सावधान, कोरोना वाढतोय ! बोल्हेगावातील तीन ठिकाणे  "मायक्रो कंटेन्मेंट झोन'  - Beware, Corona is growing! Three places in Bolhegaon called 'Micro Containment Zone' | Politics Marathi News - Sarkarnama

सावधान, कोरोना वाढतोय ! बोल्हेगावातील तीन ठिकाणे  "मायक्रो कंटेन्मेंट झोन' 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 13 मार्च 2021

जिल्ह्यात काल (शुक्रवारी) 509 कोरोनाबाधित आढळले. त्यांत शहरातील रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून विशेष पथके तयार केली आहेत.

नगर : शहरातील बोल्हेगाव परिसरातील तीन ठिकाणे महापालिका प्रशासनाने एकाच वेळी 14 दिवसांसाठी "मायक्रो कंटेन्मेंट झोन' म्हणून जाहीर केली. शहरात तब्बल सहा महिन्यांनंतर पुन्हा कंटेन्मेंट झोन जाहीर झाला आहे. बोल्हेगाव परिसरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिका आयुक्‍त शंकर गोरे यांनी हा निर्णय घेतला. 

जिल्ह्यात काल (शुक्रवारी) 509 कोरोनाबाधित आढळले. त्यांत शहरातील रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून विशेष पथके तयार केली आहेत. तसेच, औषधफवारणीसाठीही पथके तैनात केली आहेत. बोल्हेगाव परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने, हा परिसर 26 मार्चपर्यंत मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे. त्यात गणेश चौक ते राघवेंद्र स्वामी मंदिर रस्त्याची पूर्व बाजू, कैलास-बी इमारत, राघवेंद्र स्वामीनगर परिसरातील संध्या जनरल स्टोअर्स ते उत्तरेकडील अपार्टमेंटपर्यंत व मनोलीलानगर येथील डहाळे ज्वेलर्स ते भानुदास लोटके यांच्या निवासस्थानापर्यंत मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. 

हेही वाचा.. गडाखांनी काय मध्यस्थी केली

महापालिकेचे शहर अभियंता सुरेश इथापे, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागाची आज सकाळीच पाहणी केली. हा परिसर पत्रे लावून "सील' करण्यात आला. परिसरात महापालिकेचे कर्मचारी जीवनावश्‍यक वस्तू सशुल्क पुरवतील, तसेच महापालिकेचा आरोग्य विभाग या परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविणार आहे. या भागातील सर्व दुकाने, आस्थापना, खासगी सेवा बंद राहतील. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला पोलिस प्रशासनाने दिला आहे. 

कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन, महापालिकेचे कर्मचारी आज सुटीच्या दिवशीही कामावर हजर होते. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र यंत्रणाच उभी केली आहे. 

हेही वाचा... प्रशांत गायकवाड यांचे अजितदादांनी ऐकले

या भागांतही वाढती रुग्णसंख्या 

शहरातील हातमपुरा, माणिकनगर, माळीवाडा, सारसनगर, वैष्णवनगर, केडगाव गावठाण, दूधसागर सोसायटी, मोतीनगर, लोंढे मळा, डॉन बॉस्को, सावेडी नाका, भिस्तबाग, नंदनवन, पितळे कॉलनी भागात कोरोनाबाधित वाढत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून या भागात विशेष दक्षता घेतली जाण्याची शक्‍यता आहे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख