बीड : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड आज अखेर समोर आले. पोहरादेवी येथे ते कुटूंबासह दाखल झाले. याठिकाणी राठोड यांनी कुटूंबासह जगदंबा मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर सेवालाल महाराज समाधीचेही दर्शन घेतले. महंत सुनील महाराज यांनी त्यांच्यासाठी तेथे हवन केला. यावरुन पूजा चव्हाणच्या नातेवाईक शांताबाई राठोड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
त्या म्हणाल्या की, ''आमचे मंत्रीमहोदय साहेब हे आज बाहेर आले आहेत. त्यांनी मोठ्या थाटामाटात पोहरादेवी गडावर होम-हवन चा सोहळा सुरू केलाय." अहो मंत्री महोदय साहेब हा सोहळा पूजाचा घात झाला म्हणून आहे का"? तिच्या जागेवर आपली मुलगी असली तर असेच केले असते का'' ? असा संतप्त सवाल शांताबाई राठोड यांनी केला आहे.
संजय राठोड यांचा बेशरमपणाचा कळस; अतुल भातखळकर यांची टीका
त्या पुढे म्हणाल्या की, ''पूजासोबत काय घटना घडल्यात याचा तुम्हाला पश्चाताप झाला पाहिजे. तुम्ही पश्चाताप करा. सेवालाल महाराज तुम्हाला माफ करणार नाही. असले कारस्थान पोहरादेवीवर करू नये. ते आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आहे. तिथे अग्नीची गादी आहे, तिथे खोट्या शपथा जमणार नाहीत. अशी संतापजनक प्रतिक्रिया राठोड यांनी पोहरादेवीवर सुरू असलेल्या कार्यक्रमावरून दिली.
दरम्यान, गोरबंजारा समाजातील मुलगी पूजा चव्हाण हीचा पुणे शहरातील वानवाडी परिसरात मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचे दुःख मला, माझ्या कुटुंबीयांना आणि संपूर्ण बंजारा समाजाला आहे. पण या घटनेनंतर माझ्यावर विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप करण्यात आले. अतिशय घाणेरडे राजकारण केले जात आहे. ते अतिशय चुकीचे आणि निराधार आहे. माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. या एका घटनेमुळे मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका, असे संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
आरोपात तथ्य नाही, मला उध्वस्त करण्याचा प्रयत्न; संजय राठोड यांचे स्पष्टीकरण...
राठोड म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. चौकशीनंतर प्रकरणातील सत्य काय ते समोर येणारच आहे. विविध माध्यमांतून माझी, माझ्या परिवाराची आणि समाजाजी बदनामी केली जात आहे. राज्यात त्याबद्दल घाणेरडे राजकारण केले जात आहे, हे दुर्देवी आहे. मी भटक्या जमातीतील व्यक्ती समाजकारणातून राजकारणात आलो. गेले ३० वर्ष मी समाजासाठी जनतेसाठी काम करतो आहे. ओबीसी समाजाचे नेतृत्व करत आहे. पण या एका घटनेवरून विविध आरोप करून मला राजकीय आयुष्यातून उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राठोड यांनी सांगितले.
Edited By - Amol Jaybhaye

