विलास लांडेंनी 'स्थायी'तील मलिद्यावर बोट ठेवलं अन् थेट 'एसीबी'ची कारवाई

एसीबीनं बुधवारी पिंपरी महापालिकेत धाड टाकत मोठी कारवाई केली आहे.
विलास लांडेंनी 'स्थायी'तील मलिद्यावर बोट ठेवलं अन् थेट 'एसीबी'ची कारवाई
Ex MLA Vilas lande complained about corruption in PCMC

पिंपरी : अत्यावश्यक गरजेचे व स्पष्टता नसलेले कोट्यवधी रुपयांचे मलिद्याचे विषय बिनबोभाटपणे मंजूर होण्याचे सत्र श्रीमंत पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीत सुरुच आहे. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे विरोधी पक्ष राष्ट्रवादी व शिवसेनेच्या स्थायीतील सदस्यांकडून अशा विषयांना तोंडदेखलाही विरोध होत नाही. भोसरीचे माजी आमदार विलास लांडेंचा अपवाद वगळता राष्ट्रवादी याविरुद्ध बाहेरही आवाज उठवताना दिसत नाही, हे विशेष. (Ex MLA Vilas lande complained about corruption in PCMC)

एसीबीनं बुधवारी पिंपरी महापालिकेत धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. मंजूर टेंडरची वर्क ऑर्डर काढण्यासाठी नऊ लाख मागून दोन लाख लाच घेताना कारवाई करण्यात आली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन ज्ञानेश्वर लांडगे, पीए ज्ञानेश्वर पिंगळे, कॉम्प्युटर ऑपरेटर राजेंद्र शिंदे, शिपाई अरविंद कांबळे यांच्याविरोधात लाचखोरीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती एसीबीकडून देण्यात आली.

लांडे यांनी स्थायीमधील निर्णयांबाबत यापूर्वीच तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई झाल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. कोरोनामुळे शाळा सध्या बंद आहेत. तरीही या बंद शाळांतील मुलींना दहा कोटी रुपयांचे गुडफिल किट देण्याचा विषय या महिन्यात (ता.४) स्थायीने मंजूर केला आहे. त्याला लांडे यांनी आक्षेप घेत मलिद्यासाठी हा विषय पालिकेतील सत्ताधारी भाजपने मंजूर केला असल्याचा आरोप बुधवारी (ता.१८) केला. करदात्या नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी यातून होणार असून त्यांच्या पैशांची लूट करण्याचा कार्यक्रम सत्ताधा-यांनी हाती घेतला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

बंद शाळांत कोरोनाचे विषाणू मारणारी कोट्यवधींची संयत्रे बसविणे, शालेय साहित्य खरेदी असे कोट्यवधी रुपयांचे सहा मलईदार तातडीची गरज व कोरोना काळात आवश्यकताही नसलेले विषय कुठल्याही चर्चेविना धडाधड ४ तारखेच्याच बैठकीत मंजूर करण्यात आले आहेत. तर, द शाळात कोट्यवधीचे फर्निचर, अडीच कोटी रुपये खर्चून वॉटर फिल्टर, कुलर बसविणे आदी स्थायीच्या अजेंड्यावर आणलेल्या व कोरोना काळात तातडी नसलेल्या विषयांसंदर्भात सरकारनामानेही याअगोदर बातम्या दिलेल्या आहेत. त्यामुळे हे प्रस्ताव दफ्तरी दाखल न करता तेवढ्यापुरते स्थगित करण्याची चतुराई दाखविण्यात आली होती. 

मात्र, त्यातील फीलगुड किटसारखे विषय स्थायीच्या ऑनलाईन बैठकांत विनाचर्चा, बिनबोभाट, गुपचूप मंजूर केले जात आहेत. त्यापैकीच विद्यार्थिंनींच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून मान्यता घेण्यात आलेला गुडफिल किटचा मलिद्याचा विषय रद्द करण्याची मागणी लांडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. फक्त लांडेंनीच याअगोदरही या बंद शाळात वॉटर फिल्टर, कूलर बसविण्याच्या अडीच कोटी रुपये खर्चाच्या विषयाला विरोध केला होता. ते वगळता राष्ट्रवादीचे शहरातील इतर पदाधिकारी व स्थायीतील सदस्यही सूचक मौन बाळगून असल्याने त्याची चर्चा आहे.

शहरात पालिकेच्या १२३ शाळा आहेत. तेथील २५ हजार विद्यार्थिनींना दोन ‘गुडफिल’ किट देण्यात येणार आहेत. त्यात 1 अंडरगारमेंट आणि 2 डबललेअर मास्क आहेत. त्यासाठी पालिका तब्बल सोळाशे रुपये म्हणजे बाजारभावापेक्षा कितीतरी अधिक पैसे मोजणार आहे. विद्यार्थींनी घरामध्ये सुरक्षित असताना ‘गुडफिल’ असे गोंडस नाव देऊन अत्यल्प शूल्काच्या वस्तू चढ्या दराने खरेदी करून सत्ताधारी नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारत आहेत. त्यामुळे ‘गुडफिल’ किट खाली होणा-या या भ्रष्टाचाराला आळा बसावा, यासाठी हा विषय रद्द करण्याचे आदेश पालिका आयुक्त राजेश पाटील यांना देण्याची मागणी लांडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in