आघाडी सरकार टिकाऊ नाही : आमदार विखे - Leading government not sustainable: MLA Vikhe | Politics Marathi News - Sarkarnama

आघाडी सरकार टिकाऊ नाही : आमदार विखे

गाैरव साळुंके
शनिवार, 13 मार्च 2021

राज्यातील सरकारने अनेक कामांच्या निधीला कात्री लावली. सरकारकडे कामे नेल्यास कोरोनाचे कारण पुढे केले जाते. राज्य सरकार भ्रष्टाचाराचा आरसा बनला आहे. याबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही.

श्रीरामपूर : "भाजप कार्यकर्त्यांसाठी भविष्य उज्ज्वल आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार टिकाऊ नाही. उलट, विरोधी गटाला उज्ज्वल भविष्य आहे. आगामी पालिका निवडणुकीत नवीन फळी तयार करू. नवीन चेहऱ्यांना ज्येष्ठांची सोबत लागेल. पंचायत समितीच्या निवडणुका भाजप स्वतंत्र लढविणार आहे. पालिकांबाबत लवकरच निर्णय घेणार आहोत,'' असे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. 

येथील कार्यकर्त्यांच्या सहविचार मेळाव्यात ते बोलत होते. विखे पाटील म्हणाले, "राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर तालुक्‍यासह जिल्ह्यात अनेक स्थित्यंतरे पाहायला मिळाली. राजकारणात प्रत्येकाचा हेतू वेगळा असतो. "तुझं माझं जमेना आणि तुझ्याविना करमेना,' अशी अवस्था राज्य सरकारची झाली आहे.

हेही वाचा... निळवंडेसाठी 365 कोटींची तरतूद

शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला. लाखो रुपयांची वीजबिले पाठवून सक्तीने वसुली केली. याबाबत सभागृहात सरकारला धारेवर धरले. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.'' 

"राज्यातील सरकारने अनेक कामांच्या निधीला कात्री लावली. सरकारकडे कामे नेल्यास कोरोनाचे कारण पुढे केले जाते. राज्य सरकार भ्रष्टाचाराचा आरसा बनला आहे. याबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही. मात्र, सत्ताधाऱ्यांना कधी तरी लोकांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी गावपातळीवर संघटन मजबूत करावे,'' असे आवाहन विखे पाटील यांनी केले. 

नानासाहेब पवार, दीपक पटारे, प्रकाश चित्ते, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, नानासाहेब शिंदे, बबन मुठे उपस्थित होते. भाऊसाहेब बांद्रे यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब तोरणे यांनी आभार मानले. 

हेही वाचा.. नगर अर्बनच्या चार जणांना अटक

लोकप्रतिनिधींचा अधिकाऱ्यांवर दबाव 

विखे पाटील म्हणाले, ""तालुक्‍यातील लोकप्रतिनिधी आपल्यासोबत नाहीत. सहकारी कारखानदारांसह पालिकेतील सत्ताधारी आपल्यासोबत नाहीत. त्यामुळे आपल्याला लढावे लागणार आहे. सरकार कोणाचेही असो; अधिकाऱ्यांना नियमांनुसार काम करावे लागते. दुर्दैवाने लोकप्रतिनिधींचा अधिकारी वर्गावर दबाव आहे.'' 

दरम्यान, विखे पाटील यांनी सरकारवर विविध प्रश्नांवर टीका केली. सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आगामी काळात विविध संस्था ताब्यात घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी चांगले कामे करावेत, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख