माझी वेळ संपत आली आहे, असे म्हणत भाषण संपवले अन् श्वासही थांबला  - Death of a farmer leader during a speech | Politics Marathi News - Sarkarnama

 माझी वेळ संपत आली आहे, असे म्हणत भाषण संपवले अन् श्वासही थांबला 

वृत्तसंस्था
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या तीन महिन्यांपासून हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत.

अमृतसर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या तीन महिन्यांपासून हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. तीनही कृषी कायदे रद्द करा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या आंदोलनादरम्यान, अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अमृतसरमध्ये कृषी कायद्याविरोधात एक शेतकरी भाषण करत होते. भाषणाच्या शेवटी आता माझी वेळ संपत आली आहे, असे म्हणून त्यांनी आपल्या वाणीला पूर्णविराम दिला आणि दुर्देवाने काही वेळातच त्यांना मृत्यूने गाठले.  

अमृतसरमध्ये कीर्ती किसान युनियनचे प्रधान मास्टर दातार सिंग यांचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.  त्यांनी एका सभेला संबोधित केले. भाषणाचा समारोप केल्यानंतर अवघ्या काही सेकंदात सिंग यांचा मृत्यू झाला. त्यावेळी ते व्यासपीठावरच होते. उपस्थितांनी सिंग यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र,  डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

महाराष्ट्र कोरोनामुक्त हवा तर पोलिसांनी सक्ती करावीच!

अमृतसमधल्या विरसा विहारमध्ये स्वातंत्र्य सैनिक उजागर सिंग यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमाला दातार सिंग उपस्थित होते. कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाची माहिती देत त्यांनी भाषणाचा शेवट केला होता. त्याचवेळी त्यांना ह्दयविकाराचा झटका आला. 

अनेक दिवसांपासून दातार सिंग दिल्लीच्या सिमेवर आंदोलन करत होते. तीनच दिवसांपूर्वी कार्यक्रमासाठी ते अमृतसरला परतले होते. या कार्यक्रमात भाषणानंतर सिंग यांचा सत्कार करण्यात येणार होता. मात्र त्याआधीच त्यांना ह्दयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. यामुळे सिंग यांच्या कुटुंबावर आणि त्यांना मानणाऱ्या शेतकऱ्यांवर शोककळा पसरली आहे.  

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद : अशोक चव्हाणांनी घेतला हा महत्त्वाचा निर्णय..
 

दरम्यान, शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनात 248 शेतकर्‍यांनी आपला जीव गमावला. यामध्ये सर्वाधिक 202 शेतकरी पंजाबमधील आहेत. याव्यतिरिक्त हरियाणाचे 36, उत्तर प्रदेशचे 6 आणि 1-1 शेतकरी मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि उत्तराखंडमधील आहेत.

Edited By - Amol Jaybhaye

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख