मोठं होण्यासाठी पवारांवर टीका करावी लागते!

कर्जत-जामखेड मतदारसंघातील समस्या आणि प्रलंबित प्रश्नांसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली.
मोठं होण्यासाठी पवारांवर टीका करावी लागते!
MLA Rohit Pawar slams opposition leaders of maharashtra

नवी दिल्ली : विरोधकांना मोठं व्हायचं असेल तर शरत पवार आणि पवार कुटुंबीयांवर टीका करण्यात येते. पवार कुटुंबीयांवर टीका करून प्रसिध्दी मिळवली जाते, असा टोला आमदार रोहित पवार यांनी विरोधकांना लगावला आहे. कुटुंबाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगत पवार यांनी राज्याच्या भविष्यासाठी, धोरणे आखण्यासाठी विरोधकांनी मदत करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली. (MLA Rohit Pawar slams opposition leaders of maharashtra)

कर्जत-जामखेड मतदारसंघातील समस्या आणि प्रलंबित प्रश्नांसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सदन येथे विविध मुद्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. त्यावर बोलताना पवार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

भाजपकडून ओबीसी आरक्षणाचे राजकारण केले जात आहे. केंद्राकडील एम्पिरिकल डाटा राज्याला का दिला जात नाही, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणावर भाजपचे एकही खासदार संसदेत बोलले नाहीत, याकडंही पवार यांनी लक्ष वेधलं. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याबाबतच्या केंद्र सरकारच्या भूमिकेवरही पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडत नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार सरकार चालवतात, अशी टीका विरोधकांकडून केली जाते. त्यावर बोलताना पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे खाती राखून ठेवली नाहीत. अनेकांना संधी देत त्यांनी खातंवाटप केलं आहे. अजित पवार यांच्याकडं अर्थखातं असून ते महत्वाचं खातं आहे. केंद्राकडं असलेले राज्याचे थकित पैसे मिळत नाहीत. पण अजित पवार उपलब्ध पैशांत राज्य उत्तम चालवत आहेत.

अनिल देशमुख गायब नाहीत

अनिल देशमुख ईडीच्या चौकशीसाठी समोर येतं नसल्याच्या मुद्यावर पवार यांनी त्यांची पाठराखण केली. देशमुख हे गायब झालेले नाहीत. ईडीला उत्तर देण्यासाठी कायद्याचाच आधार घेत आहेत. ते कायदेशीर लढाई लढत आहेत. त्यांनी ईडीला पत्र लिहिले असून न्यायालयातही गेले आहेत. प्रत्येकाची कार्यपद्धती वेगवेगळी असते. ईडीचा गैरवापर होतो आहे, हेच यातून दिसते आहे. भाजपच्या एकाही नेत्याला नोटीस का पाठवली जात नाही, असा प्रश्न पवार यांनी केला.

सोमय्यांना ईडीचं प्रवक्ते पद द्यावं

भाजप नेते किरिट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर सातत्यानं भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. यावर बोलताना पवार यांनी सोमय्यांना जोरदार टोला लगावला. केंद्र सरकारने सोमय्या यांना ईडीचे प्रवक्ते पद द्यावे. सोमय्याच ईडी चालवत असल्यासारखी परिस्थिती आहे. कोणी दोषी असल्यास नक्कीच कारवाई केली पाहिजे. पण राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून तपास संस्थांचा गैरवापर करणे चुकीचे असल्याचे पवार यांनी नमूद केलं.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in