साकळाई योजनेचा प्रश्न थेट संसदेत ! खासदार डाॅ. विखे पाटलांनी मागितले 500 कोटी - Question of Saklai scheme directly in Parliament! MP Dr. Vikhe Patil asked for Rs 500 crore | Politics Marathi News - Sarkarnama

साकळाई योजनेचा प्रश्न थेट संसदेत ! खासदार डाॅ. विखे पाटलांनी मागितले 500 कोटी

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 20 मार्च 2021

श्रीगोंद्यासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी नाबार्ड अंतर्गत 500 कोटींचा निधी देण्याची मागणी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी संसदेत केली.

नगर : श्रीगोंद्यासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी नाबार्ड अंतर्गत 500 कोटींचा निधी देण्याची मागणी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी संसदेत केली. 

डॉ. विखे पाटील यांनी संसदेत साकळाईचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, की साकळाई योजना अनेक वर्षांपासून रखडली आहे. गेल्या 40 वर्षांपासून शेतकरी त्यासाठी संघर्ष करीत आहेत. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेच्या सर्वेक्षणासाठी निधीची तरतूद केली होती. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने योजनेकडे गांभीर्याने पाहिले नाही. ही योजना झाल्यास या भागातील मोठा परिसर ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे या योजनेसाठी तातडीने निधी देण्याची मागणी डॉ. विखे पाटील यांनी केली. 

हेही वाचा...

सुरळीत पाणीपुरवठा करा, शेवगाव-पाथर्डी योजनेची पाहणी 

शेवगाव : जायकवाडी धरणातून शेवगाव-पाथर्डी व 54 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या खंडोबामाळ पंपहाऊस व पाण्याच्या टाकीची प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी पाहणी केली. परिसरातील स्वच्छतेसह शहरात सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. 

हेही वाचा... सहकारी संस्था आॅनलाईन

शेवगाव-पाथर्डी व 54 गावांच्या पाणीयोजनेच्या जॅकवेल व पंपहाऊसचा वीजपुरवठा थकीत बिलामुळे महावितरणने मंगळवारी (ता.16) खंडीत केला. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली. त्याची दखल घेत, प्रांताधिकारी केकाण यांनी शेवगाव-पाथर्डी पालिका व काही गावांमधून दीड कोटींची थकबाकी वसूल केली. ती काल (शुक्रवारी) जिल्हा परिषदेकडे भरली. त्यानंतर जिल्हा परिषदेने 24 लाख 60 हजार रुपये थकबाकी महावितरणकडे भरल्याने शुक्रवारी सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत केला. त्यानंतर शेवगाव-पाथर्डी व 54 गावांसाठी योजनेतून पाणीउपसा सुरू झाला. 

हेही वाचा... नगर लाॅकडाऊनच्या दिशेने

दरम्यान, खंडीत वीजपुरवठ्यामुळे शहरातील पाण्याचे नियोजन कोलमडल्याने प्रांताधिकारी केकाण यांनी आज खंडोबामाळ येथील पंपहाऊस, जलशुद्धीकरण यंत्रणेची पाहणी केली. संजय हाडेकर, अशोक झिरपे, रवी कांबळे यांनी त्यांना माहिती दिली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंचायत समितीशेजारील टाकी व परिसराची पाहणी करीत स्वच्छतेबाबत सूचना केल्या. पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन प्रभागनिहाय समप्रमाणात पाणीपुरवठा करण्याची सूचना केली.

नागरिकांच्या तक्रारी आल्यास संबंधित भागातील कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला. पालिकेने शहरातील 45 अनधिकृत नळजोड अधिकृत करुन संबंधिताकडून 1 लाख 45 हजार 453 रुपयांचा दंड जमा केला. नितीन बनसोडे, स्वच्छता निरीक्षक भारत चव्हाण, विजय जाधव, अशोक सुपारे, अशोक सुडके, अर्जुन लांडे, सुनील बोरुडे, बबन कोरडे आदी उपस्थित होते. 

अन्य योजना बंदच 

शेवगाव-पाथर्डी योजनेचा पाणीपुरवठा सुरळीत झाला, तरी शहरटाकळी, हातगाव व बोधेगाव येथील योजनांचा वीजपुरवठा पाच दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे या योजनांवर अवलंबून असलेल्या गावांतील नागरिकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख