शरद पवार विधानसभेच्या गॅलरीत पुन्हा बसले नाहीत... त्याला 54 वर्षे आज झाली... - sharad pawar never seen agaian in Gallery of Vidhansabaha | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवार विधानसभेच्या गॅलरीत पुन्हा बसले नाहीत... त्याला 54 वर्षे आज झाली...

योगेश कुटे
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

बारामती विधानसभा मतदासंघातून 22 फेब्रुवारी 1967 रोजी शरद पवार हे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. 

पुणे : एक तरुण विधीमंडळाचे कामकाज पाहण्यासाठी मुंबईत जातो. विधानसभेत आमदार मंडळी कसे बोलतात, हे ऐकण्यासाठी प्रेक्षक गॅलरीत बसतो. या गॅलरीत बसण्याचे काही नियम असतात. येथे खुर्चीवर बसल्यानंतर पायावर पाय टाकणे संकेतात बसत नाही. पण या तरुणाने नेमकी तीच कृती केली. तेथील सुरक्षारक्षकाने त्याला तसे न करण्यास बजावले. तरी तीच चूक त्या तरुणाने पुन्हा केली. अखेरीस त्या रक्षकाने त्या तरुणाला बाहेर काढले. त्या तरुणाने तेव्हाच निश्चय केला की आता परत या इमारतीत परतेल ते आमदार म्हणूनच! हा किस्सा आहे तो राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा. त्यांनी त्यांची प्रतिज्ञा पूर्ण केली आणि आमदार म्हणूनच परत विधानसभेत आले.  गॅलरीत बसण्याचा त्यांच्यावर कधीच प्रसंग आला नाही. ते कोणत्या ना कोणत्या सभागृहाचे सदस्य म्हणूनच कार्यरत राहिले. 

शरद पवार हे आजच्या दिवशी म्हणजे 22 फेब्रुवारी 1967 रोजीच पहिल्यांदा आमदार म्हणून बारामतीतून निवडून आले. बारामती आणि पवार हे जे समीकरण सुरू झाले ते आता 54 वर्षे उलटली तरी कायम आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून एकाही निवडणुकीत पराभव न होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा आणि लोकसभा अशा चारही ठिकाणी सदस्य म्हणून काम केलेल्या मोजक्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. चार वेळी मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, तीन वेळा केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवास आतापर्यंत झाला. त्याची सुरवात 22 फेब्रुवारी 1967 रोजी झाली.  

या पहिल्या निवडणुकीत त्यांना काॅंग्रेसची उमेदवारी मिळण्याचा किस्साही अफलातून आहे. पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी ज्येष्ठ व्यक्तींना उमेदवारी द्या. पवार नवखे आहेत. असा दावा करत होते. परंतु पवारांचे विद्यार्थी काँग्रेसचे काम, संघटन, संयम पाहिलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी पवारांचाच आग्रह धरला. 'बारामतीची एक जागा गेली असं समजा' असं विरोध करणारांना सांगितलं. मग नाराज मंडळींनी काँग्रेसचा राजीनामा दिला. नाराज मंडळींसह शेकापने बाबालाल काकडे यांना पाठींबा दिला. पवार यांच्यासोबत काँग्रेसचा शिक्का होता. शिवाय स्वातंत्र्यसैनिक, तरूण कार्यकर्ते सोबत होते. बारामतीतील, पुण्यातील काॅलेजचे विद्यार्थी मदतीला आले. पवार बाजारात भाजीपाला विक्री करायचे त्यावेळच्या बाजारकरी लोकांनीही हिरीरीने प्रचार केला. पवारांना ३५ हजार तर काकडेंना १७ हजार मते मिळाली. जिल्ह्यात सर्वात जास्त फरकाने पवार निवडून आले. त्यानंतर सतत विधानसभा असो की लोकसभा निवडणूक बारामतीतून त्यांचा विजय ठरलेलाच होता. दर वेळी त्यांचा संघर्ष हा काकडे कुटुंबाशी होत होता. तेव्हाचा काकडे आणि पवार असा संघर्ष आता नाही. गेल्या वर्षीचे सतिश काकडे हे पवारांच्या गोविंदबाग या बारामतीतील निवासस्थानी जाऊन भेटून आले.

शरद पवार हे 1967, 1972, 1977, 1980, 1985, 1990 अशा सलग सहा विधानसभा निवडणुकांत बारामतीतून विजयी झाले. त्या आधी 1984 च्या लोकसभा निवडणुकीतही ते विजयी झाले होते. पवार हे केंद्रात संरक्षणमंत्री झाल्यानंतर विधानसभेच्या जागेवर त्यांचे पुतणे अजित पवार यांना संधी मिळाली. त्यांनी हा मतदारसंघ पवार कुटुंबाकडे कायम राखला आहे. निवडणूक काळात स्वतःच्या मतदारसंघात उमेदवार म्हणून प्रचारालाही अजित पवार जात नाहीत, इतका हा मतदारसंघ पवार कुटुंबियांना मानतो. त्यामुळेच 22 फेब्रुवारी हे एका मोठ्या प्रवासाची छोटी सुरवात होती, याची जाणीव बारामतीकरांना नेहमीच आहे.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख