तर वर्षा बंगल्यावर शिवजयंती साजरी करू ! संभाजी दहातोंडे - So let's celebrate Shiva Jayanti at Varsha Bungalow! Sambhaji Dahatonde | Politics Marathi News - Sarkarnama

तर वर्षा बंगल्यावर शिवजयंती साजरी करू ! संभाजी दहातोंडे

मुरलीधर कराळे
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

शिवजयंती साजरी करण्यातील अटी शिथिल कराव्यात, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिवजयंती साजरी करू.

नगर : शिवजयंती साजरी करण्यातील अटी शिथिल कराव्यात, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिवजयंती साजरी करू, असा इशारा शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी दिला.

कोरोनाची पार्श्वभूमी असतानाही राज्यामध्ये विविध राजकीय पक्षांचे मेळावे, शेतकरी आंदोलने, ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. त्यामध्ये गर्दीवर कोणतेही बंधन नाही. मग महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यावर इतकी बंधने कशासाठी? हा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा... भूमिहिनांना पाच एकर जमीन मिळणार

संभाजी दहातोंडे म्हणाले, "केवळ १०० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी, प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणूक, अभिवादन सभा, पोवाडे, व्याख्याने, नाटके, सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ नयेत, शिवनेरी, रायगड तसेच अन्य कोणत्याही किल्ल्यांवर जाऊ नये आदी अटी घालण्यात आल्या आहेत. या अटी अयोग्य असून, प्रत्येक शिवप्रेमी नियमांचे पालन करून शिवजयंती साजरी करेल. त्यामुळे सरकारने ताबडतोब या अनावश्यक अटी रद्द करून उत्साहात शिवजयंती साजरी करू द्यावी. या अटी रद्द न केल्यास राज्यभरातील तमाम शिवप्रेमी, शिवभक्त मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानी जाऊन शिवजयंती साजरी करतील. १९ फेब्रुवारी २०२१ रोजी शिवजयंती आहे. यंदा शिवजयंती साजरी करण्यात राज्य सरकारने अनेक अटी घातल्या आहेत. त्यामुळे जगभर साजऱ्या होणाऱ्या यंदाच्या शिवजयंतीवर अनेक निर्बंध आले असून, शिवप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे."

 

हेही वाचा...
शेतकऱ्यांची वीजबिले माफ करावीत

नगर : राज्यासह सध्या जिल्ह्यात महावितरणकडून सक्तीने वीजबिल वसुली सुरू आहे. अनेक संकटांनी पिचलेला शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे सक्तीची वसुली थांबवून शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे, अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी केली आहे.

हेही वाचा... माझे वाढलेले महत्त्व काहिंना रुचले नाही ः कर्डिले

वीजबिलाबाबत शेतकऱ्यांची पिळवणूक न थांबल्यास शेतकरी मराठा महासंघ आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले. 

दहातोंडे, युवक अध्यक्ष संतोष नानवटे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, की अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे अनुदान अजून शेतकऱ्यांना मिळाले नाही. दुसरीकडे, महावितरणकडून वीजबिलाची सक्तीने वसुली सुरू आहे. विशेष म्हणजे, एखाद्या शेतकऱ्याची वीज न तोडता, चक्क रोहित्रच बंद करण्यात येत आहे. वीज वितरणचे अधिकारी, मंत्रीही त्याचे समर्थन करीत आहेत. शेतकऱ्यांची ही पिळवणूक आहे. सध्या पिकांना पाणी देणे आवश्‍यक आहे. अशा वेळी वीज बंद करून अडचणीतील शेतकऱ्यांना खिंडीत गाठण्याचा हा प्रकार आहे. हे प्रकार सरकारी पातळीवर तातडीने थांबवावेत. शेतकऱ्यांची बिले तातडीने माफ करावीत, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दहातोंडे यांनी दिला आहे. 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख