"त्यांनी' घेतला "मलिदा' अन्‌ ठेकेदारांकडून उकळले पैसे ! या नेत्याने केली भांडाफोड - "They took 'Malida' and boiled money from contractors!" This leader made a scandal | Politics Marathi News - Sarkarnama

"त्यांनी' घेतला "मलिदा' अन्‌ ठेकेदारांकडून उकळले पैसे ! या नेत्याने केली भांडाफोड

मनोज जोशी
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

भाजप व शिवसेनेच्या काही नगरसेवकांचे कुठे आर्थिक संबंध आहेत, कोणी कोणाकडून मलिदा घेतला, ठेकेदारांकडे कोण पैसे मागतो, आरक्षणावरून राजकारण, अतिक्रमण काढण्यास कोणता माजी नगराध्यक्ष आडवा येतो.

कोपरगाव : भाजप व शिवसेनेच्या काही नगरसेवकांचे कुठे आर्थिक संबंध आहेत, कोणी कोणाकडून मलिदा घेतला, ठेकेदारांकडे कोण पैसे मागतो, आरक्षणावरून राजकारण, अतिक्रमण काढण्यास कोणता माजी नगराध्यक्ष आडवा येतो, अशा एक ना अनेक विषयांवर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा भांडाफोड केला आहे. 

वहाडणे पत्रकार परिषदेत म्हणाले, "उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी पाणीपुरवठा योजनेचे ठेकेदार विजय कन्स्ट्रक्‍शन यांच्याकडून दीड लाख रुपये घेतले म्हणून त्यांच्या नेत्यांनी त्यांना खडे बोल सुनावले. याची गावभर चर्चा झाली होती. निखाडे व वाजे संबंधित ठेकेदाराकडे वारंवार आर्थिक मागणी करत होते. अन्य ठेकेदारांकडेही वारंवार आर्थिक मागणी केली जाते. माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांच्या प्रभागातील एका कामाचे आदेश नसताना, वाजे यांनी ठेकेदाराच्या नावावर काम केले. त्यावर त्यांनी "माझे संबंधित कामात लाखो रुपये गुंतले असल्याने बिल मंजूर करा,' अशी मागणी केली. ते दहा लाखांचे बिल मंजूर करण्यात आले. नगरसेवक कैलास जाधव यांनी, "सर्व्हे नंबर 210 मधील आरक्षण उठविण्यास काही लोक पैसे घेऊन आले होते; ते आम्ही नाकारले,' असे जाहीर सभेत सांगितले. त्यामुळे लाच देणाऱ्या व्यक्तीचे नाव त्यांनी जाहीर करून त्यांच्या विरोधात जाधव यांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वहाडणे यांनी केली. 

हेही वाचा... आमदार काळे भेटले शरद पवारांना

जलशुद्धीकरण केंद्राजवळील जाधव यांचे अतिक्रमण काढू नये म्हणून जाधव वैयक्तिक भेटून विनवण्या करतात. मात्र, त्यांच्या शेजारील अतिक्रमण काढून टाकावे म्हणून मागणी करतात. उपनगराध्यक्ष निखाडे जाधव यांचे अतिक्रमण काढून टाका म्हणून खासगीत येऊन बोलतात. म्हणजे भाजप नगरसेवकच एकमेकांची जिरवत असल्याचा खुलासा त्यांनी केला. 

हेही वाचा... जिल्हा बॅंकेची माळ कोणाच्या गळ्यात

शिवसेनेचे गटनेते नगरसेवक योगेश बागूल यांनी, "आपल्या प्रभागातील 84 लाख रुपयांचे गटाराचे काम आपल्या मर्जीतील ठेकेदार ज्ञानेश्वर गोसावी यांना मिळावे म्हणून प्रयत्न करा,' असे माझ्या दालनात येऊन सांगितले. मात्र, ते काम आपल्या ठेकेदाराला मिळत नसल्याचे कळाल्याने त्यांनी सभेत गोंधळ घालून कामास विरोध केला, यासह वहाडणे यांनी अनेक खुलासे केले. दरम्यान, याची चर्चा महाराष्ट्रभर होत आहे.

लवकरच मोठा खुलासा करणार 

ठेकेदारांकडे पैशांची मागणी करणारे कोण, "आमचा वाटा दे नाही तर बिल अडवू' म्हणणारे कोण, 24 तास पाणी वापरणारे कोण, हे लवकरच जाहीर करणार असल्याचेही वहाडणे यांनी या वेळी सांगितले. 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख