श्रीगोंदे : जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते सदाशिव (सदाअण्णा) भिकाजी पाचपुते (वय 63) यांचे आज पुण्यात खासगी रुग्णालयात निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली होती.
कोरोनातून ते बरे झाल्याचे वाटत असतानाच त्यांच्यावर काळाने झडप घातली. माजी मंत्री, आमदार बबनराव पाचपुते यांचे ते बंधू होत. आमदार पाचपुते यांच्या राजकीय वाटचालीत त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या मागे दोन बंधू, पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे, असा परिवार आहे.
कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्याजवळ त्यांचे चिरंजीव साजन, सुदर्शन व पत्नी सुनंदा होत्या. कोरोनाची त्यांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र, आज दुपारी सव्वादोन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
पडद्यामागचे सुत्रधार
आमदार पाचपुते यांच्या गेल्या 40 वर्षांच्या राजकारणात पडद्यामागचे सूत्रधार सदाअण्णाच राहिले. त्यांनी तालुक्यात तरुणांची व ज्येष्ठांची फळी जुळवीत, बंधू बबनराव यांना आमदार करण्यात ते सर्वांत पुढे होते. पाचपुते मंत्री असताना तालुक्यातील कार्यकर्त्यांना खरा आधार सदाअण्णा हेच होते.
हेही वाचा... त्या नेत्यांना सेटलमेंटची सवय
काष्टी जिल्हा परिषद गटाचे ते सदस्य होते. जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष, साईकृपा उद्योगसमूहाचे ते अध्यक्ष होते. जिल्ह्यातील दूधउत्पादकांच्या सोयीसाठी त्यांनी 30 वर्षांपूर्वी काष्टीत साईकृपा डेअरी सुरू केली. देवदैठण येथे साईकृपा साखर कारखान्याची निर्मिती केली.
हेही वाचा... कृषी विद्यापीठाचे मोलाचे संशोधन
दरम्यान, शेतकऱ्यांसाठी झटणारा नेता गेला. अडचणीच्या काळात त्यांनी दूध व ऊसउत्पादकांसाठी संघर्ष करीत न्याय दिला, अशा शब्दांत माजी आमदार राहुल जगताप यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
एक प्रामाणिक राजकारणी, सामान्यांसाठी तळमळ असलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला. राजकारणासोबतच समाजकारणात त्यांचे योगदान मोठे राहिले, असे राज्य साखर संघाचे संचालक घनश्याम शेलार यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
एक सच्चा मित्र आणि जिवाला जीव देणारी असामान्य व्यक्ती निघून गेली. राजकारणापलीकडची मैत्री कशी करावी, याची शिकवण अण्णांनी दिली, अशा शब्दांत राज्य समतीचे राज्याचे संचालक बाळासाहेब नाहाटा यांनी भावना व्यक्त केल्या.
Edited By- Muridhar Karale

