पैसे दिले नाही तर खल्लास करीन : समाजसेवक म्हणविणाऱ्या बोऱ्हाडेची खंडणीसाठी गॅस वितरकास धमकी

अनेक राजकीय नेत्यांनी त्याची फोनवरून विचारपूस करून, तसेच प्रत्यक्ष भेटून चौकशी करत पाठिंबा दर्शवला होता.
Akshay Borhade arrested in ransom case
Akshay Borhade arrested in ransom case

पुणे : जुन्नरचे माजी नगरसेवक आणि शहा ब्रदर्स एचपी गॅसचे वितरक रूपेश प्राणलाल शहा यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी शिवऋण संस्थेचा संस्थापक अध्यक्ष, तथाकथित समाजसेवक अक्षय मोहन बोऱ्हाडे यास पोलिसांनी अटक केली. अक्षय बोऱ्हाडे याने शहा यांच्या विरोधात पुरवठा विभागाकडे माहितीच्या अधिकारात अर्ज केला होता. पैशासाठी तगादा लावून त्यांना ‘पैसे दिले नाही, तर खल्लास करीन’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (Akshay Borhade arrested in ransom case)

दरम्यान, फेसबुक लाइव्हद्वारे समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य थेट प्रसारित केल्याप्रकरणी जुन्नरचे नगराध्यक्ष श्याम पांडे, उपनगराध्यक्ष दीपेशसिंह परदेशी, अविनाश कर्डिले यांनी बोऱ्हाडे याच्याविरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. खंडणी प्रकरणात अक्षय बोऱ्हाडे यास स्थानिक न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली असल्याचे पोलिसांनी सांगितले. उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे, पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक युवराज पाटील तपास करीत आहेत.

दरम्यान, अक्षय बोऱ्हाडे याची पत्नी रुपाली अक्षय बोऱ्हाडे (वय २४) हिनेही मोहन बोऱ्हाडे, सविता मोहन बोऱ्हाडे, अनिकेत मोहन बोऱ्हाडे (सर्व रा. शिरोली बुद्रुक) यांच्या विरोधात २ सप्टेंबर रोजी फिर्याद दाखल केली आहे. त्यात संशयित आरोपींनी हाताने, लाथा बुक्क्यांनी मारहाण करून वेळोवेळी रिव्हॉलवरचा आणि गुंडांचा धाक दाखवून शारीरिक व मानसिक त्रास दिला. आरोपी कोणते ही काम न करता शिवऋण या संस्थेसाठी आलेला निधीचा वापर स्वतःच्या चैनीसाठी करत आहे. त्या निधीचा अपहार करून वेगवेगळ्या मुलींसोबत अनैतिक संबंध ठेवून त्यांची व माझी फसवणूक करीत असल्याचे त्याच्या पत्नीने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक सोपान शिंदे या घटनेचा तपास करत आहेत.
    
दरम्यान, यापूर्वीही आळेफाटा येथील मारहाण प्रकरणात अक्षय बोऱ्हाडे काही काळ येरवडा करागृहात होता. विनापरवाना संस्थेत मनोरुग्ण आणून ठेवणे आणि संस्थेबाबत कोणतीही माहिती ग्रामपंचायत तसेच स्थानिक प्रशासनास देत नाही, अशी तक्रार आल्याने पोलिसांनी या संस्थेतील मनोरुग्णांना सुरक्षितस्थळी हलविले होते.

बोऱ्हाडे याने काही महिन्यांपूर्वी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी आपणास अमानुष मारहाण केल्याचा आरोप केला होता. स्वतः शिवभक्त असल्याचा कांगावा करून फेसबुक लाईव्ह करून अनेक  नेटकऱ्यांचा, राजकीय नेत्यांचा पाठिंबा मिळवला होता. त्याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले, खासदार संभाजीराजे छत्रपती, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, बाबाराजे देशमुख, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी त्याची फोनवरून विचारपूस करून, तसेच प्रत्यक्ष भेटून चौकशी करत पाठिंबा दर्शवला होता. 

त्यानंतर अक्षय बोऱ्हाडे याने हे प्रकरण मिटल्याची जाहीर कबुली मीडियासमोर येऊन दिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यास चांगलेच ट्रोल केले होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com