घुलेंच्या शर्यतीत शेळकेंची "एन्ट्री' - Shelke's 'entry' in Ghule's race | Politics Marathi News - Sarkarnama

घुलेंच्या शर्यतीत शेळकेंची "एन्ट्री'

मुरलीधर कराळे
गुरुवार, 4 मार्च 2021

शेळके हे जीएस महानगर बॅंकेचे अध्यक्ष असून, त्यांना प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. तसेच वकील असल्याने बॅंकेसाठी ही जमेची बाजू आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ते जवळचे कार्यकर्ते आहेत.

नगर : जिल्हा सहकारी बॅंकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी जोरदार घडामोडी सुरू आहेत. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे नाव आघाडीवर असले, तरी आता उदय शेळके यांचीही "एन्ट्री' झाली आहे. उपाध्यक्षपदी कॉंग्रेस नेते माधवराव कानवडे यांची वर्णी लागण्याची शक्‍यता आहे. 

जिल्हा बॅंकेच्या 21 पैकी 17 जागा बिनविरोध झाल्या. चार जागांवर मतदान झाले. नूतन संचालक मंडळातून शनिवारी (ता. 6) अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड होणार आहेत. अध्यक्षपदासाठी घुले यांचेच नाव निश्‍चित झाल्याचे आतापर्यंत सांगितले जात होते; मात्र आजच्या राजकीय घडामोडीत पारनेरमधील संचालक उदय शेळके यांचे नाव पुढे आल्याचे समजते. शेळके हे जीएस महानगर बॅंकेचे अध्यक्ष असून, त्यांना प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. तसेच वकील असल्याने बॅंकेसाठी ही जमेची बाजू आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ते जवळचे कार्यकर्ते आहेत. विशेष म्हणजे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे ते भाचेजावई आहेत. थोरात यांनीच त्यांना उमेदवारीसाठी आग्रह केल्याचे मानले जाते. 

महाविकास आघाडीच्या जागा जास्त असल्याने त्यातील एका पक्षाला अध्यक्षपद मिळेल, हे निश्‍चित आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री थोरात हेच अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यामुळे अध्यक्षपद राष्ट्रवादीला, तर उपाध्यक्षपद कॉंग्रेसला मिळण्याची शक्‍यता आहे. त्यात शेळके व कानवडे अशी जोडी अंतिम झाल्यास थोरात यांचेच बॅंकेवर वर्चस्व राहिल. 

हेही वाचा.. मी मंत्री असतो, तर राजीनामा दिला असता

श्रीगोंदे तालुक्‍यात एक पद देण्याबाबत चर्चा होती, तथापि नंतर त्यात बदल होत गेले. थोरात यांचे जवळचे कार्यकर्ते व कॉंग्रेसचे संचालक म्हणून थोरात कारखान्याचे माजी अध्यक्ष माधवराव कानवडे यांना उपाध्यक्षपदाची संधी मिळू शकते. मागील वेळी बॅंकेचे अध्यक्षपद उत्तरेत होते. या वेळी दक्षिणेचा अध्यक्ष, तर उत्तरेत उपाध्यक्षपद देण्याबाबत नेत्यांत एकमत झाल्याचे मानले जाते. 

महिलेला पदाची हुलकावणी 

जिल्हा बॅंकेच्या पदाधिकारी निवडीत महिलेला संधी मिळेल, असे सांगितले जात होते. आमदार मोनिका राजळे या थोरातांच्या नातेवाईक असल्या, तरी पक्ष आडवा येतो. भाजपच्या जागा कमी असल्याने त्यांना संधी मिळण्याची शक्‍यता नाही. मात्र, थोरात समर्थक अनुराधा नागवडे यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडावी, यासाठी काही नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र, नंतर हेही नाव मागे पडल्याचे समजते.

हेही वाचा... त्यांनी घेतला मलिदा 

माघारीच्या बदल्यात काय? 

"हायकमांड'च्या आदेशामुळे आमदार अरुण जगताप यांनी उमेदवारी मागे घेतली. त्या बदल्यात त्यांना नेमका काय शब्द दिला, यावरही खलबते होण्याची शक्‍यता आहे. घुले यांच्यासह श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांचेही नाव चर्चेत होते. शेळके यांची आता नव्याने "एन्ट्री' झाल्याने राजकीय वाटाघाटीत "तो' शब्द चमत्कार घडवू शकणार नाही, असे मानले जाते. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख