दोन गृहराज्यमंत्री गायब; पालकमंत्री असंवेदनशील : चित्रा वाघ यांचा आरोप  - Two home ministers missing; Guardian Minister insensitive: Chitra Wagh's allegation | Politics Marathi News - Sarkarnama

दोन गृहराज्यमंत्री गायब; पालकमंत्री असंवेदनशील : चित्रा वाघ यांचा आरोप 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 1 जुलै 2021

सातारा जिल्ह्यात लहान मुलींवर व महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांबाबत पालकमंत्र्यांनी एकही शब्द काढलेला नाही. ते असंवेदनशील असल्याचे दिसून येते.

सातारा : राज्यात दोन गृहराज्यमंत्री आहेत हेच कुणाला माहिती नाही. महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढलेल्या असताना त्यांनी या पदावर का राहावे. ते या पदाला न्याय देऊ शकत नाहीत. आपण मायबाप सरकार असे म्हणतो तर पालकमंत्री म्हणून ते काय काम करतात. ते त्यांचे काम करू शकत नसतील तर त्यांनी या खूर्चीवर का बसावे हे त्यांनीच ठरवावे, अशी सडेतोड टीका भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी साताऱ्यात केली. 

चित्रा वाघ आज साताऱ्याच्या दौऱ्यावर होत्या. महिला अत्याचाराच्या जिल्ह्यात वाढलेल्या घटनांसंदर्भात अन्यायग्रस्त महिलांची भेट घेण्यासाठी त्या साताऱ्यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पालकमंत्री, गृहराज्यमंत्र्यांसह ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. 

हेही वाचा : कुणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान होईलच : महादेव जानकर

जिल्ह्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षिकेचा विनयभंग झाला होता, तसेच सोमर्डी, बेलावडे येथील लहान मुलींवर अत्याचाराच्या घटनांवरून त्यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यवर टीका केली. त्या म्हणाल्या, रा  राज्यात दोन गृहराज्यमंत्री आहेत हेच कुणाला माहिती नाही. त्यांच्या जिल्ह्यात महिलांवर अत्याचार होत असताना त्यांनी या पदावर का राहावे, हे त्यांनीच सांगावे.

आवश्य वाचा : दगडहल्ला म्हणजे झेड किंवा वाय प्लस सुरक्षेसाठी पडळकरांनी रचलेले सुनियोजित कटकारस्थान

या घटनांबाबत त्यांनी आतापर्यंत एका ओळीची प्रतिक्रिया दिलेली नाही. आतापर्यंत अशा किती केसेस त्यांनी हाताळल्या, याची माहिती द्यावी. ते त्यांच्या पदाला न्याय देऊ शकलेले नाहीत. तर आपण मायबाप सरकार असे म्हणतो, त्यावेळी पालकमंत्री म्हणून ते त्यांचे काम करत नसतील तर त्यांनाही खूर्चीवर बसावे की न बसावे, हे त्यांनीच ठरवावे.

सातारा जिल्ह्यात लहान मुलींवर व महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांबाबत पालकमंत्र्यांनी एकही शब्द काढलेला नाही. ते असंवेदनशील असल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडत असताना राज्य सरकार ही मूग गिळून गप्प आहे, अशी टीकाही सौ. वाघ यांनी केली.  

त्यांच्या सुरक्षिततेसाठी कमांडो पाठवा....
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर दोन युवक पाळत ठेवत होते. याविषयीची माहिती पत्रकारांनी चित्रा वाघ यांना दिली. त्यावर त्या म्हणाल्या की, अंग बाई उनकी जान खतरे मे है. राज्याचा गृहराज्यमंत्री सुरक्षित नसेल तर आम्हाला गृहमंत्र्यांकडे तक्रार करून त्यांच्या सुरक्षिततेसाठी कमांडो पाठवा, असे सांगावे लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख