
Mumbai News : राज्यातील कांद्याचे दर कोसळल्याने केंद्र सरकारने शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी सरकारने प्रतिक्विंटल कांद्याला दोन हजार ४१० रुपये दर घोषित केला. मात्र 'हा भाव पुरेसा नाही' असे सांगून माजी केंद्रीय कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी मोदी सरकारवर टीका केली. "या भावातून कांदाच्या उत्पादनाचा खर्चही निघणार नाही', अशी टिप्पणीही पवारांनी केली. कांद्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस विशेषतः शरद पवारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राज्यातील वातवरण चांगलेच तापणार आहे. (Latest Political News)
केंद्र सरकारने निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्याने कांद्याचा साठा वाढला आहे. निर्यात शुल्क वाढवल्याने 'जेएनपीटी' बंदरावर कांद्याचे सुमारे १२० हून अधिक कंटेनर अडकले आहेत. याची परिणाम राज्यातील कांद्याच्या दरावर झाला आहे. कांद्याचे दर पडताच राज्यातील विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकार शेतमालाचे दर कमी करण्याचे षडयंत्र करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी जुन्नरमधील आळेफाटा येथे शेतकऱ्यांसमवेत रास्त्यावर ठिय्या मांडला आहे.
कांद्यावरून झालेली सरकारची कोंडी फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी तत्परता दाखवत केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांच्यांशी चर्चा केली. यातून केंद्र सरकारद्वारे राज्यातील दोन लाख मेट्रिक टन कांदा दोन हजार ४१० प्रति क्विंटल दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी राज्यात दोन ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करून तेथे आजपासूनच खरेदी सुरू करण्यात येणार आहे. केंद्राच्या या दराच्या निर्णयाचा मात्र पवारांनी समाचार घेतला आहे.
शरद पवार म्हणाले, "केंद्र सरकारचा निर्णय शेतकऱ्यांच्या अपक्षा पूर्ण करणारा नाही. केंद्राने जाहीर केलेला दरातून शेतकऱ्यांचे उत्पादन खर्चही निघणार नाही. त्यामुळे सरकारने प्रती क्विंटलला चार हजार भाव द्यावा. आताचा कांदा हा टिकणारा असून दराबाबत योग्य निर्णय घेईपर्यंत शेतकरी थांबायला तयार आहेत. यासाठी सरकारने तत्काळ निर्यात शुल्क कमी करावे", असा सल्लाही पवारांनी सरकारला दिला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.