पंतप्रधानांच्या सभेच्या वेळी दिलीप गांधी या कारणाने संतापले होते, अन आले डोळ्यात पाणी - Dilip Gandhi was outraged at this during the Prime Minister's meeting | Politics Marathi News - Sarkarnama

पंतप्रधानांच्या सभेच्या वेळी दिलीप गांधी या कारणाने संतापले होते, अन आले डोळ्यात पाणी

मुरलीधर कराळे
बुधवार, 17 मार्च 2021

त्या दिवशी गांधी व्यासपीठावर येणार का, आले तर काय बोलतील, असे अनेक तर्क-वितर्क राजकीय धुरिणांकडून लावले जात होते.

नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नगरला सभा होती. मंडप खच्चून भरला होता. मोदींचे भाषण ऐकण्यासाठी जिल्हाभरातून लोक आलेले होते. पंतप्रधानांना येईपर्यंत भाजप नेत्यांची भाषणे सुरू होती. त्यातच माजी खासदार दिलीप गांधी यांचे भाषण सुरू होते. पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने भाषण आटोपते घेण्याचा निरोप धाडला अन गांधी संतापले. या वेळी गांधी यांच्या डोळ्यात पाणीही आले होेते. ही आठवण आजही नगरकरांच्या स्मरणात आहे.

माजीमंत्री तथा भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते दिलीप गांधी यांचे आज दिल्लीत निधन झाले. त्यांच्यावर उद्या (ता. 18) नगरला अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशभरातील नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली. एक अभ्यासू, मनमिळावू, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाणारा नेता, पक्षाशी एकनिष्ठ राहिलेला नेता, अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला.

हेही वाचा... माजी केंद्रीयमंत्री दिलीप गांधी यांचे निधन

मागील लोकसभेच्या निवडणुकिच्या दरम्यान भाजपकडून नगर दक्षिणसाठी उमेदवारी देताना मोठे खलबते झाले. डाॅ. सुजय विखे पाटील यांंनी काॅंग्रेसमधून भाजपमध्ये एन्ट्री केली आणि वातावरण बदलले. त्याच वेळी दिलीप गांधी यांचा पत्ता कट झाल्याचे स्पष्ट झाले. विखे पाटील यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली. नगरला त्यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे नियोजन झाले. एप्रिल 2019 मध्ये झालेल्या या सभेच्या व्यासपीठावर गांधी व्यासपीठावर येणार का, आले तर काय बोलतील, असे अनेक तर्क-वितर्क राजकीय धुरिणांकडून लावले जात होते. पक्षाचे जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांनाही ते काय बोलणार, याची काळजी लागली होती. 

हेही वाचा.. पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

गांधी यांचे पंतप्रधान तसेच भाजपश्रेष्ठींचे चांगले संबंध होते. त्यामुळे ते या सभेस आवर्जुन आले.

पंतप्रधान येण्यास काही अवधी असताना भाजप नेत्यांनी भाषणबाजी चालू ठेवली. दिलीप गांधी व्यासपीठावर आले. त्यांनी भाषण सुरू केले. दक्षिण नगर जिल्ह्यात केलेल्या कामांबाबत व प्रश्नांचा त्यांनी उहापोह चालू केला. याच दरम्यान भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी भाषण आटोपते घ्यावे, अशी विनंती गांधी यांना केली. त्यावर गांधी संतापले. मी अजून बोलणार आहे. मला बोलू द्या. असे सांगून त्यांनी भाषण सुरूच ठेवले. कोण म्हणतं मी विकास केला नाही. मी कामांचा लेखाजोखाच घेऊन आलो आहे, असे सांगत त्यांचे डोळे पाणावले होेते. त्यानंतर मिनीटाभरासाठी माईक बंद ठेवण्यात आला. भर सभेत घडलेला हा प्रकार पाहून भाजपमध्ये दुफळी निर्माण झाल्याचे वातावरण तयार झाले होते. गांधी संतापलेले पाहून सर्वचजण अवाक झाले. अखेर पक्षश्रेष्ठींनी त्यांची समजूत घातली. थोडा वेळ बोलल्यानंतर त्यांनी भाषण आटोपते घेतले. हा किस्सा आज विशेष चर्चिला जात आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख