जिल्हा बॅंकेचा कारभार काटेकोरपणे करा : थोरात - Strictly manage the District Bank: Thorat | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्हा बॅंकेचा कारभार काटेकोरपणे करा : थोरात

मुरलीधर कराळे
शनिवार, 6 मार्च 2021

रिझर्व बॅंकेचे नियमांचा विचार केला, तर बॅंक चालविणे आता सोपे राहिले नाही. नूतन संचालक मंडळाने नियमांची अंमलबजावणी करीत बॅंकेचा कारभार काटेकोरपणे करावा.

नगर : "जिल्ह्याच्या विकासात अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेचा मोठा वाटा आहे. तिला अनेक नेत्यांनी आपल्या कुटुंबाप्रमाणे सांभाळले. वाढविले. रिझर्व बॅंकेचे नियमांचा विचार केला, तर बॅंक चालविणे आता सोपे राहिले नाही. नूतन संचालक मंडळाने नियमांची अंमलबजावणी करीत बॅंकेचा कारभार काटेकोरपणे करावा,'' अशी अपेक्षा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. 

बॅंकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड आज झाली. नूतन अध्यक्ष ऍड. उदय शेळके व उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांच्या सत्कारानंतर थोरात बोलत होते. 

हेही वाचा... ती जागा शिवसेनेला देण्यास भाजप तयार

ते म्हणाले, की नवीन संचालक मंडळ आले, त्यात नव्या-जुन्याचा चांगला मेळ घातला गेला आहे. 17 जागा बिनविरोध झाल्या, ही ऐतिहासिक निवड झाली आहे. नूतन अध्यक्ष शेळके यांनी महानगर बॅंक मुंबईत चालवून ती मोठी केली. गुलाबराव शेळके गेल्यानंतर ऍड. उदय यांनी ही बॅंक अत्यंत चांगली सांभाली. त्यामुळे त्यांना चांगला अनुभव आहे. बॅंक चालविणे ही सोपी गोष्ट नाही. जो जबाबदारी घेतो, त्यासाठी सर्वात अवघड बाब आहे. बॅंकिंगमध्ये काळजीपूर्वक काम करणे आवश्‍यक आहे. ही बॅंक काटेकोर पद्धतीने चालवा. संस्थेचे हित जपा. माधवराव कानवडे हे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. साखर कारखान्याचे 15 वर्ष संचालक म्हणून त्यांनी काम केले. कारखान्याच्या विकासात त्यांचा मोठा वाटा आहे.'' 

थोरात म्हणाले, की रिझर्व बॅंकेचे नियम आणखी कठिण झाले आहेत. त्यामुळे बॅंक चालविणे अवघड आहे, ही विस्तुस्थिती आहे. बॅंकेच्या बैठकांना संचालकांनी उपस्थित राहायला हवे. बॅंकेत बहुतेक आमदार आहे. मंत्री महोदयही संचालक आहेत. त्यांनी मंत्रालयातील त्यांचे कामे पाहून जिल्हा बॅंकेवर विशेष लक्ष द्यावे. या बॅंकेच्या माध्यमातून विविध संस्थांचा विकास होत असतो. या निवडणुकीत दाखवून दिले, की ही जिवाभावाची संस्था आहे. राजकारण बाजुला ठेवून बॅंकेसाठी सर्वजण एक आले, ही समाधानाची बाब आहे. काही नियम ठरवावे लागतील. थकबाकी कमी कशी होईल, याची काळजी घ्यावी लागेल. 

हेही वाचा... 

या वेळी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख म्हणाले, ""नूतन अध्यक्ष तरूण व उपाध्यक्ष ज्येष्ठ अशी छान जोड या वेळी बॅंकेला लाभली आहे. त्यामुळे बॅंकेचा कारभार चांगलाच होईल, यात शंका नाही. आम्ही सर्व संचालक त्यांना पूर्ण सहकार्य करू.'' या वेळी अध्यक्ष उदय शेळके, उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी सत्काराला उत्तर दिले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख