थोरातांच्या जोर्वेत विखे पाटील म्हणाले, `त्यांचा` बंदोबस्तच करू  - balasaheb thorat todays news, Vikhe Patil said, "We will take care of them." | Politics Marathi News - Sarkarnama

थोरातांच्या जोर्वेत विखे पाटील म्हणाले, `त्यांचा` बंदोबस्तच करू 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

शिर्डी मतदारसंघात विकासप्रक्रिया निरंतर सुरू आहे. आतापर्यंत जोर्वे येथेच 16 कोटींची विकासकामे मार्गी लावली. विकासकामांना निधी कमी पडणार नाही, फक्त तुम्ही धाडस दाखवा.

संगमनेर : "शिर्डी मतदारसंघात विकासप्रक्रिया निरंतर सुरू आहे. आतापर्यंत जोर्वे येथेच 16 कोटींची विकासकामे मार्गी लावली. विकासकामांना निधी कमी पडणार नाही, फक्त तुम्ही धाडस दाखवा. विघ्नसंतोषी लोकांचा बंदोबस्त कसा करायचा, ते मी पाहतो. सत्तेच्या जोरावर जोर्व्यातील अनेक जण वाळू व्यावसायिक करतात. वाळू माफीयांमुळे सामाजिक सलोखा बिघडत असून, निवडणुकीत याच वाळूच्या पैशांचा जोर होता,'' अशा शब्दांत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळुतस्करांना खडसावले. 

जोर्वे हे गाव महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे मूळ गाव आहे. जोर्वे येथील ग्रामसंसद भवनाचे उद्‌घाटन, तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या लोकार्पण समारंभात विखे पाटील बोलत होते.

हेही वाचा... थोरातांना मुख्यमंत्री करायचेय, कामाला लागा

विखे पाटील म्हणाले, की दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे राज्यातील आघाडीचे नेते येथील शेतकऱ्यांची वीज तोडली जात असताना गप्प का, असा सवाल आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. शेतकऱ्यांवर पुतना मावशीचे प्रेम दाखविणाऱ्या आघाडी सरकारचा चेहरा उघड झाला आहे.

ते म्हणाले, ""कोविडच्या महाभयंकर संकटात राज्य सरकारने कोणतीही मदत केली नाही. जिल्ह्याचे तिन्ही मंत्री कुठे गायब होते, समजले नाही; परंतु आपण शक्‍य तेवढी मदत करून मतदारसंघातील सामान्यांना दिलासा देताना सामाजिक बांधिलकी जपली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकाराने आत्मनिर्भर भारत योजनेतून समाजातील प्रत्येक घटकास दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.'' 

हेही वाचा... तुमच्या खात्याचे कर्मचारी हलगर्जीपणा करतात

केंद्र सरकारच्या नवीन कृषी धोरणात शेती क्षेत्रातील बदलांचा अंतर्भाव असून, या विधेयकांना राजकीय द्वेषापोटी विरोध होत आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या कोणत्याही मागण्या पूर्ण केल्या नाहीत. शेतकरी, दूधउत्पादकांवर सरकारकडून अन्याय सुरू आहे. राहाता बाजार समितीने दलाल बाजूला करून शेतमालाचा थेट लिलाव सुरू केला. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत असल्याचे विखे पाटील म्हणाले.

दरम्यान, संगमनेर तालुक्यात शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे अनेक गावे आहेत. त्यामुळे आमदार या नात्याने विखे पाटील यांचे या भागाकडे विशेेष लक्ष असते. थोरात व विखे पाटील यांचे विळ्या-भोपळ्याचे राजकारण सर्वांना ज्ञात आहे. त्या पार्श्वभूमीवर विखे यांनी वाळुतस्करांना खडसावले असले, तरी अप्रत्यक्षपणे थोरात यांच्या कार्यकर्त्यांनाच टोला लगावला आहे. त्यामुळे या वक्तव्याची परिसरात जोरदार चर्चा आहे. महाराष्ट्रातही याबाबत चर्चिले जात आहे.

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख