महापालिकेची पोटनिवडणूक ! ती जागा शिवसेनेच्या राठोड यांना देण्यास भाजपचे गांधी इच्छुक - Municipal by-election! BJP's Gandhi wants to give that seat to Rathore of Shiv Sena | Politics Marathi News - Sarkarnama

महापालिकेची पोटनिवडणूक ! ती जागा शिवसेनेच्या राठोड यांना देण्यास भाजपचे गांधी इच्छुक

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 5 मार्च 2021

गेल्या 40 ते 50 वर्षांपासून दिवंगत अनिल राठोड यांनी हिंदुत्वाचा झेंडा हाती घेत शहरात काम केले होते. त्यांचा राजकीय प्रवास खडतर होता. सर्वसामान्य नागरिकांसाठी ते आयुष्यभर लढले.

नगर : स्थायि समितीच्या अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर महानगरपालिकेच्या प्रभाग नऊमध्ये लवकरच पोट निवडणूक होणार आहे. ही निवडणूक भारतीय जनता पक्षाने न लढण्याचा निर्णय घेत उमेदवार न देता शिवसेनेचे उपनेते (कै.) अनिल राठोड यांचे पूत्र विक्रम राठोड यांना या प्रभागातून नगरसेवक होण्यासाठी पाठिंबा द्यावा. (कै.) अनिल राठोड यांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल, अशी मागणी भाजपाचे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे. 

सुवेंद्र गांधी यांनी पाठवलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, गेल्या 40 ते 50 वर्षांपासून दिवंगत अनिल राठोड यांनी हिंदुत्वाचा झेंडा हाती घेत शहरात काम केले होते. त्यांचा राजकीय प्रवास खडतर होता. सर्वसामान्य नागरिकांसाठी ते आयुष्यभर लढले. त्यांच्या अकाली निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मोठा निर्णय घेणे आवश्‍यक आहे. यासाठी प्रभाग नऊमधील पोट निवडणुकीसाठी भाजपने उमेदवार देवू नेये, अशी माझी वैयक्तिक मागणी आहे.

हेही वाचा... घुलेच्या शर्यतीत शेळकेंची एन्ट्री 

माजी केंद्रीयमंत्री दिलीप गांधी व (कै.) अनिल राठोड यांना कोणताही राजकीय वारसा नसतांना स्वतःच्या कर्तृत्वावर शून्यातून विश्व निर्माण केले. दोघांचा राजकीय प्रवास बरोबर सुरू झाला. दिलीप गांधी व अनिल राठोड यांच्यात गेल्या काही वर्षांपासून ताणतणाव व राजकीय वाद होता, तरी दोघांनी भाजपा शिवसेना युतीत बरोबर काम केले होते. खासदार म्हणून निवडून येण्यात अनिल राठोड यांनी सहकार्य केले, तर आमदार म्हणून निवडून येण्यासाठी दिलीप गांधी यांनी एकमेकांना सहकार्य केले आहे. पदांच्या माध्यमातून दोघांनी शहराच्या व जिल्ह्याच्या विकासास हातभार लावत सर्वसामान्य जनतेची कामे केली आहेत. हे विसरून चालणार नाही.

हेही वाचा... स्थायीच्या सभापतीपदी घुले 

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे (कै.) अनिल राठोड हे जवळचे स्नेही होते. प्रभाग नऊमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने उमेदवार न देता विक्रम राठोड यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कडेही करणार आहे, असे गांधी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, नुकतीच महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदाची निवड झाली आहे. हा धुराळा संपतो ना संपतो तोच या पोटनिवडणुकीसाठी राजकारण तापले आहे. त्यामुळे भाजप- शिवसेनेतील गटांतील राजकारण सुरू झाले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख