स्थायीच्या सभापतीपदी अविनाश घुले बिनविरोध होण्यासाठी असे झाले राजकारण - This is politics so that Avinash Ghule can be unopposed as the permanent chairman | Politics Marathi News - Sarkarnama

स्थायीच्या सभापतीपदी अविनाश घुले बिनविरोध होण्यासाठी असे झाले राजकारण

अमित आवारी
गुरुवार, 4 मार्च 2021

स्थायी सभापती होण्याची ही दुसरी वेळ आहे, तर स्थायी सभापतीपदाच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा आघाडीचा धर्म पाळण्याच्या नावाखाली शिवसेना नगरसेवकांना माघार घेत तोंडघशी पडावे लागले.

नगर : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या विजय पठारे यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे अविनाश घुले हे स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवडले गेले.

स्थायी सभापती होण्याची ही दुसरी वेळ आहे, तर स्थायी सभापतीपदाच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा आघाडीचा धर्म पाळण्याच्या नावाखाली शिवसेना नगरसेवकांना माघार घेत तोंडघशी पडावे लागले. 

महापालिका स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेकडून विजय पठारे यांनी दोन, तर राष्ट्रवादीकडून अविनाश घुले यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. घुले यांनी पठारे यांच्या दोन्ही अर्जातील अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्या बोगस असल्याचे सांगितले होते.

आज निवडणूक प्रक्रिया दुपारी तीन वाजता सुरू झाली. अर्ज छाणणीच्या वेळी पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या समोर घुले यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. पठारे यांच्या दोन्ही अर्जांना एकच सूचक असल्याने एक अर्ज छाणणीच्या वेळी डॉ. भोसले यांनी बाद ठरविला. अर्ज माघारीसाठी 15 मिनिटांचा कालावधीत देताच विजय पठारे यांनी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे घुले यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. 

तीन नगरसेवकांची अनुपस्थिती 

विजय पठारे यांचे अनुमोदक असलेले दोन्ही नगरसेवकांसह तीन नगरसेवक आज स्थायीच्या निवडणुकीला अनुपस्थित होते. यात सचिन शिंदे, परसराम गायकवाड हे पठारे यांच्या अर्जाचे अनुमोदक व नगरसेवक श्‍याम नळकांडे यांचा समावेश होता. ऐन निवडणुकीच्यावेळी शिवसेनेचे पाच पैकी तीन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने शिवसेनेत उभी फूट पडल्याची चर्चा आज महापालिकेत होती. 

 

निवडणूक प्रक्रियेत विजय पठारे यांनी अर्ज माघारी घेतल्याचे कळताच घुले यांच्या समर्थकांनी महापालिकेच्या स्थायी समिती सभापतींच्या दालनाजवळच फटाक्‍यांची आतषबाजी केली. तसेच गुलाल उधळला. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना महापालिकेच्या इमारती बाहेर काढले. 

शिवसेनेत फूट नाही ः पठारे

शिवसेनेत फूट पडलेली नाही. आम्ही सर्वजण आज सकाळी एकत्र होतो. पण वरिष्ठांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याचा आदेश दिला. त्यामुळे अर्ज माघाडी घेण्यासाठी मी व रिता भाकरे आलो होतो. पक्षाने जो निर्णय घेतला त्यानुसार मी आदेश पाळला. पक्षापेक्षा मी मोठा नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नगरसेवक विजय पठारे यांनी दिली.

सर्वांना बरोबर घेऊन काम करणार

मला राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. मी राष्ट्रवादीचा आहेच, पण शहरातील स्थायी समितीचा सभापती आहे. बसप, कॉंग्रेससह सर्वांनी सहकार्य केले. कदाचित उमेदवार योग्य वाटला म्हणून विश्‍वास दाखविला असावा. आता भाजप, शिवसेनेसह सर्वांना बरोबर घेऊन काम करायचे आहे. मी पक्षाचा नव्हे तर महापालिकेच्या स्थायी समितीचा सभापती आहे. रखडलेले प्रश्‍न मार्गी लावू. राज्यात आमची सत्ता आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली निधी आणू. मी यापूर्वीही सभापती होतो. त्यामुळे मला कामाचा अनुभव आहे. 
- अविनाश घुले, नूतन सभापती, स्थायी समिती, नगर महापालिका. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख