निष्ठेचे खरंच फळ मिळते का ? रक्षा खडसे, प्रीतम मुंडे साईदर्शनाला आल्या अन...!

रातोरात पक्ष बदलणारे दुसऱ्या दिवशी वेगळाच झेंडा खांद्यावर घेणारे नेते आपण पाहिलेत. त्यांना पक्ष सोडताना काही लाज वाटत नाही. ते ना जनतेचा, मतदारांचा विचार करतात.
Pritam munde and raksha khadse.png
Pritam munde and raksha khadse.png

नगर : एकाच पक्षात आयुष्यभर राहणे, तत्त्व जपणे, खांद्यावर घेतलेला झेंडा कधीही खाली न ठेवणे हे दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालले आहे. तरीही संघाचा स्वयंसेवक, भाजप किंवा डाव्या पक्षाचे कार्यकर्ते सहजासहजी निष्ठा बदलत नाहीत. कॉंग्रेस किंवा इतर पक्षांत तसे चित्र दिसत नाही. 

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पक्षनिष्ठेबाबत एकदा चांगले उदाहरण दिले होते. ते म्हणाले होते, की रा. स्व. संघ, भाजपमधील कार्यकर्ते पक्ष सोडताना दहावेळा विचार करतात. त्यांची संघटनेवर जी निष्ठा असते, ती आमच्या (कॉंग्रेस) पक्षात दिसत नाही. पक्षाने पद किंवा तिकीट नाकारले की आमचे लोक नाराज होतात. ते एका रात्रीत पक्ष बदलतात. 

वास्तविक कोणताही पक्ष असो, त्या पक्षातील कार्यकर्त्याला किंवा नेत्याला घडविताना अनेक वर्षे खर्ची करावी लागतात. एका रात्रीत नेते तयार होत नाहीत. मात्र आयुष्यभर पक्षासाठी खस्ता खाऊनही न्याय मिळतोच असे नाही. काहीवेळा निष्ठावंतांवर अन्याय होतो. गेल्या पाच-सात वर्षांत महाराष्ट्रात असा एक ट्रेंड आला तो म्हणजे भाजपत प्रवेश करण्याचा. गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील वजनदार नेत्यांनी थेट भाजपत प्रवेश केला. या नेत्यांना वाटले होते की राज्यात पुन्हा भाजप-शिवसेनेची सत्ता येणार आणि भाजपचा मुख्यमंत्री होणार. पण, घडले वेगळेच. 

कोलांटउडी मारली 

शिवसेनेने भाजपचा हात झटकला आणि थेट दोन्ही कॉंग्रेसच्या सहकार्याने सत्ता स्थापन केली. जी मंडळी भाजपमध्ये गेली होती त्यापैकी काहींना तर मतदारांनी घरी बसविले. जे आयाराम होते, त्यांच्यामुळे भाजपमधील निष्ठावंतांवरही अन्याय झाला. तरीही पक्षासाठी त्यांनी तोंडावर बोट ठेवले. 

ज्यांनी पक्ष बदलला होता, त्यांना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने काय देण्याचे कमी केले होते. वर्षानुवर्षे आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा परिषद सगळी सत्तास्थाने त्यांच्याकडेच होती. दोन्ही कॉंग्रेसला बरे दिवस नाहीत म्हटल्यावर त्यांनी कोलांटउडी मारली. 

हे सर्व सांगण्याचे कारण असे की शनिवारी खासदार रक्षा खडसे आणि खासदार प्रीतम मुंडे या शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आल्या होत्या. पत्रकारांनी त्यांना बोलते केले. दोघीही भाजपच्या असल्या तरी रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आहेत. आपणास न्याय मिळत नाही, असे सांगत थेट भाजपला रामराम केला होता. 

शेवटी पक्ष सोडला 

प्रीतम मुंडेंनी पक्षनिष्ठेबाबत उदाहरण देताना मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे उदाहरण दिले. त्यांना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावले होते. ते एक दिवस उशिरा गेले, तेव्हा त्यांना मुख्यमंत्री करण्यात येणार असल्याचे सांगितले. अर्थात त्यावेळी मध्यप्रदेशमध्ये भाजपचेच सरकार होते आणि मुख्यमंत्री उमा भारती होत्या. भाजपला त्यांना हटवायचे होते. त्यांच्या जागी चौहान यांना बसवायचे होते आणि या खेळात दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा सिंहाचा वाटा होता, हे काही लपून राहिले नाही. असो. 

अदलाबदलीचे राजकारण हे प्रत्येक पक्षात होत राहते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांचे काही जमले नाही. आपण पक्षासाठी चाळीस वर्षे खर्ची केली. जेव्हा लोक दगडधोंडे मारत होते, तेंव्हा गावगावांत पक्ष नेला, असा त्यांचा दावा होता. नाथाभाऊंना पक्षानेही भरपूर दिले. आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेते केले. त्यांचे नाव झाले. हे खरं आहे. मात्र फडणवीस आणि त्यांचे जमले नाही आणि शेवट पक्ष सोडण्यात झाला. 

सत्ता स्पर्धेतून नाराजी 

कोणताही पक्ष नेत्यांवर अन्याय करीत नसतो, तर पक्षातील नेत्यांमध्ये पदांवरून संघर्ष होतो. त्यामध्ये पक्षश्रेष्ठी ज्यांच्या बाजूने त्याचे वजन वाढते आणि दुसरा कमी पडतो. पक्ष एकाला महत्त्व देतो. दुसऱ्याकडे दुर्लक्ष करतो. मग ते फडणवीस-खडसे असतील किंवा मनोहर जोशी-छगन भुजबळ असतील. भुजबळ शिवसेनेवर नाराज नव्हते. पक्षात आपल्याला जे पाहिजे ते मिळत नाही, हे लक्षात येताच त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. खडसे असतील किंवा भुजबळ, या दोन्ही नेत्यांची जडणघडण भाजप आणि शिवसेनेतच झाली होती. शेवटी या दोघांनी पक्ष सोडले. खडसे भाजप आणि भुजबळ शिवसेना सोडतील, असे कधीही वाटले नव्हते. पण, ते झाले. खडसे-भुजबळच नव्हे तर नारायण राणे, गणेश नाईक, मधुकर पिचड, शिवेंद्रराजे भोसले अशी कितीतरी नावे घेता येतील. ज्यांनी प्रारंभी आपल्या पक्षासाठी मोठे योगदान दिले आहे. 

निष्ठेपेक्षा स्वार्थाला महत्त्व 

आजचे राजकारण मात्र खूपच बदलले. त्याला विविध रंग चढले. पक्षनिष्ठेपेक्षा स्वार्थाला महत्त्व आले. रातोरात पक्ष बदलणारे दुसऱ्या दिवशी वेगळाच झेंडा खांद्यावर घेणारे नेते आपण पाहिलेत. त्यांना पक्ष सोडताना काही लाज वाटत नाही. ते ना जनतेचा, मतदारांचा विचार करतात. प्रीतम मुंडे यांनी पक्षनिष्ठेविषयी जे सांगितले, त्याचे स्वागतच केले पाहिजे. कॉंग्रेसपेक्षा भाजप आणि डाव्या पक्षातील कार्यकर्त्यांची पक्षावर अधिक निष्ठा असते, हे मान्य करावे लागेल. कितीही वादळवारे येऊ द्या ते दीपस्तंभासारखे असतात. याचा अर्थ सर्वच नेते निष्ठा बदलतात, असे नव्हे. मात्र, आजकाल पक्षनिष्ठेला काही महत्त्व राहिलेले नाही. पक्षनिष्ठेवर रक्षा खडसे बोलल्या नाहीत आणि प्रीतम मुंडे बोलल्या, याचा अर्थ ज्याने त्याने आपआपल्या परीने काढावा. 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com