नगर जिल्हा परिषद ! अर्सेनिकची परिणामकारकता संशयाच्या फेऱ्यात - Nagar Zilla Parishad! The effectiveness of arsenic is in doubt | Politics Marathi News - Sarkarnama

नगर जिल्हा परिषद ! अर्सेनिकची परिणामकारकता संशयाच्या फेऱ्यात

दाैलत झावरे
मंगळवार, 16 मार्च 2021

कोरोनाबाधितांचे जिल्ह्यातील आकडे पाहता, गोळ्यांवरील पैसे पाण्यात गेल्याचेच स्पष्ट होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वतंत्र समिती नेमून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता सदस्यांमधून होत आहे.

नगर : जिल्हा परिषदेने कोरोना काळात नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप गाजावाजा करीत केले. मात्र, सध्याचा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, या गोळ्यांची परिणामकारताच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

गोळ्यांचे वाटप व्यवस्थित झाले की नाही, यावरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी आता जिल्हा परिषद सदस्यांमधून होत आहे. 

हेही वाचा.. जाळलेल्या ऊसाचा शेवट गोड

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आयुष मंत्रालयाने अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने याबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व जिल्हा परिषदांना दिल्या होत्या. जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यासाठी जिल्हा परिषदेला तब्बल नऊ महिने लागले. जिल्हा परिषदेच्या दप्तरी गोळ्यांचे वाटप पूर्ण झाल्याची नोंद आहे. या गोळ्यांचे वाटप झाले तर कोरोनाबाधितांची संख्या कशी वाढत आहे? गोळ्यांचा दर्जा निकृष्ट होता का, असे प्रश्‍न आता उपस्थित केले जात आहेत.

कोरोनाबाधितांचे जिल्ह्यातील आकडे पाहता, गोळ्यांवरील पैसे पाण्यात गेल्याचेच स्पष्ट होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वतंत्र समिती नेमून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता सदस्यांमधून होत आहे. 

हेही वाचा.. सेवा संस्था होणार आॅनलाईन

गोळ्यांबाबत प्रश्नचिन्ह

जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्यासाठी अर्सेनिकवर खर्च केला आहे. एकंदरीत, कोरोनाबाधितांचे ग्रामीण भागातील जे आकडे समोर येत आहेत, त्यावरून प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. नागरिकांनी या गोळ्या घेतल्या की नाही, असा संशय आहे. त्यामुळे, ज्यांना गोळ्या दिल्या, त्यांची माहिती प्रशासनाने घेऊन अर्थसंकल्पीय सभेत सादर करावी, असे मत जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी व्यक्त केले.

बाधीतांची संख्या वाढलीच कशी

जिल्हा परिषद प्रशासनाकडून गोळ्यांचे वाटप झाले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, गोळ्या वाटल्या असतील, तर बाधितांची संख्या वाढली कशी? नागरिकांची प्रतिकारशक्ती का वाढली नाही, असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करणे गरजेचे आहे, असे जिल्हा परिषदेचे सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी व्यक्त केले.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख