नागवडे, जगताप यांच्या कारखान्यांना पाचपुतेंच्या "साजन शुगर'ची टक्कर - Nagwade, Jagtap's factories hit by "Sajan Sugar" of Pachpute | Politics Marathi News - Sarkarnama

नागवडे, जगताप यांच्या कारखान्यांना पाचपुतेंच्या "साजन शुगर'ची टक्कर

संजय आ. काटे
गुरुवार, 18 मार्च 2021

चार लाख टनांच्या आसपास ऊस बाहेरच्या कारखान्यांनी उचलला. त्यातच येथील कारखान्यांनीही कार्यक्षेत्राबाहेरचा ऊस आणला आहे.

श्रीगोंदे : तालुक्‍यातील तीन साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. नागवडे, कुकडी व साजन शुगर या कारखान्यांनी आतापर्यंत 15 लाख 67 हजार टन उसाचे गाळप केले. गाळपात नागवडे कारखाना, "कुकडी' पुढे असून, या दोन्हींच्या मानाने कमी क्षमता असणाऱ्या "साजन शुगर'नेही यंदा त्यांना चांगली टक्कर दिली आहे. 

ज्येष्ठ नेते राजेंद्र नागवडे यांच्या अधिपत्याखाली असलेला नागवडे कारखाना, माजी आमदार राहुल जगताप यांचा कुकडी कारखाना तसेच साजन पाचपुते यांचा साजन शुगर या तीन कारखान्यांकडून सध्या श्रीगोंदे कारखान्यात गाळप सुरू आहे.

तालुक्‍यातील चारपैकी तीन साखर कारखान्यांचे गाळप सुरू होऊन जवळपास पावणेपाच महिन्यांचा काळ लोटला आहे. तालुक्‍यात गेल्या वर्षी उसाचे क्षेत्र मोठे होते. त्यापैकी जवळपास सोळा लाख टन उसाचे गाळप स्थानिक कारखान्यांच्या वाट्याला आले. चार लाख टनांच्या आसपास ऊस बाहेरच्या कारखान्यांनी उचलला. त्यातच येथील कारखान्यांनीही कार्यक्षेत्राबाहेरचा ऊस आणला आहे.

हेही वाचा.. अर्सेनिक अल्बम संशयाच्या भोवऱ्यात 

नागवडे कारखान्याने बुधवारपर्यंत (ता. 17) सहा लाख 73 हजार 140 टन, कुकडी कारखान्याने सहा लाख 27 हजार 300, तर "साजन शुगर'ने दोन लाख 67 हजार टन उसाचे गाळप केले आहे. गाळप व उताऱ्यात नागवडे कारखान्याची आघाडी आहे. त्याचा 10.84 टक्के, "कुकडी'चा 10.18 टक्के, तर "साजन शुगर'चा उतारा 10.5 टक्के आहे. 
हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, नागवडे व कुकडी कारखान्यांचे प्रत्येकी सात लाख टनांपेक्षा जास्त गाळप होईल, अशी अपेक्षा आहे. 

हेही वाचा... गांधी या कारणाने संतापले

"साजन' दरात मागे राहणार नाही 

(स्व.) सदाशिव पाचपुते यांनी सुरू केलेल्या पूर्वीच्या साईकृपा व आताच्या साजन शुगर कारखान्याने क्षमतेच्या तुलनेत यंदा गाळपात चांगली बाजी मारली आहे. कारखान्याचे अध्यक्ष साजन पाचपुते म्हणाले, ""यंदा पहिल्यांदाच तीन लाख टन उसाचे गाळप होणार आहे. शिवाय, इतरांच्या तुलनेत दराबाबत मागे राहणार नाही. सदाअण्णांना हीच आदरांजली ठरणार आहे.'' 

हेही वाचा...

"मृत्युंजयदूत' करणार वाहनचालकांचे प्रबोधन 

श्रीगोंदे : नगर-सोलापूर महामार्गावरील अपघातांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. हे अपघात कमी करण्यासाठी व चालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी घोगरगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाचे विद्यार्थी व ग्रामस्थ "हायवे मृत्युंजयदूत' म्हणून रस्त्यावर उतरणार आहेत. 

घोगरगाव येथे महामार्ग पोलिस निरीक्षक शंकर शिंदे यांनी ग्रामस्थांची बैठक घेतली. यात प्रामुख्याने अपघात होऊ न देणे, झाल्यास प्रथमोपचार काय करावेत, अपघातग्रस्तांना कसे हाताळावे, याचे त्यांनी मार्गदर्शन केले. अपघात कमी करण्यासाठी व वाहनचालकांचे प्रबोधन करण्यासाठी "हायवे मृत्युंजय दूत' म्हणून पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यास छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थी व ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला. या दूतांना लवकरच ओळखपत्रे दिली जाणार आहेत. सहायक फौजदार रमेश कुलांगे, शकील शेख, कपिल राजापुरे, सूर्यभान झेंडे, अभिमन्यू घनवट, पोलिस पाटील सुदाम बोरुडे, प्राचार्य अविनाश गांगर्डे उपस्थित होते. 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख