जामखेड पालिकेचा "प्लॅन बावीस हजार' ! सुनंदा पवार यांचा पुढाकार

आमदार पवार यांच्या मातुःश्री सुनंदा पवार यांच्या पुढाकारातून पाच हजार चारशे रोपे विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
Sunanda pawar.jpg
Sunanda pawar.jpg

जामखेड : जामखेडकरांना भरपूर ऑक्‍सिजन मिळावा, सावली मिळावी, निसर्गाचा समतोल राखला जावा, शहर हिरवाईने नटावे, याकरिता नगरपालिकेने "प्लॅन बावीस हजार' हाती घेतला आहे. या योजनेतून शहरात बावीस हजार झाडांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

पहिल्या टप्प्यात मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी सुचविलेल्या विविध वाणांपैकी सहा प्रकारचे वाण उपलब्ध झाले आहेत. आंध्र प्रदेश व कर्नाटकातील रोपवाटिकांतून ही रोपे आणण्यात आली आहेत. उद्या (ता. 4) डॉ. आरोळे संचालित ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या प्रांगणात पालिकेला ही रोपे देण्यात येणार आहेत. यासाठी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. आमदार पवार यांच्या मातुःश्री सुनंदा पवार यांच्या पुढाकारातून पाच हजार चारशे रोपे विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 

मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत काम करणाऱ्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे नियोजन केले आहे. जामखेड येथील कृषिभूषण रवींद्र कडलग यांचेही सहकार्य मिळत आहे. नगरपालिकेने तेराशे रोपे लावली आहेत. पंचायत समिती व जांबवाडी जिल्हा परिषद शाळेसमोर लावलेल्या रोपांसाठी सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी ठिबक सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

पालिका पुरविणार लोखंडी जाळ्या 

ही रोपे शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा, तसेच लोकवस्त्यांमध्येही लावली जाणार आहेत. या रोपांना पालिकेच्या वतीने लोखंडी जाळ्या बसविण्यात येणार आहेत. रोपांना पाणी घालण्यासाठी नगरपालिकेने दोन टॅंकरची व्यवस्था केली आहे. 

हेही वाचा...

कर्जतसाठी 18 लाख, जामखेडसाठी 27 लाखांचे अनुदान 

जामखेड : मागील वर्षी गारपीट व अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार व दरानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत केली जाते. कर्जतच्या शेतकऱ्यांना पूर्वी दोन टप्प्यांत पैसे मिळाले आहेत. या वेळी दोन्ही तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. 

पावसामुळे मागील वर्षी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात प्रामुख्याने कर्जत तालुक्‍यातील काही गावांना गारपिटीचा मोठा फटका बसला. आमदार पवार यांनी नुकसानग्रस्त भागाची अधिकाऱ्यांसह पाहणी केली होती. महसूल विभागाला तत्काळ पंचनाम्यांचा आदेश दिला. याबाबत पाठपुरावा केला. कर्जत तालुक्‍यासाठी तिसऱ्या टप्प्यातील मदत शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग होणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. 

कर्जत तालुक्‍यातील 10 गावांतील 287 शेतकऱ्यांना 18 लाख 11 हजार रुपयांचे अनुदान, तर जामखेड तालुक्‍यातील 19 गावांतील 391 शेतकऱ्यांना 27 लाख दोन हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग करण्यात येणार असल्याचे पवार म्हणाले. 

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार व दरानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आवश्‍यक मदतीचा तपशील कृषी आयुक्तांमार्फत पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. संयुक्त पंचनामे झाल्यानंतर 33 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली. 

कर्जत तालुक्‍यासाठी पहिल्या टप्प्यात 12 कोटी 59 लाख रुपये आले होते, दुसऱ्या टप्प्यात 5 कोटी 10 लाख रुपये आले. आता तिसऱ्या टप्प्यातील रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

Edited By- Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com