथे सुनावणी पुर्ण होऊन निकाल लागल्यानंतर तो मान्य नसल्यास त्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागता येते. त्यामध्ये किती काळ जाणार हे सांगता येत नाही. शिवाय निकाल लागेपर्यंत सदस्यत्व रद्द होत नाही.

Edited By - Amol Jaybhaye
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख