माझे वाढलेले महत्त्व काहींना रुचले नाही : कडिर्ले - Shivaji kardile news, District Bank farmers, not manufacturers! | Politics Marathi News - Sarkarnama

माझे वाढलेले महत्त्व काहींना रुचले नाही : कडिर्ले

मुरलीधर कराळे
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

माझे वाढलेले महत्त्व नगर तालुक्‍यातील महाविकास आघाडीतील काही लोकांना रुचले नाही. त्यामुळेच माझ्या बिनविरोध होण्याला त्यांनी खोडा घातला; परंतु मी त्याला घाबरत नाही. ही लोकशाही आहे.

नगर : "जिल्हा सहकारी बॅंक ही केवळ साखरकारखानदारांची नाही, तर ती सर्वसामान्य शेतकऱ्यांचीही आहे, हे काही लोक विसरले असावेत. मी गेल्या दहा वर्षांपासून कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी बॅंकेच्या माध्यमातून प्रयत्न केले. केवळ साखर कारखानदारांना कर्ज देण्याचा बॅंकेचा उद्देश नसतो. सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी मी लढतो आहे, हेच काहींना रुचले नसावे. त्यामुळेच मला बिनविरोध होऊ दिले नाही. सर्वच जागा बिनविरोध होण्यासाठी मी थोरात, विखे पाटील यांनाही भेटलो होतो,'' अशी मत भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केले. 

जिल्ह्यातील बहुतेक नेते जिल्हा बॅंकेवर बिनविरोध निवडून आले. कर्डिले यांना मात्र लढण्याची वेळ आली. याबाबत "सरकारनामा'शी बोलताना कर्डिले म्हणाले, की माझे वाढलेले महत्त्व नगर तालुक्‍यातील महाविकास आघाडीतील काही लोकांना रुचले नाही. त्यामुळेच माझ्या बिनविरोध होण्याला त्यांनी खोडा घातला; परंतु मी त्याला घाबरत नाही. ही लोकशाही आहे. लढतीचा सर्वांचा हक्क आहे. त्यांना त्यांचे स्वतःचेच मत मिळेल, यापेक्षा वेगळे काय होणार, असा प्रश्‍न कर्डिले यांनी उपस्थित केला. 

हेही वाचा... ईडीसारख्या संस्थांचा वापर राजकीय हेतुने

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांची जीवनदायीनी असलेली जिल्हा बॅंक बिनविरोध व्हावी, यासाठी मी प्रयत्न केले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बोलावल्याने संगमनेरला गेलो. त्यांच्याशी चर्चा केली. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशीही चर्चा केली. परंतु सर्वच जागांसाठी यश आले नाही. बॅंकेत शेतकऱ्यांच्या ठेवी आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे, ही माझी भूमिका राहिली. साखर कारखान्यांना ही बॅंक मोठे कर्ज देते. त्यामुळे तीवर वर्चस्व असावे, असे कारखानदारांना वाटते. त्यामुळेच ही बॅंक साखर कारखानदारांचीच असल्याची भावना सर्वसामान्यांची होत आहे. ही बॅंक काखानदारांऐवजी शेतकऱ्यांची व्हावी, यासाठी गेल्या दहा वर्षात मी प्रयत्न केले. 

दरम्यान, कर्डिले यांच्या बिनविरोधबाबत महाराष्ट्रभर चर्चा होत आहे.

हेही वाचा... हे सरपंच की हिरो

त्यांना वाटतं माझं बॅंकेत काय काम 

माझ्याकडे साखर कारखाना नाही. बॅंकेत बहुतेक संचालक कारखानदार आहेत. त्यांना वाटत असेल, या बॅंकेत कर्डिले यांचे काय काम; परंतु मी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करीत आहे. कारखानेही टिकले पाहिजेत, परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांचीही गरज भागली पाहिजे, असे माझे मत आहे. 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख