राष्ट्रवादीशी सन्मानपूर्वक आघाडी; अन्यथा २० जागांचे काँग्रेसचे लक्ष्य

गेल्या निवडणुकीत चक्क तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेलेली काँग्रेस आता कात टाकण्याच्या पवित्र्यात दिसून येत आहे.
Congress aims to win 20 seats in Ausa municipality
Congress aims to win 20 seats in Ausa municipality

औसा : नगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ न देण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी घेण्यात येत आहे. प्राथमिक स्वरूपात आघाडीला अनुकूलता असली तरी ही आघाडी पक्षाला आणि कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक आणि त्यांचे समाधान होण्यासारखी असावी, असा सूर उमटू लागल्याने औशात दूध पोळलेली काँग्रेस आता ताकही फुंकून पिताना दिसत आहे. पक्षाला आलेली मरगळ आणि विखुरलेले कार्यकर्ते एकत्र आणून पक्ष संघटन मजबूत करण्याकडे पक्ष नेतृत्वाचे लक्ष असल्याने येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसने सन्मानपूर्वक आघाडी नाही तर लक्ष वीस जागांचे हे धोरण राबविण्याची तयारी केली आहे. (Congress aims to win 20 seats in Ausa municipality)

औसा नगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली सर्वच पक्षांनी आपली राजकीय बांधणी सुरू केली आहे. भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी औशात घर करून जनमताचा कौल अजमावण्यास सुरुवात केली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गेल्या निवडणुकीत चक्क तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेलेली काँग्रेस आता कात टाकण्याच्या पवित्र्यात दिसून येत आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीची चर्चा कानावर पडत असल्या तरी गेल्या दहा वर्षांचा इतिहास पाहता आघाडी होणार असल्याच्या भरपूर वावड्या उडाल्या. मात्र, प्रत्यक्षात आघाडी झालीच नाही. ही आघाडी दोन्ही पक्षासाठी पोषक असली तरी काँग्रेस सावध भूमिकेत असल्याचे जाणवते. जर काँग्रेसला सन्मानपूर्वक आणि योग्य न्याय मिळत असेल तर हरकत नाही. मात्र, यात पक्षाचे आणि पर्यायाने कार्यकर्त्यांचे नुकसान होत असेल तर योग्य वेळी योग्य पर्यायांचा पण शोध घेतला जात असल्याचे समजते. 

जर आघाडीत पक्षश्रेष्ठीसह कार्यकर्त्यांचे समाधान होत असेल तर आघाडी नाहीतर वीस जागांवर लक्ष केंद्रित करण्याच्या हालचाली काँग्रेसकडून केल्या जात असल्याने आता एकहाती सत्ता प्रस्थापित करणारी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या या भूमिकेला कितपत न्याय देते, यावर आघाडीचे यश अपयश अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसमध्ये दोन गट 

सध्या काँग्रेसमध्ये दोन गट दिसून येत असले तरी या दोन्ही गटाला पालकमंत्री अमित देशमुख आणि माजी मंत्री बसवराज पाटील हे एका छत्राखाली केव्हा घेऊन येऊन पक्ष बळकट करतील, हे सांगणे कठीण आहे. त्यातच प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असताना औशात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार की काँग्रेसला मान्य होईल, अशी आघाडी राष्ट्रवादी करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com