`लॅंड क्रुझर` राष्ट्रवादीच्या नेत्याची, नेली भाजप कार्यकर्त्याने आणि वापरली गुंड गजा मारणेने! - land cruiser of NCP leader taken by bjp worker and used by gangster | Politics Marathi News - Sarkarnama

`लॅंड क्रुझर` राष्ट्रवादीच्या नेत्याची, नेली भाजप कार्यकर्त्याने आणि वापरली गुंड गजा मारणेने!

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

राष्ट्रवादीच्या नेत्याने गजा मारणेशी संबंध असल्याचे नाकारले...

पुणे : कुख्यात गुंड गजा मारणे याची तळोजा तुरुंग ते पुणे अशी जी मिरवणूक निघाली त्यावरून पोलिस टिकेचे धनी होत असतानाच त्याचे राजकीय कंगोरेही पुढे येत आहेत. अशा गुंडाची मिरवणूक काढली गेल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिसांवर आज नाराजी व्यक्त केली. त्यांची नाराजी पुढे आल्यानंतर या मारणेच्या मिरवणुकीसाठी राष्ट्रवादीच्याच नेत्याची लॅंड क्रुझर वापरली गेल्याचे पुढे आले.

`सरकारनामा`ने  हे वृत्त सर्वप्रथम प्रसिद्ध केले. तळोजा जेल ते पुणे अशी गुंड मारणेची शेकडो गाड्यांसह जी मिरवणूक निघाली त्यावरून मारणेवर आतापर्यंत पाच गुन्हे दाखल झाले आहेत. त्याने ज्या अलिशान गाडीतून ही मिरवणूक `एन्जाॅय`केली ती लॅंड क्रुझर पुण्याच्या वडगाव शेरी परिसरातील राष्ट्रवादीचे नेते नारायण गलांडे यांच्याशी संबंधित होते. त्यांचे चुलते रमेश गलांडे यांच्या नावावर ही गाडी आहे पण तिचा वापर नारायण हेच करतात. नारायण गलांडे यांनी वडगाव शेरी मतदारसंघाची विधानसभा निवडणूक 2014 मध्ये मनसेकडून लढविली होती. त्यानंतर 2017 मध्ये राष्ट्रवादीकडून त्याने महापालिकेची निवडणूक लढवली होती. त्या आधी काॅंग्रेसकडूनही हा नेता 2012 मध्ये महापालिका निवडणुकीसाठी रिंगणात उतरले होते.

MH 12 JN 1000 या क्रमांकाची लॅंड क्रूझर आपण वापरत असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र आपले आणि गजा मारणे यांचा काहीच संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की गेली अनेक वर्षे मतदारसंघात काम करत आहे. मतदारसंघातील अनेक नागरिक माझ्याकडे लग्न समारंभासाठी, त्यांच्या कामासाठी माझ्याकडे गाडी मागत असतात. मी देखील ती आनंदाने देत असतो. खासदार छत्रपती संभाजीराजेदेखील हे आमच्या गाडीत बसले आहेत, याचा मला अभिमान आहे. पुण्यात अशा फार कमी गाड्या आहेत. त्यामुळे माझी गाडी ही तिच्या क्रमांकावरून अनेकांना ओळखीची झाली आहे. 

ही पण बातमी वाचा - गुंड गजा मारणेसाठी लॅंड क्रुझर

``माझे मतदारसंघात सर्वपक्षीय संबंध आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे वडगाव शेरी मतदारसंघाचे अध्यक्ष राहुल दळवी यांनी मला दोन-तीन तासांसाठी ही गाडी मागितली. माझे थोडे काम आहे. त्यामुळे ही लॅंड क्रुझर मला द्या, अशी विनंती त्यांनी केली. ही गाडी गजा मारणेला आणण्यासाठी चालवली आहे, हे त्यांनी मला तेव्हा सांगितले नव्हते. त्यांचे इतर काही काम असेल म्हणून माझी गाडी त्यांना दिली. त्यांनी ही गाडी थेट तळोजा येथे मारणे याला आणण्यासाठी वापरल्याचे मला माध्यमांतून समजले. तेव्हाच पोलिसांना याबाबत माहिती दिली. माझे आणि मारणेंचे काहीच संबंध नाहीत. उलट दळवींनीच मला न सांगता ही गाडी मारणेंसाठी वापरल्याचा जबाब मी पोलिसांना दिला आहे. त्यामुळे विनाकारण या प्रकरणाशी संबंध जोडणे योग्य नसल्याचे गलांडे यांनी स्पष्ट केले.

गलांडे यांच्या या दाव्याबाबत दळवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा फोन बंद होता. त्यांचे म्हणणे प्राप्त होताच ते या बातमीत दिले जाईल. दळवी यांचे फेसबुक पेज पाहिले असता ते भाजयुमोचे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष असल्याचे दिसून येते. त्यांनी एल्गार परिषदेविरोधात पोलिसांना निवेदन दिल्याचीही पोस्ट या पेजवर आहे. गजा मारणेसोबत मिरवणुकीत असलेल्यांवर, टोलनाक्यावर धमकवाणी केल्याबद्दल अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात दळवी यांचा समावेश आहे की नाही, हे समजू शकले नाही. 

ही पण बातमी वाचा : याची पुसटशी कल्पना मारणेला नव्हती

पप्पू गावडे आणि अमोल बधे खून खटल्यातून गजाची निर्दोष मुक्तता झाल्याने नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या गजाचे तुरुंगाबाहेर पडताच त्याचे जंगी स्वागत करण्यात आले होते. पुण्याकडे येताना तीनशे मोटारीतून त्याची मिरवणूक काढण्यात आली. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वरील ऊर्से टोलनाक्यावर हा ताफा आला. तेथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ड्रोनने या आनंदोत्सवाचे चित्रीकरणही तेथे करण्यात येत होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख