SARKARNAMA EXCLUSIVE : गुंड गजा मारणेच्या मिरवणुकीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्याची `लॅंड क्रुझर` - NCP leaders Land Cruiser used for the procession goon Gaja Marane | Politics Marathi News - Sarkarnama

SARKARNAMA EXCLUSIVE : गुंड गजा मारणेच्या मिरवणुकीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्याची `लॅंड क्रुझर`

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

गजा मारणे आणि त्याचे कनेक्शन हा गंभीर विषय आहे... 

पुणे : एका कुख्यात गुंडाची तो तुरुंगातून सुटल्यानंतर मिरवणूक काढली गेल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिसांवर आज नाराजी व्यक्त केली. या मिरवणुकीतून चुकीचा संदेश गेला पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक असला पाहिजे, सामान्य नागरिकांवर नव्हे, असे म्हणत अजित पवारांनी पोलिसांचे कान टोचले. मात्र या या गुंडाच्या मिरवणुकीसाठी सहकार्य करण्यासाठी राष्ट्रवादीचाच एक नेता पुढे आल्याची माहिती मिळाली आहे.

तळोजा जेलमधून गुंड गजा मारणे याच्या मिरवणुकीचा विषय सध्या गाजतो आहे. त्यामुळे पोलिसांच्याही प्रतिमेला तडा गेला. तळोजा जेल ते पुणे अशी गुंड मारणेची शेकडो गाड्यांसह जी मिरवणूक निघाली त्यावरून मारणेवर आतापर्यंत पाच गुन्हे दाखल झाले आहेत. त्याने ज्या अलिशान गाडीतून ही मिरवणूक `एन्जाॅय`केली ती लॅंड क्रुझर पुण्याच्या वडगाव शेरी परिसरातील राष्ट्रवादीच्या एका नेत्याची होती, असे समोर आले आहे. या नेत्याने वडगाव शेरी मतदारसंघाची विधानसभा निवडणूकही 2014 मध्ये दुसऱ्या पक्षातून लढविली होती. त्यानंतर 2017 मध्ये राष्ट्रवादीकडून त्याने महापालिकेची निवडणूक लढवली होती. त्या आधी काॅंग्रेसकडूनही हा नेता 2012 मध्ये महापालिका निवडणुकीसाठी रिंगणात उतरला होता.

ही लॅंड क्रुझर थेट या नेत्याच्या नावावर नसून त्याच्या चुलत्याच्या नावावर आहे. मात्र ही गाडी हा नेताच वापरत असल्याचे येथील नागरिकांना रोजच दिसून येते. गुंडा गजा मारणेच्या नावावर बेकायदा मिरवणुकीबद्दल, बेकायदा जमाव जमविल्याबद्दल पाच ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे  ही लॅंड क्रुझर गाडी देखील पोलिसांनी सध्या ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. गुन्हेगारी कृत्यात सहभागी झालेल्या वाहनांमध्ये तिचा समावेश करण्यात आला असून ती न्यायालयामार्फत सोडविता येणार आहे. याबाबत संबंधित नेत्याशी वारंवार संपर्क साधला तरी त्याने प्रतिसाद दिला नाही. 

पोलिसांनी अशी मिरवणूक वेळीच रोखली नाही म्हणून ति टिकेचे धनी होत असले तरी अशा गुंडांना गाडी दिल्याबद्दल संबंधित नेते अशा कार्यकर्त्यांचे कान कधी टोचणार, याबाबत उत्सुकता आहे. 

ही पण बातमी वाचा : याची पुसटशी कल्पना मारणेला नव्हती

पप्पू गावडे आणि अमोल बधे खून खटल्यातून गजाची निर्दोष मुक्तता झाल्याने नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या गजाचे तुरुंगाबाहेर पडताच त्याचे जंगी स्वागत करण्यात आले होते. पुण्याकडे येताना तीनशे मोटारीतून त्याची मिरवणूक काढण्यात आली. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वरील ऊर्से टोलनाक्यावर हा ताफा आला. तेथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ड्रोनने या आनंदोत्सवाचे चित्रीकरणही तेथे करण्यात येत होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख