आरोपात तथ्य नाही, मला उध्वस्त करण्याचा प्रयत्न; संजय राठोड यांचे स्पष्टीकरण... - Sanjay Rathod takes press conference on pooja chavan death issue | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

आरोपात तथ्य नाही, मला उध्वस्त करण्याचा प्रयत्न; संजय राठोड यांचे स्पष्टीकरण...

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

पूजा चव्हाण मृत्युप्रकरणात झालेल्या आरोप वनमंत्री संजय राठोड यांनी फेटाळून लावले आहेत.

वाशीम : पूजा चव्हाण मृत्युप्रकरणात झालेल्या आरोप वनमंत्री संजय राठोड यांनी फेटाळून लावले आहेत. या आरोपांमध्ये तथ्य नसून मला उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्याबाबतीत घाणेरडे राजकारण सुरू आहे. माझी कुटूंबाची व समाजाची बदनामी केली जात असल्याचा खुलासा राठोड यांनी केला.

पोहरादेवी येथे राठोड यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, पूजा चव्हाण ही गोरबंजारा आमच्या समाजाची तरुणी हिचा दूर्दैवी मृत्यू झाला. त्याबद्दल संपुर्ण समाजाला दुःख झाला आहे. मी आणि आमचा पूर्ण समाज त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. राज्यात त्याबद्दल घाणेरडं राजकारण केलं जात आहे, हे दुर्देवी आहे.  मी भटक्या जमातीतील व्यक्ती समाजकारणातून राजकारणात आलो. आता ओबीसींचं नेतृत्व करत आहे. पण मला उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जे काही आरोप सध्या माझ्यावर केले जात आहे. त्यामध्ये काही तथ्य नाही. मुख्यमंत्र्यांनी चौकशी सुरू केली आहे. त्यामध्ये तथ्य काय आहे, ते जगासमोर येणारच आहे. समाजमाध्यम आणि मिडियावरून माझी, माझ्या परिवाराची आणि समाचाजी बदनामी केली जात आहे, अस राठोड म्हणाले. 
मी १४ दिवस नव्हे, तर १० दिवस मिडीयावर तुम्हा सर्वांचे प्रेम मी पाहत होतो.  वडिल, पत्नी, मुलाबाळांना सांभाळण्याची मोठी जबाबदारी माझ्यावर होती. मी ते १० दिवस टीव्ही आणि इतर मिडियावर बघत होतो. गायब नव्हतो, असे राठोड यांनी स्पष्ट केले आहे. 

माझ्या मुंबईच्या फ्लॅटवरून सर्व शासकीय कामे करीत होतो. सोशल मिडीयावर माझे जे फोटो आले. त्याबद्दल काय सांगावे. चार वेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे. माझ्यासोबत अनेक समाजबांधव भगीणी कार्यक्रमात फोटो काढतात. अनेक जण ते सोशल मिडीयावरही टाकले जातात. त्यात माझा काही दोष नसल्याचे संजय राठोड म्हणाले. 

दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड आज अखेर समोर आले. पोहरादेवी येथे ते कुटूंबासह दाखल झाले असून समर्थकांनी प्रचंड गर्दी केली आहे. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. 

परळी येथील टिकटॉक गर्ल पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर ते जनतेसमोर कधी येतात, याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली होती. अखेर आज ते समोर आले आहेत. मागील दोन दिवसांपासून ते यवतमाळातच होते. खासगी वाहनाने ते पोहरादेवी येथे काही वेळापूर्वीच दाखल झाले आहेत. समर्थकांनी याठिकाणी मोठी गर्दी केल्याने त्यांना वाट काढणेही कठीण झाले होते. याठिकाणी राठोड यांनी कुटूंबासह जगंदा मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर सेवालाल महाराज समाधीचेही त्यांनी दर्शन घेतले. 

दरम्यान, संजय राठोड यांचा जाहीर केलेला शासकीय दौरा पुढीप्रमाणे आहे. वनमंत्री राठोड सकाळी 9 वाजता श्रीक्षेत्र पोहोरादेवी येथे शासकीय वाहनाने आर्णी, दिग्रस मार्गे जाणार आहेत. सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र पोहोरागड येथे आगमन व भेट. दुपारी 1 वाजता दारव्हा तालुक्यातील धामणगाव (देव) येथील मुंगसाजी महाराज मंदिरात दर्शन. दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यलयात कोरोनाचा आढावा घेतील. हा त्यांचा शासकीय दौरा असला तरी त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक व कुटुंबीय राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात त्यांच्या नावाची चर्चा झाल्यानंतर ते प्रथम सार्वजनिकरित्या जनतेसमोर येत आहेत. पोहोरदेवी येथे त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने जमणार असल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख