भाजप नेत्याच्या संघटनेचा खंडणीखोर पदाधिकारी पोलिसांच्या जाळ्यात

गूगल पे आणि क्रेडीट कार्डव्दारे पावणेतीन लाख रुपये घेतले होते.
भाजप नेत्याच्या संघटनेचा खंडणीखोर पदाधिकारी पोलिसांच्या जाळ्यात
Vishnu Kurhade arrested by Pimpri police in extortion case

पिंपरी : भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस राजू दुर्गे हे संस्थापक असलेल्या एल्गार सेनेचा प्रदेश कार्याध्यक्ष विष्णू सुभाष कुऱ्हाडे (रा. आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे) याला खंडणीच्या गुन्ह्यात आळंदी पोलिसांनी बुधवारी (ता.१८) ताब्यात घेतले. एक खासगी प्रकरण मिटवण्यासाठी त्याने गूगल पे आणि क्रेडीट कार्डव्दारे पावणेतीन लाख रुपये घेतले होते. (Vishnu Kurhade arrested by Pimpri police in extortion case)

गत डिसेंबर ते यावर्षी २ एप्रिलदरम्यान ही घटना घडली आहे. त्याबाबत दत्ता लक्ष्मण झिटे (वय ३०, रा. गंधर्वनगरी, मोशी, पिंपरी-चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे आळंदी-मरकळ रोडवर रमेश स्वीट होम नावाचे दुकान आहे. त्यांचा एका महिलेसोबत वैयक्तिक वाद झाला होता. तो मिटवण्यासाठी त्यांनी कुऱ्हाडेची मदत मागितली होती. त्याकरिता त्याने झिटे यांच्याकडून वेळोवेळी दोन लाख ८४ हजार रुपये घेतले होते. दरम्यान, कुऱ्हाडेला ताब्यात घेण्यात आले असून उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे तपासाधिकारी जोंधळे यांनी सांगितले.

कुऱ्हाडे याच्याकडे एल्गारच्या नगर, नांदेड व परभणी या जिल्ह्यांची जबाबदारी आहे. तो कार्यकर्ता म्हणून चांगला आहे, पण घडले ते वाईटच असे सांगत संघटनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याकडून असे वर्तन अपेक्षित नसल्याचे दुर्गे यांनी सांगितले. त्या दोघांतील हा विषय असल्याचे सांगत त्याचा संघटनेशी सबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. चुकीच्या कामाची प्रत्येकाला शिक्षा भोगावी लागते, असेही ते म्हणाले. 

या प्रकरणी तडकाफडकी निर्णय न घेता पुढे तपासात काय घडतंय, हे पाहून संघटनेची बैठक घेऊन कुऱ्हाडेवर काय कारवाई करायची हे सर्वानूमते ठरविले जाईल, असे दुर्गे यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. कुऱ्हाडे हा एल्गारचा आळंदी शहराध्यक्ष असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, तो आळंदी शहराध्यक्ष नसून प्रदेश कार्याध्यक्ष असल्याचा खुलासा दुर्गे यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in