`त्या` नेत्यांना सेटलमेंटची सवय, विखे घराण्याला नाही ! खासदार विखे पाटलांचा टोला कोणाला? - Settlement habit for 'those' leaders, not for Vikhe family! MP Vikhe Patil's team to whom? | Politics Marathi News - Sarkarnama

`त्या` नेत्यांना सेटलमेंटची सवय, विखे घराण्याला नाही ! खासदार विखे पाटलांचा टोला कोणाला?

मार्तंड बुचुडे
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

आम्ही सहमतीचे राजकारण करतो; सेटलमेंटचे नाही. माझ्याबरोबर सेटलमेंट करण्यासाठी लाइन लागली आहे. ज्या दिवशी विखे घराणे सेटलमेंटचे राजकारण करील, त्या दिवशी सामान्यांची हार झालेली असेल.

पारनेर : "जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना सेटलमेंटची सवय लागली आहे. विखे घराण्याने कधीही राजकारणात सेटलमेंट केली नाही. आम्ही जनतेसाठी राजकारण करीत आहोत. सामान्य जनतेसाठी कितीही नुकसान झाले तरी काही फरक पडत नाही; कारण आमचे प्रपंच राजकारणावर चालत नाहीत. आमची तिसरी पिढी राजकारणात आहे. आम्ही कधीही टक्केवारीचे राजकारण केले नाही,'' असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. 

हेही वाचा.. पाठकबाई म्हणते रोहत पवार हेच जामखेडसाठी राणादा

जिल्हा बॅंक निवडणुकीनिमित्त शिवसेनेचे सेवा संस्थेचे उमेदवार रामदास भोसले व बिगरशेती मतदारसंघाचे उमेदवार दत्तात्रेय पानसरे यांच्या प्रचार मेळाव्यात डॉ. विखे पाटील बोलत होते. यानिमित्त तालुक्‍यात जिल्हा बॅंकेसाठी भाजपचा शिवसेना उमेदवारास पाठिंबा असल्याचे जाहीर झाले.

डॉ. विखे पाटील म्हणाले, ""आम्ही सहमतीचे राजकारण करतो; सेटलमेंटचे नाही. माझ्याबरोबर सेटलमेंट करण्यासाठी लाइन लागली आहे. ज्या दिवशी विखे घराणे सेटलमेंटचे राजकारण करील, त्या दिवशी सामान्यांची हार झालेली असेल. तालुक्‍यातील राजकारणात अपेक्षेची सवय लागली आहे. राजकारणात अर्थकारण जुळत गेले, तर मी राजकारण सोडून देईन. आम्ही जनतेसाठी सत्तासंघर्ष करतो. "जिल्हा बॅंकेत विखेंची माघार' असे काही वृत्तपत्रांत आले. आम्ही पूर्वीच्या निवडणुकीतही माघार घेतली होती. माघारीचे काही वाटत नाही; कारण त्यातही काही तरी दडलेले असते.'' 

हेही वाचा.. फडणवीस यांच्या शपथविधीची पुनरावृत्ती

डॉ. विखे पाटील म्हणाले, ""आम्ही आमचे फोटो व्हायरल केले, तर सोशल मीडिया हॅंग होईल. आम्ही असे आहोत, असेच राहणार. आम्हाला जनतेला सांगावे लागत नाही, की आम्ही किती साधे आहोत? के. के. रेंजबाबत राजकारण केले गेले. शेतकऱ्यांना सरावाच्या काळातील जमिनीचे भाडे मिळावे, अशी माझी मागणी होती; मात्र त्यात राजकारण आले. आम्हीच शेतकऱ्यांच्या जमिनी सोडविल्या, असे सांगून फटाके वाजविले; पण स्वातंत्र्यापासून शेतकऱ्यांच्या जमिनीची के. के. रेंजमध्ये असणारी स्थिती तशीच आहे.'' 

माजी आमदार विजय औटी यांचे काम चांगले असून, पुढील वेळी ते दुप्पट मतांनी विजयी होतील, असा विश्‍वास डॉ. विखे पाटील यांनी व्यक्‍त केले. 

दरम्यान, जिल्हा बॅंकेच्या 17 जागा बिनविरोध झाल्या आहेत. इतर चार जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. बॅंकेच्या जागा बिनविरोध होण्यासाठी मोठे राजकारण झाले. त्या पार्श्वभूमीवर विखे पाटलांनी मारलेला टोला अनेकांना लागणार आहे.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख