निळवंडेसाठी 365 कोटींची तरतूद, पाठपुराव्याला यश : विखे पाटील - Provision of Rs. 365 crore for Nilwande, success to follow up: Vikhe Patil | Politics Marathi News - Sarkarnama

निळवंडेसाठी 365 कोटींची तरतूद, पाठपुराव्याला यश : विखे पाटील

सतीश वैजापूरकर
गुरुवार, 11 मार्च 2021

निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली होती.

शिर्डी : "भाजप सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या पुढाकारातून अकोले तालुक्‍यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागले. धरणाच्या मुखाजवळ रखडलेल्या कालव्यांच्या कामांना त्यामुळे गती मिळाली. आता अर्थसंकल्पात 365 कोटींची तरतूद झाल्याने कालव्यांची कामे वेगाने पूर्ण होतील,'' असा विश्वास आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. 

पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, "निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली होती. कालव्यांच्या कामांसाठी 500 कोटींची तरतूद करण्याची मागणी केली होती. त्यासाठी आवश्‍यक प्रस्ताव जलसंपदा विभागाने सादर केले होते. निळवंडे कालव्यांची कामे निधीअभावी खोळंबल्याचे आपण या भेटीत त्यांच्या निदर्शनास आणून दिले.'' 

हेही वाचा... हे तर केवळ आकड्यांचे फुलोरे

कालव्यांसाठी अर्थसंकल्पात 365 कोटी रुपये मंजूर झाले. अन्य तालुक्‍यांतील भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे भूसंपादनाअभावी कामे बंद असणाऱ्या ठिकाणीही आता कालव्यांची कामे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला,'' असे विखे पाटील म्हणाले. 

"केंद्र सरकारकडून या प्रकल्पासाठी निधी मिळविण्यासाठी सतत पाठपुरावा केला. भाजप सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्यामुळे "नाबार्ड'कडून निधी मिळविण्यातील अडचणी दूर झाल्या.

कालव्याच्या मुखाशी असलेल्या अकोले तालुक्‍यातील कालव्यांची कामे बंद असल्याने मोठी अडचण झाली होती. मात्र, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या भागातील प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी त्या वेळी दूर करण्यात यश आले. त्यामुळे धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच कालव्यांच्या मुखापासून वेगाने काम सुरू झाले,'' असे विखे पाटील यांनी सांगितले. 

हेही वाचा... 

तरुणाईत खिलाडुवृत्ती हवी

कोपरगाव : तरुणाईमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता, सोशल मीडियाचा भरपूर वापर, आलेले नैराश्य त्यातून होणाऱ्या आत्महत्या यावर मात करण्यासाठी आयुष्यात खिलाडूवृत्ती जोपासली जाण्यासाठी वेगवेगळ्या मैदानी खेळांच्या स्पर्धा आयोजित करणे काळाची गरज असल्याचे मत कोपरगाव औद्योगिक वसाहतचे चेअरमन व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सह बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा... राज्याला चालना देणारा अर्थसंकल्प

के बी पी शाळेच्या मैदानावर युवा नेते विवेक कोल्हे चषकाचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. टिळक चौक मिञ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक लकारे यांनी स्पर्धेची माहिती दिली. 
कोल्हे म्हणाले की, महाविद्यालयीन काळात खेळाडू म्हणून अनेक मैदानी स्पर्धा गाजवल्या. त्यामुळेच राजकीय,सामाजिक क्षेत्रात काम करतांना व मैदान गाजवायला खिलाडुवृत्तीचा मला फायदा झाला आहे.
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख