राहुरी विद्यापीठ : कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या केवळ आठ पिकांच्या तंत्रज्ञानामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात 94 हजार कोटींची भरीव वाढ झालेली आहे. यामध्ये ऊसाच्या दोन वाणांनी 40 हजार कोटी, डाळिंब 21 हजार कोटी, हरभरा 13 हजार कोटी, ज्वारी 8400 कोटी तसेच कांदा 7500 कोटी रुपयांची वाढ दिसून आलेली आहे, अशी माहिती विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांनी दिली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्वारी सुधार प्रकल्प येथे रब्बी पीक दिन व शिवार फेरी आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गडाख बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कृषी विभागाचे मृदसंधारण आणि पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन संचालक डॉ. नारायण शिसोदे, कार्यकारी परिषद सदस्य प्रा. नाथाजी चौगुले, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, कुलसचिव मोहन वाघ, विभाग प्रमुख अशोक जाधव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. श्रीमंत रणपिसे उपस्थित होते.
डॉ. शिसोदे म्हणाले, की कृषी विस्तारामध्ये समाज माध्यमांचा वापर वाढत असल्याने शेतकऱ्यांनी अलर्ट आणि डिजीटल होणे गरजेचे आहे. शेतकरी कृषि सल्ल्यासाठी किसान पोर्टलवर नांव नोंदवावे. पीक स्पर्धेमुळे तंत्रज्ञानाचा योग्य प्रसार होतांना दिसत असल्याने पीक स्पर्धेच्या उपक्रमात शेतकर्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन या वेळी त्यांनी केले.
कुलसचिव मोहन वाघ म्हणाले, की कृषी विद्यापीठांनी विकसीत केलेले वाण आणि शेतकऱ्यांचे कष्ट यामुळे देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला. कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार करण्यासाठी समाज माध्यमांचा प्रभावीपणे वापर आणि शेतकरी मित्र फौज निर्माण करणे गरजेचे आहे. येथून पुढे शेतमालाच्या मुल्यवर्धनावर आणि शेतीपुरक उद्योग यावर जास्तीत जास्त प्रशिक्षण होणे गरजेचे आहे. या वेळी प्रगतशील शेतकरी कृषिभुषण विष्णू जरे आणि रामदास अडसुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या वेळी डॉ. दीपक दुधाडे, डॉ. बबनराव इल्हे, डॉ. सुयेश चौधरी, डॉ. विनायक जोशी यांनी शेतकर्यांना रब्बी पिकांविषयी मार्गदर्शन केले.
या व्यतिरिक्त विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर रब्बी पिकांच्या 48 वाणांचे तर चार्याचे 80 वाणांचे प्रात्यक्षिके आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यापीठाचे विविध विभागांचे विभाग प्रमुख, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन सदाफळ आणि आभार डॉ. पंडित खर्डे यांनी मानले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या ज्वारी प्रकल्पाने योग्य नियोजन केले, सर्वाना सॅनिटाईज केल्यानंतर सर्व उपस्थितांना विद्यापीठाची दिनदर्शिका, ज्वारी लागवडीसाठी मार्गदर्शक पुस्तिका, मास्क, माऊली लस्सी, फुले लाह्या, फुले जल देण्यात येत होते.
Edited By - Murlidhar Karale