खासदार विखेंच्या पाठपुराव्याला गडकरी पावले ! रस्त्यांसाठी दिले 35 कोटी - Gadkari steps to follow MP Vikhen! 35 crore paid for roads | Politics Marathi News - Sarkarnama

खासदार विखेंच्या पाठपुराव्याला गडकरी पावले ! रस्त्यांसाठी दिले 35 कोटी

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

जिल्ह्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कल्याण- नगर- नांदेड राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी 35 कोटी 42 लाखांचा निधी मंजूर झाला आहे,

नगर : जिल्ह्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कल्याण- नगर- नांदेड राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी 35 कोटी 42 लाखांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. 

पत्रकात म्हटले आहे, की कल्याण व नांदेड या दोन प्रमुख शहरांबरोबरच विभागांनाही जोडणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्गी लागावे, अशी मागणी होत होती. जिल्ह्याच्या औद्योगिक व व्यापारी क्षेत्राबरोबरच तीर्थक्षेत्रांना भेटी देणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन, या महामार्गाचे काम गतीने होण्यासाठी रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आपण पाठपुरावा केला होता. या रस्ताकामाच्या प्रस्तावास मंजुरी मिळून 35 कोटी 42 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. 

हेही वाचा.. जिल्हा बॅंकेची माळ कोणाच्या गळ्यात

या निधीतून नेप्ती चौक ते सक्‍कर चौक (सहा किलोमीटर), स्टेट बॅंक ते चांदबीबी महाल (दहा किलोमीटर), चांदबीबी महाल ते मेहेकरी (चार किलोमीटर) हे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाणार आहे. या मार्गाला निधी उपलब्ध झाल्याने जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रालाही फायदा होईल. याच निधीत नगर शहरातील रेल्वे पूल ते सक्कर चौक या भागातील रस्त्याचे डांबरीकरण व रेल्वे पूल ते सीना नदीपात्रापर्यंत कॉंक्रिट गटारकामाचा समावेश असल्याचेही खासदार विखे पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे. 

 

हेही वाचा...

अकरा गावांचा वीजपुरवठा बंद 

संगमनेर : कृषिपंपांच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणने तालुक्‍यातील अकरा गावांचा वीजपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांना निवेदन देऊन महावितरणविरोधात उद्या (रविवारी) शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत. 

हेही वाचा... साईसंस्थानच्या रुग्णालयात मोठे षडयंत्र

तालुक्‍यातील रहीमपूर, कनोली, मनोली, ओझर बुद्रुक व खुर्द, कोकणगाव, निमगाव जाळी, उंबरी, जोर्वे, कोल्हेवाडी, मेंढवण आदी गावांतील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून, उद्या (रविवारी) सकाळी नऊ वाजता कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील कोकणगाव येथे "रास्ता रोको' आंदोलन करण्याचा इशारा देणारे निवेदन आज प्रशासनाला देण्यात आले. 

कोरोना संकटात शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाले आहेत. त्यातच या गावांमध्ये अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले. त्यात भर म्हणून थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता वीजजोड खंडित करीत आहेत. त्यामुळे शेतकरी अधिकच संतप्त झाले आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्याने, पाणी न दिल्यास पिके जळण्याचा धोका आहे. हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावला जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर वीज वितरण कंपनीने वीजजोड तोडण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अन्यथा शेतकरी आंदोलन करतील. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख