चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत वेळीच पाऊल उचलले असते तर...! - If Chandrakant Patil had taken the step in time in Sangli ...! | Politics Marathi News - Sarkarnama

चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत वेळीच पाऊल उचलले असते तर...!

बलराज पवार
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

यावर भाजपच्या कोअर कमिटीत चिंतन होईल. पण, महापालिकेतील आपले उर्वरित नगरसेवक सांभाळणे हेच आता त्यांच्यासमोर पहिले आव्हान असेल 

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेतील सत्तांतर राज्यभर चर्चेचा विषय बनले आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यातील राजकीय द्वंद्वात पुन्हा एकदा जयंत पाटील भारी पडले. मात्र, या सत्तांतराला कॉंग्रेस आघाडीपेक्षा आपल्याच पक्षातील असंतोषाकडे भाजप नेत्यांनी केलेले दुर्लक्ष भोवले आहे.

यावर भाजपच्या कोअर कमिटीत चिंतन होईल. पण, महापालिकेतील आपले उर्वरित नगरसेवक सांभाळणे हेच आता त्यांच्यासमोर पहिले आव्हान असेल !

हेही वाचा... जयंत पाटलांनी सांगलीत कसा करेक्ट कार्यक्रम केला

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेत सन 2018 मध्ये प्रथमच भाजपची स्वबळावर सत्ता आली होती. कॉंग्रेसचे नेते मदन पाटील हयात असेपर्यंत महापालिकेचे राजकारण त्यांच्याभोवती फिरत होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर कॉंग्रेस एकसंध राहिली नाही. शिवाय, राज्यात भाजप-शिवसेना महायुतीची सत्ता होती. त्याचा फायदा घेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली महापालिकेतील कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. आधी कॉंग्रेस, राष्ट्रवादीला खिंडार पाडून भाजपमध्ये मेगाभरती करून घेतली. मग स्वबळावर 41 जागा जिंकून महापालिकेवर झेंडा फडकवला.

हेही वाचा... भाजपच्या त्या नगरसेवकांवर कारवाई होणार

पदे देण्याचा विसर

भाजपमध्ये महापालिका क्षेत्रातील कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या दिग्गजांचा प्रवेश करताना त्यांना योग्य संधी देण्याचा शब्द देण्यात आला; तर सत्ता आल्यावर भाजपच्या सगळ्या नगरसेवकांना पदे मिळतील, त्यांना संधी दिली जाईल असा शब्द भाजपच्या नेत्यांनी दिला होता. पाहता-पाहता अडीच वर्षे सरली. देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका जिंकताच थेट 100 कोटींचा निधी बक्षीस म्हणून जाहीर केला. तो मिळाल्यावर काही कामे सुरूही झाली. दरम्यान, भाजपच्या सत्तेत ठराविक नगरसेवक, नेत्यांची मक्तेदारी सुरू झाली. तेच-तेच लोक पदे भोगू लागले आणि अन्य लोकांना पदे देण्याचा नेत्यांना विसर पडल्याने अंतर्गत कुरबूर सुरू झाली.

उपमहापौरांनी केली सुरवात

पक्षात सुरू असलेली कुरबूर नेत्यांपर्यंत पोचूनही त्यावर वेळीच मार्ग काढला गेला नाही. त्यामुळे असंतोष वाढत गेला आणि त्याची परिणती सत्ता जाण्यात झाली. वाढत्या असंतोषाची सुरवात नवीन गटनेता निवडीवेळी दिसली होती. उपमहापौर आनंदा देवमाने यांनी पक्षाच्या बैठकीतच जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. नेते दिलेला शब्द पाळत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपपासून दोन हात लांब राहणे पसंत केले. स्थायी समितीत संधी न मिळाल्याबद्दलही काही जण नाराज होते. कोअर कमिटीतील नेत्यांच्या मुलांना संधी मिळणे, काही नेत्यांनी मर्जीतील कार्यकर्त्यांची वर्णी लावणे याबद्दलही काही जण नाराज होते; तर नेते ऐकत नाहीत आणि प्रशासन कामे करीत नाही म्हणून काही जण नाराज होते.

 

Edited By- Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख