वारं कुठं वाहतंय..याचा अंदाज घेण्यासाठी मी माण तालुक्यात....  - I am in Maan taluka to guess where the wind is blowing says Sabhapati Ramraje Nimbalkar | Politics Marathi News - Sarkarnama

वारं कुठं वाहतंय..याचा अंदाज घेण्यासाठी मी माण तालुक्यात.... 

रूपेश कदम
सोमवार, 28 जून 2021

लोकांना गृहीत धरुन चालणार नाही, कारण माणच्या जनतेच्या मनात काय आहे हे सहजासहजी समजत नाही. अत्यंत सावध पावलं टाकून ही निवडणूक लढवावी लागेल.

दहिवडी : कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही. जिंकायच्या दृष्टीने काय करावं लागेल अन वारं कुठं वाहतंय याचा अंदाज घेण्यासाठी मी माण तालुक्यात आलोय, असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. I am in Maan taluka to guess where the wind is blowing says Sabhapati Ramraje Nimbalkar

दहिवडी (ता. माण) येथे बाजार समिती निवडणूकीच्या अनुषंगाने आयोजित राष्ट्रवादीच्या संवाद बैठकीत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, मनोज पोळ, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब पवार, उपसभापती तानाजी कट्टे, पंचायत समिती सदस्य नितीन राजगे, अभयसिंह जगताप, सुनिल पोळ, कविता म्हेत्रे, युवराज सुर्यवंशी, श्रीराम पाटील, विनय पोळ, तानाजी मगर, बाबूराव काटकर, जयप्रकाश कट्टे उपस्थित होते.

हेही वाचा : उद्धव काका, आमचं शिक्षण कधी सुरु होणार?

रामराजे म्हणाले, पुढील विधानसभेला तोंड देण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात असल्या पाहिजेत. त्यामुळे राजकारणात आपलं मुळ पक्कं करण्यासाठी या निवडणूका आहेत. ही मर्यादित मतांची निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही. लोकांना गृहीत धरुन चालणार नाही, कारण माणच्या जनतेच्या मनात काय आहे हे सहजासहजी समजत नाही. अत्यंत सावध पावलं टाकून ही निवडणूक लढवावी लागेल. निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मान खाली घालावी लागेल, अशी तडजोड होणार नाही. 

आवश्य वाचा : पाणी चोरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा अधिकाऱ्यांना सोडणार नाही

सुनील माने म्हणाले, तात्यांनी सामान्य कार्यकर्ता सत्तेत असला पाहिजे यासाठी त्याला नेहमीच ताकद दिली. राजकारणात सत्तेच्या समीकरणापेक्षा कार्यकर्त्यांचं बळ महत्वाचं असतं अन ते राष्ट्रवादीकडे आहे. आपला नंबर एकचा शत्रू भाजप आहे, हे बघून 'आमचं ठरलंय' टिमला बरोबर घेवून जाण्याची भूमिका आपली असली पाहिजे. पण त्याचवेळी आपल्या कार्यकर्त्यांचा सन्मान कमी होणार नाही. याची आपण दक्षता घेणार आहोत. पक्षाचे काम न करता नेत्यांच्या कानाला लागणाऱ्या कार्यकर्त्यांचे लाड यापुढे पुरविले जाणार नाहीत. 

प्रभाकर देशमुख म्हणाले, बाजार समितीची निवडणूक फक्त लढण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी लढणार आहोत. त्यासाठी जे करावे लागेल ते करायची आपली तयारी आहे. आपण एकत्र असलो तर विजय निश्चित आहे याची प्रचिती ग्रामपंचायत निवडणुकीत आपण घेतली आहे. निवडणुकीला सामोरे जात असताना लढणाऱ्या कार्यकर्त्याला बळ देण्याची भूमिका आपण सर्वांनीच घेतली पाहिजे. या निवडणुकीबाबत वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल. यावेळी श्रीराम पाटील, अंगराज कट्टे, चव्हाण गुरुजी, सूर्याजी जगदाळे, विजय जगताप, संजय जगताप, दादासाहेब चोपडे यांनी कार्यकर्त्यांच्यावतीने आपली मते मांडली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख