जयंतराव आमची लोकशाही एवढी कमकुवत नाही; तपास यंत्रणांवरून भातखळकरांचा टोला - Jayantrao Our democracy is not so weak says MLA Atul Bhatkhalkar | Politics Marathi News - Sarkarnama

जयंतराव आमची लोकशाही एवढी कमकुवत नाही; तपास यंत्रणांवरून भातखळकरांचा टोला

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 29 जून 2021

बिनबुडाचे आरोप करून केवळ जनतेला घाबरवणे आणि भाजपविरुद्ध तसेच तपासयंत्रणांविरुद्ध लोकांचे मन कलुषित करणे हाच संबंधितांचा हेतू आहे

मुंबई : चार तपासी अधिकारी कोणाची तरी चौकशी करून देशाची लोकशाही कमकुवत करतील, अशी आमची लुटुपुटूची लोकशाही नाही. देशावर आणीबाणी लादून लोकशाहीला नख लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना यासंदर्भातील त्यांचा अनुभव विचारा, असा टोला भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांना लगावला आहे. 

तपाससंस्थाकडून अटकेतील आरोपींकडून काहीतरी वदवून घेण्याचा आणि त्याआधारे सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या लोकांना त्रास देण्याचा नवा प्रकार देशात भाजपने सुरु केला आहे, असा दावा पाटील यांनी नुकताच नांदेड येथे केला होता. आरोपांची भीती दाखवत राजकारणावर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणजे देशातील लोकशाही संपुष्टात येईल, अशी भीती व्यक्त करणारे विधान श्री. पाटील यांनी यावेळी केले होते.

हेही वाचा : धक्कादायक : पंचायत समिती सभापतीने केला RTI कार्यकर्त्यावर गोळीबार

केंद्र सरकारच्या तपाससंस्था असेच घाबरवण्याचे काम करीत राहिल्या तर देशातील लोकशाहीला सुरुंग लागेल, असाही आरोप त्यांनी केला होता. त्याला आमदार श्री. भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दोन-चार अधिकाऱ्यांनी आपल्याच पक्षातील कोणत्याही माजी मंत्र्याची चौकशी केली म्हणून त्या पक्षातील इतरांना दरदरून घाम फुटणे अगदी स्वाभाविक आहे. मात्र त्यामुळे देशातील लोकशाहीच धोक्यात येईल, असा राईचा पर्वत त्यांनी करू नये.

आवश्य वाचा : आमदार काळे - माजी आमदार कोल्हेंमध्ये रंगले श्रेयवादावरून नाट्य

मुळात असे बिनबुडाचे आरोप करून केवळ जनतेला घाबरवणे आणि भाजपविरुद्ध तसेच तपासयंत्रणांविरुद्ध लोकांचे मन कलुषित करणे हाच संबंधितांचा हेतू आहे. आपले काम प्रामाणिकपणे करणाऱ्या तपासयंत्रणांशी बादरायण संबंध जोडून असे आरोप करणाऱ्यांचे हेतूच अप्रामाणिक आहेत. 'कर नाही त्याला डर कशाला' हे ध्यानात ठेऊन संबंधितांना अशा चौकशांमुळे घाबरायचे काहीच कारण नाही. 

पण, खाई त्याला खवखवे अशी अनेकांची अवस्था झाली असल्यामुळे त्यांचा नाईलाज होतो, हे कोणीही सहज समजू शकतो, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे. पण अशा स्थितीत कोणी तपासयंत्रणांवर टीका केली तर एकवेळ ठीक आहे. तपासयंत्रणांचा राग भाजपवर काढला तरीही चालू शकते. पण तपासयंत्रणांमुळे थेट लोकशाहीच कमकुवत होईल, असा आरोप करणे म्हणजे आरोपकर्त्यांना लोकशाही समजलीच नाही हे स्पष्ट आहे.

लोकशाहीला नख लावण्याचा प्रयोग काँग्रेसने आणिबाणी लादून केला होता. मात्र तो यशस्वी झाला का, हे जयंतरावांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना विचारून पहावे. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम करण्यास 132 कोटी जनता, न्याययंत्रणा, राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, साहित्यिक इ. समर्थ आहेत. त्यामुळे लोकशाही कमकुवत होईल ही भीती कोणीही जनतेला दाखवू नये, असेही भातखळकर यांनी बजावले आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख