अर्थसंकल्प नव्हे, फक्त आकड्यांचे फुलोरे : विखे पाटील - Not budget, just numbers: Vikhe Patil | Politics Marathi News - Sarkarnama

अर्थसंकल्प नव्हे, फक्त आकड्यांचे फुलोरे : विखे पाटील

सतीश वैजापूरकर
मंगळवार, 9 मार्च 2021

दोन लाख रुपये कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान सरकार देणार होते; परंतु त्याचा कुठे उल्लेखही नाही.

शिर्डी : "तिजोरीत नाही आणा आणि अर्थसंकल्पात महाविकास आघाडी सरकारच्या नुसत्याच घोषणा..' तीन-तीन मंत्री असतानाही नगर जिल्ह्याच्या पदरी काहीही पडले नाही. समाजातील सर्वच घटकांच्या तोंडाला पाने पुसणारा आणि भ्रमनिरास करणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, की दोन लाख रुपये कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान सरकार देणार होते; परंतु त्याचा कुठे उल्लेखही नाही. ठाकरे सरकारची कर्जमाफी फसवी ठरली आहे. वाढीव वीजबिल उदासीनता, अनुदानाच्या रकमा शेतकऱ्यांना मिळत नाहीत. पायाभूत सुविधांच्या योजनांत केंद्र सरकारचा सहभाग आहे.

हेही वाचा... जिल्हा बॅकेचा कारभार काटेकोरपणे करा

केंद्राच्या सहकार्याने योजना पूर्ण होणार; मग सरकार म्हणून तुम्ही राज्याला नवीन काय दिले? राज्य सरकारने फक्‍त आकड्यांचे फुलोरे फुलविले. महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घोषणा केल्या. त्यासाठी निधी कुठून आणि कसा आणणार, हे स्पष्ट सांगत नाहीत.

हा कल्पनाविलास आहे. इच्छाशक्‍तीचा अभाव आहे. हे सरकार फक्‍त पर्यटनात गुंतले आहे. पेट्रोल-डिझेलवरील कर ते कमी करू शकले नाही. सातत्याने केंद्र सरकारकडे बोट दाखवून निष्क्रियता लपविण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे, असेही ते म्हणाले.

 

हेही वाचा...

"निळवंडे'चे भाग्य उजळले, राज्याच्या अर्थसंकल्पात कालव्यांसाठी 365 कोटींची तरतूद 

शिर्डी : उत्तर नगर जिल्ह्याच्या सुमारे सव्वा लाख एकर दुष्काळी टापूला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तब्बल 365 कोटींची तरतूद करण्यात आली. तब्बल 50 वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या या प्रकल्पाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या रकमेची तरतूद करण्यात आली. लाभक्षेत्रात ही बातमी समजताच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. 

हेही वाचा... हे तर गृहखात्याचे अपयश ः विखे

निळवंडे प्रकल्पाचे अभियंता प्रमोद माने म्हणाले, ""पुढील वर्षीच्या जूनपर्यंत कालव्यांची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जलसंपदा विभागाने ठेवले होते. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आम्हाला तशा सूचना केल्या होत्या. यंदा 365 कोटींची भरीव तरतूद झाली. त्यामुळे कालव्यांची कामे आता वेगाने सुरू होतील. पुढील वर्षी एवढीच तरतूद अपेक्षित आहे. पुढील वर्षभरात लाभक्षेत्रात धरणाचे पाणी नेण्याचे उद्दिष्ट पूर्ण होईल.'' 

निळवंडे कृतिसमितीचे सुखलाल गांगवे म्हणाले, ""जलसंपदामंत्री जयंत पाटील व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वी प्रकल्पाला भेट दिली. कालव्यांच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी निळवंडे कृतिसमितीच्या सदस्यांनी त्यांची भेट घेतली. "कालव्यांसाठी भरीव निधीची तरतूद करावी. 50 वर्षे वाट पाहिली, आता तरी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी पुढाकार घ्या,' अशी विनंती केली. त्यावेळी पाटील यांनी दिलेले आश्वासन आज पूर्ण झाले. महाविकास आघाडीने हे ऐतिहासिक पाऊल उचलले. शिवाय, या महिनाअखेरीस शंभर कोटींची आणखी तरतूद झाली. एका अर्थाने 465 कोटींची तरतूद झाली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. निळवंडे कृतिसमितीचा 20 वर्षांचा लढा व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या भावनांना राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.'' 

 

Edited By- Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख