जयंत पाटलांनी सांगलीत कसा `करेक्ट कार्यक्रम` केला त्याची ही कथा! - how Jayant patil snatches power from bip in Sangali corporation | Politics Marathi News - Sarkarnama

जयंत पाटलांनी सांगलीत कसा `करेक्ट कार्यक्रम` केला त्याची ही कथा!

शेखर जोशी
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

सांगलीत महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने त्यावर राजकीय धुमशान माजले आहे. हे सारे नक्की कसे घडले, हे जाणून घ्यायलाच हवे!

सांगली : अडीच वर्षापूर्वी अत्यंत चुरशीच्या सामन्यात भाजपने काठावरचे बहुमत घेत घेतलेली सांगली महापालिकेची सत्ता ब्रॅन्डेड कमळ चिन्हावर ताब्यात घेतली होती. (हा ब्रॅन्डेड हा शब्द चंद्रकांतदादांचा आहे) अर्थात मोठ्या प्रमाणात दोन्ही कॉंग्रेसमधील रेडीमेड नगरसेवकच उमेदवार म्हणून फोडून घेतले त्यांना निवडून आणले, ही त्यांची कामगीरी होती. आता त्यांच्या आकांक्षा पूर्ण होत नसल्याने भाजपच्या जहाजाला अनेक भोके पडू लागली होती. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने या जहाजाला आज सत्तेतून समाधी दिली एवढेच! या निमित्ताने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपचे आणि चंद्रकांतदादा यांच्याबरोबरचे अनेक हिशेबही पूर्ण केले. अर्थात कॉंग्रेस साथ दिल्यानेच हे घडले. 

गेले वर्षभर महापालिकेत आयुक्‍तांकडूनच सत्ताधाऱ्यांना डावलून निर्णय घेतले जात होते. महापौरांसह सर्व पदाधिकारी नामधारी झाले होते. भाजपची सत्तेवरची कमांडच संपली होती. भाजपचे नगरसेवक आपल्या कब्जात घेण्याची खेळी राष्ट्रवादीचीच पण त्यास कॉंग्रेसची नेमकी साथ मिळाल्याने भाजपचा `करेक्‍ट कार्यक्रम` झाला. (कार्यक्रम हा शब्द सतत जयंत पाटील वापरत असतात) या निवडणुकीची धुरा महापालिकेत छोटा भाऊ असलेल्या राष्ट्रवादीने हाती घेतली होती. त्याला जयश्री पाटील, विश्‍वजित कदम आणि विशाल पाटील या कॉंग्रेस नेत्यांनी फक्त मम म्हटले. भाजपला 41 पैकी आपले 36 सदस्य टिकवतानाही धाक दाखवावा लागला. 

सोनेरी टोळीच खरी कारभारी!

महापालिकेतील कारभारी स्वार्थासाठी कोणत्या टोकाला जातात याचा इतिहास संभाजी पवार, जयंत पाटील आणि दिवंगत नेते मदन पाटील या तिघांनीही अनुभवला आहे. वरकरणी हा सत्ताबदल वाटत असला तरी महापालिकेतील सोनेरी टोळीच कमी अधिक समीकरणे मांडून सत्तेत असते. याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. यावेळी पालिका राजकारणात नवखे असलेल्या सुधीर गाडगीळ, चंद्रकांतदादांना आला इतकेच. कारण या अनुभवातून माजी आमदार संभाजी पवार आणि खुद्द जयंत पाटीलही पोळले होते.

भाजपला अंदाज होता?

 भाजपने गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात आयात माल घेतला होता. आता त्याचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. स्थायी समितीचा सभापती निवड होतानाच भाजपला आपल्या जहाजाला भोके पडू लागल्याची कल्पना आली होती. भाजपचे दोन्ही आमदार, खासदार यांच्यातील संघर्ष आता लपून राहिलेला नाही. यापुढे तो अधिक ठळक होईल. खासदार संजयकाका पाटील यांचा जयंतरावांसोबतचा जुना याराणा आता अधिक उघड होत आहे. त्यामुळे एवढे वादळ भाजपमध्ये घोंगावत असताना संजय पाटील निवांत होते. 

संजय बजाज सूत्रधार ठरले

ज्या शहरात भाजपचे सात-आठ नगरसेवक एवढीच क्षमता होती ही क्षमता राज्यातील सत्ता आणि मोदी लाटेच्या कृपेने एवढी बहरली की, जिल्हा परिषदेपाठोपाठ महापालिकेवर भाजपचा झेंडा लागला. अडीच वर्षात काही गोष्टी चांगल्या झाल्या. सांगली शहरातील उड्डाण पूल, अतर्गंत रस्ते यांनी शहर गती घेईल असे वाटू लागले होते. भाजपची सत्ता आल्याने तात्कालिन फडणवीस सरकारने 100 कोटीचा निधी विकासाठी दिला, ही जमेची बाजू होती. पण सत्ता गेल्यानंतर भाजपचे टायटॅनिक होण्यास सुरूवात झाली होती. त्यातच भाजपचा कारभार ज्या शेखर इनामदार यांच्याकडे देण्यात आला त्यांनी सत्ता आणण्यात मोठी कामगिरी केली मात्र त्यानंतर सर्व नगरेसवकांना ते समाधानी ठेवू शकले नाहीत.

भाजपकडे नेता नव्हता

भाजपकडे सर्वांना एकत्र ठेवेल असा धाक असलेला एकही नेता नसल्याची कमतरता भासत होती. सभागृहात गटनेताही हतबल होता आणि इनामदार यांचेही नियंत्रण सुटले होते. त्यांनी आणि त्यांच्या मिरजेतील एका सहकार्याने आग्रह करून जे आयुक्‍त आणले तेच नंतर यांचे ऐकेना झाले आणि महापालिकेतील अंतर्गंत सूत्रे राष्ट्रवादीचे स्वीकृत संजय बजाजच चालवत असल्याच्या चर्चा महापालिका वर्तुळात अलिकडे कानी येवू लागल्या होत्या. आत्ताच्या सत्ता बदलातही बजाजच एक महत्त्वाचे सूत्रधार आहेत. याचे मोठे उदाहरण म्हणजे पाचशे कोटीचा कचरा प्रकल्पाच्या निविदा प्रक्रिया महापालिकेसाठी तोट्यात असतानाही त्यासाठी आग्रही राहिलेले आयुक्‍त आणि त्यांना साथ देणारी राष्ट्रवादी यांच्या विरोधात भाजपला चक्‍क रस्त्यावर उतरुन विरोध करण्याची वेळ आली होती. या प्रकल्पामुळे आपली भविष्यात बदनामी होणार हे भाजपला लक्षात येण्यास खूप उशीर झाला पण स्थायी समितीत हा ठराव रद्द करण्यासाठी दिव्य करावे लागले होते. येथूनच भाजपमधील अंतर्गंत नाराजीची ठिणगी पडली. पण त्यावेळी भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने सत्ता गेली तरी बेहत्तर पण निविदा रद्द करा असे फर्मान सोडले होते. यामुळे भाजपमधील आवटी गट नाराज झाला होता. त्यानंतर असेच काही ठराव महासभेत घुसडल्याचीही प्रकरणे बाहेर आली होती.

 

भाजपचा धोका जयंत पाटलांनी ओळखला

 भाजप येथे वाढला तो जयंत पाटील यांच्या सहकार्यानेच पण तो एवढा वरचढ होईल आणि इस्लामपूरातही आपल्याला धक्‍का देईल असे त्यांना वाटले नव्हते. थेट नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपने जयंत पाटील यांच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्यानंतर जिल्हा परिषदही ताब्यात घेतली, महापालिकेवरही कब्जा मिळवला. राष्ट्रवादीचे अनेक मोहरे त्यांनी फोडले. त्यामुळे जयंत पाटील यांच्यातील राजकारणी या संधीची वाटच पहात होता, भाजपला धडा शिकवायचा. कारण मध्यंतरी चंद्रकांत पाटील यांनी "इस्लामपूरात जंतरावांचाच परभाव झाला असता पण ते थोडक्‍यात वाचले', असे विधानही केले होते. त्यामुळे जयंत पाटील यांना आपली ताकाद दाखविण्याची जी संधी हवी होती ती आयती संधी इनामदारांच्या नेतृत्वाने सहजपणे महापौर निवडीत देवून टाकली असे आता त्यांच्याच पक्षातील लोक बोलू लागले आहेत. दोन महिान्यापूर्वीच जयंत पाटील यांनी "माझे शेखर इनामदारांवर खूप प्रेम आहे. त्यांनी बोलवले तरच मी महापालिकेत येईन', असे वक्‍तव्य केले होते. जयरावांचे ते विधान म्हणजे "कहीपे निगाहे कहिपे इशारा' होते. तरीदेखील भाजपवाले गाफिलच राहिले. यशाचे भागिदार अनेक असतात पण अपयशला कोणी वाली नसतो हे आता इनामदारांना कळेल. कारण सांगली महापालिकेतील यशामुळे कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून त्यांच्यावर चंद्रकांतदांदांनी जबाबदारी दिली आहे.

चंद्रकांतदादा लक्ष देण्यात कमी पडले

चंद्रकांतदादांनीही या सर्वांचा कारभार कसा चालला आहे याबाबत बारकाईने लक्ष देण्याची गरज होती. आमदार-खासदारांचे पटत नाही. दादांचे आणि खासदारांचे पटत नाही. विधानसभेलाही याचा जत, शिराळा येथे बसलेला फटका होताच. महापालिकेत तर लोकांनी स्वच्छ कारभार करा म्हणून दिलेला जनादेशही भाजपला पेलला नाही, असे खेदाने म्हणावे लागते. महापालिकेचे राजकारण म्हणजे जंगलाचा कारभार आहे येथे सावज टप्प्यात आल्यावर शिकारी होतात आणि कारभारी नेत्यांनाही कोलतात याचा अनुभव संभाजी पवार, मदन पाटील आणि जयंतरावांनी साक्षात घेतला होता. महाआघाडीत महापौर बदलाचा जयंत पाटील यांचा आदेश धुडकावत तत्कालिन महापौर इद्रिस नायकवडींनी सारी सत्ता आपल्या ताब्यात घेतली होती...पवारांचे अनेक चेले मदन पाटील व्हाया जयंत पाटील असे पक्ष बदलत गेले हा सारा इतिहास ज्यांना माहित आहे त्यांना भाजपची सत्ता उलथून टाकली याचे काही फार नवल वाटणार नाही. कारण "ये तो होना ही था! फक्‍त फारच लवकर झाले एवढच!' 

36 आकडा तरी कायम राहणार?

आता भाजपला जे त्यांच्याकडे शिल्लक 36 नगरसेवक आहेत त्यांना देखील जपण्यासाठी एकत्र ठेवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे कारण जोपर्यंत राज्यात सत्ता होती तोपर्यंत चंद्रकांतदादा म्हणेल ती पूर्व दिशा होती...आता सत्तेचे लाभ मिळत नसल्याने महापालिकेतील कारभारी सैरभैर झाले. मागील पाच वर्षात येथील कॉंग्रेस व राष्ट्रवादी खिळखिळी झाली होती. महापालिकेतील सत्तेने पुन्हा ती चार्ज होईल भविष्यात भाजपला मात्र विरोधक म्हणून काम करण्याचे मोठे आव्हान असेल.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख