नगर महापालिका ! अविनाश घुले यांच्या `बिनविरोध`ला खोडा - Municipal Corporation! Get rid of Avinash Ghule's 'unopposed' | Politics Marathi News - Sarkarnama

नगर महापालिका ! अविनाश घुले यांच्या `बिनविरोध`ला खोडा

अमित आवारी
बुधवार, 3 मार्च 2021

अर्ज दाखल करतानाही सूचक व अनुमोदकांसह शिवसेनेचे पदाधिकारी गैरहजर होते. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक फुटल्याची चर्चा होती.

नगर : महापालिकेतील स्थायी समिती सभापतिपदासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अविनाश घुले यांची निवड होण्याची शक्यता आहे. असे असताना शिवसेनेच्या वतीने दोन अर्ज दाखल झाल्याने खोडा बसला आहे.

आज शिवसेनेचे विजय पठारे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, दोन्ही अर्जांवरील अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्याच बोगस असल्याचा आक्षेप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अविनाश घुले यांनी घेतला.

अर्ज दाखल करतानाही सूचक व अनुमोदकांसह शिवसेनेचे पदाधिकारी गैरहजर होते. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक फुटल्याची चर्चा होती.

हेही वाचा... त्यांनी घेतला मलिदा 

"स्थायी'च्या सभापतिपदासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यात शिवसेनेकडून विजय पठारे यांनी दोन अर्ज दाखल केले. त्यांवर रिता भाकरे सूचक आहेत, तर एका अर्जाला परसराम गायकवाड आणि दुसऱ्या अर्जाला सचिन शिंदे अनुमोदक आहेत. मात्र, अर्जावरील सह्या गायकवाड व शिंदे यांच्या नसल्याचा आक्षेप घुले यांनी घेतला. गायकवाड नगरमध्येच नसल्याचे घुले ठामपणे सांगत होते. 

भाजपची आरोळी हवेत विरली 

महापालिकेत भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व बसपची सत्ता आहे. मात्र, त्याच वेळी राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेतेपद आहे. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादी वेगळे असल्याचा आभास निर्माण करतात. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी सभापतिपदासाठी भाजपचा उमेदवार असेल, असे सांगत दोन दिवसांपूर्वी दंड थोपटले होते. मात्र, प्रत्यक्षात भाजपने उमेदवार दिलाच नाही. शिवाय, घुले यांचा अर्ज दाखल करताना ते त्यांच्यासमवेत दिसले. भाजपचे मनोज कोतकर यांनी गेल्या वेळी राष्ट्रवादीचा पंचा गळ्यात घालून सभापतिपद मिळविले. त्यावेळीही गंधे यांनी कोतकर यांच्यावर कारवाईसाठी रणशिंग फुंकले; मात्र प्रत्यक्षात काहीच झाले नाही.

हेही वाचा... कुलगुरुपदी प्रशांतकुमार पाटील 

चित भी मेरी, पट भी मेरी.. 

पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासमोर उद्या (गुरुवारी) दुपारी तीन वाजता गायकवाड व शिंदे यांना उपस्थित राहून, सह्या आपल्याच असल्याचे सांगावे लागणार आहे. तसे झाल्यास पठारे यांना पाच, तर घुले यांना 11 मते मिळू शकतात. मात्र, हे दोघे अनुपस्थित राहिल्यास घुले यांचा एकतर्फी विजय होईल. या दोघांनी सह्या नाकारल्यास पठारे यांचा अर्ज बाद होऊन घुले यांची बिनविरोध निवड होईल. 

शिवसेनेने "अश्‍वमेध' अडविला 

नगरसेवक घुले यांची बिनविरोध निवड व्हावी, यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी प्रयत्न केले. मात्र, विजय पठारे यांनी अर्ज दाखल करीत खोडा घातला. त्यामुळे राज्यात शिवसेना-राष्ट्रवादीचे जुळले असले तरी नगरमध्ये या दोन्ही पक्षांतून विस्तवही जात नसल्याचे पुन्हा अधोरेखित झाले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख