स्वतः बोलावूनही आज मुख्यमंत्री नागपूरकर शिवसैनिकांना भेटलेच नाहीत...

शिवसेनेची तयारी तर काहीच नाही, उलट पदाधिकारी एक-एक करून सेना सोडून जात आहेत. ही विदर्भात शिवसेनेसाठी धोक्याची घंटा तर नाही ना…?
Shivsena - Uddhav Thackeray
Shivsena - Uddhav Thackeray

नागपूर : माजी जिल्हाप्रमुख व शहरातील सेनेचे अभ्यासू नेते म्हणून ओळखले जाणारे शेखर सावरबांधे Former District President Shekhar Sawarbandhe यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर शिवसेनेला गळती लागू शकते, ही शक्यता लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी नागपुरातल्या माजी व काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांना निरोप पाठवून मुंबईला बोलावून घेतले. पण शिवसेनेचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज The Chief Minister Uddhav Thackeray नागपूरकर सैनिकांना भेटलेच नाहीत, त्यामुळे ही मंडळी खिन्न मनाने नागपूरला परतण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. 

रविवारी शिवसेनेला नागपुरात मोठा धक्का बसला. जिल्हाप्रमुख राहिलेले सावरबांधे अचानक राष्ट्रवादीची वाट धरते झाले. त्यानंतर शिवसेनेत आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. लागलीच मुंबईहून या प्रकाराची चौकशी झाली. अनेकांना विचारणा झाली आणि काही आजी माजी पदाधिकाऱ्यांना तात्काळ मुंबईला बोलावून घेण्यात आले. श्रेष्ठी आणि मुख्यमंत्री या नेत्यांशी बोलून विदर्भातील सैनिकांच्या नाराजीची कारणे जाणून घेतील, असे वाटले होते. पण उद्धव ठाकरे नागपूरकर शिवसैनिकांना भेटलेच नाहीत, तर अनिल देसाई यांनी त्यांना ‘अटेंड’ केले, असे काही शिवसैनिकांनी ‘सरकारनामा’ला सांगितले. यावेळी अनिल देसाई यांच्या व्यतिरिक्त नागपूर शहराचे संपर्कप्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी हे सुद्धा उपस्थित असल्याची माहिती आहे. ही बैठक अडीच तास चालल्याचे सांगण्यात येते. पण बैठकीत नेमकी चर्चा काय झाली, याची माहिती मिळू शकली नाही. 

आज भेटणे गरजेचे होते...
खरे पाहता दुष्यंत चतुर्वेदी शिवसेनेत आल्यानंतरच निष्ठावान सैनिक दुरावले गेले, असे शिवसैनिक दबक्या आवाजात बोलतात. त्यांनी नागपुरातील ‘शिवधनुष्य’ हाती घेतल्यानंतरच निष्ठावान सैनिकांची पळापळ सुरू झाली. हे असेच जर सुरू राहिले, तर येत्या निवडणुकीत शिवसेनेला कार्यकर्ते तर सोडाच पण उमेदवारही मिळणे अवघड होऊन बसेल, अशी स्थिती आहे. आगामी महानगरपालिका आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना एकटी पडेल, अशी भितीही जुनेजाणते सैनिक वर्तवीत आहेत. असे होऊ द्यायचे नसेल, तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज नाराज सैनिकांना भेटणे गरजेचे होते. 

...तर भोपळाही फोडता येणार नाही !
नागपुरात येवढ्या घडामोडी झाल्या. शिवसेनेला घरघर लागली आहे, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे, असे असताना मुख्यमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज होती. पण तसे न झाल्यामुळे येथे सेनेला भविष्यात अनेक अडचणींना सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्राचे राजकारण ज्या दिशेने जात आहे. त्या परिस्थितीचा विचार केला असता भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस भविष्यात एकत्र लढल्यास शिवसेनेचे काय होईल? विदर्भात तर भोपळाही फोडता येणार नाही, असे वाक्य आज खुद्द सैनिकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहेत. 

धोक्याची घंटा ?
शिवसेना वगळता महाविकास आघाडीतील इतर दोन्ही पक्षांतील प्रदेश प्रमुखांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा सुरू केली आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी काल शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषद घेऊन महापालिका निवडणुकीचा बिगुल फुंकला आहे. पण शिवसेनेची तयारी तर काहीच नाही, उलट पदाधिकारी एक-एक करून सेना सोडून जात आहेत. ही विदर्भात शिवसेनेसाठी धोक्याची घंटा तर नाही ना…?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com