मनगटाचा जोर न दाखवणारा, हसतमुख, अदबशीर, आश्वासक राजकारणी.....

महाराष्ट्राच्या राजकारणातील आश्वासक चेहराअकाली गेला....
rajeev satav
rajeev satav

मुंबईतल्या फोर्ट परिसरातल्या स्टारबक्समध्ये राजीव सातवांची (Rajiv Satav) भेट व्हायची. महिन्या दोन महिन्यांनी. गुजरात विधानसभा (Gujrat Assembly election) जिंकल्यावर ते मला तिथे कॉफी पाजणार होते. `पण मी तुम्हाला मुख्यमंत्री झालात की ईथेच कॉफी पाजणार. त्या वेळी सुरक्षा वगैरे कारणे द्यायची नाहीत, असं मी त्यांना म्हणायचे. अशी वेळ कॉंंग्रेसच्या घसरत्या कामगिरीमुळे येईल का, हा ओठावर येणारा प्रश्न सभ्यतेमुळे ओठावर आणला नाहीतरी राजीवना तो समजायचा. ते हसत म्हणायचे, "तुम्हाला कॉफीवर खर्च करावा लागेल का माहिती नाही पण गुजरातविजयाच्या कॉफीचे निमंत्रण मात्र आत्ताच स्वीकारून ठेवा." (Congress leader Rajiv Satav no more)

पण राजीव सातवच गेले. गेल्या आठ- दहा दिवसांत कल्पना आली होती. पण तरी मनाची काय कानांचीही तयारी झाली नव्हतीच. राजकीय नेत्यांच्या स्वभावामुळे कधी ते जिव्हाळ्याचे मित्र होवून बसतात ते कळतच नाही. राजीव फार उमदे होते. हसतमुख! अदबशीर!  रजनीताईंनी, त्यांच्या आईने, स्व.राजीव गांधींवरून  तुमचे नाव ठेवले का, असे विचारताच, ते हो म्हणाले होते. 

आज ते अकाली निघून गेले. चटका लावून. दिल्ली दरबारात स्वत:चे स्थान निर्माण करू शकलेले मराठी नेते अत्यल्प.  या दुर्मिळ यादीत राजीव सातव यांचे स्थान फार महत्वाचे झाले होते. कित्येक स्वप्ने त्यांनी पाहिली होती! त्यांची पूर्तता करण्याचे मनसुबे पद्धतशीरपणे आखले होते. राहुल यांचा खास असे बिरूद जपतानाच महाराष्ट्राचे एक संकल्पचित्र त्यांच्यासमोर होते. उद्या त्या स्वप्नालाही पार्थिवाबरोबर मूठमाती मिळेल. स्मरणचित्रे तेवढी डोळ्यासमोर सरकत राहतील.
. . . 

२००४- २००५ च्या सुमाराची गोष्ट. महाराष्ट्राचा उभा -आडवा राजकीय अभ्यास करणार्या स्व. शां. म. गोठोस्कर यांनी राज्यावर पुढची पन्नास वर्षे प्रभाव टाकू शकतील अशा २० नेत्यांची यादी करायचे ठरवले होते. काहीजणांशी गप्पा मारून ते ही नावे निश्चित करत होते. आमचे दोघांचेही एकमत झाले ते राजीव सातव या नावावर. सातव तेव्हा जेमतेम पंचायत समितीचे सभापती झाले होते; पण पहिल्या २० नव्हे तर अगदी `टॉप टेन` भविष्यगामी नेत्यांमध्ये  त्यांचा समावेश करायलाच हवा, असे माझे ठाम मत होते. तोपर्यंत त्यांची एकदाच भेट झाली होती. पण त्या पाऊण तासातच त्यांचे आर्जवी प्रतिपादन, विषयाची समज आणि आईच्या राजकीय वारशाचे भांडवल न वापरता आपण पुढे काय करायला हवे, याची आखणी कळत होती. मनाला भिडणारे अन बुद्धिला पटणारे ते बोलत होते.

राजकारणात नवं काय घडतंय याचा राजकीय पत्रकारांनी  सतत वेध घेणे अपेक्षित असते. ते मोठेच काम असते. वर्तमानपत्रांपर्यंत एखाद्या नावाची माहिती पोहोचण्याआधी गावपातळीवर नेतृत्व विकसित झालेले असते. छोटयामोठया गावात असे कोण कोण काय काय करतेय, याची माहिती मिळवणे जिकिरीचे असते. त्याबद्दल ज्या चार- दोन लोकांशी बोलणे व्हायचे ते सगळेच राजीव सातव यांचे नाव घ्यायचे. म्हणून मग भेटीसाठी संपर्क केला. ते कधी वर्षाताई गायकवाडांच्या घरी तर कधी कॉंग्रेस कार्यालयात भेटीची वेळ देवू लागले. दुसऱ्या तिसऱ्या भेटीतच बहुजनसमाजाच्या राजकारणावर, त्यातल्या ताण्याबाण्यांवर ते विश्लेषणात्मक बोलू लागले. त्यांच्या कल्पना सुस्पष्ट होत्या. थोड्याच दिवसांत ते दिल्लीतही वावरू लागले. राहुल गांधींनी `जनता के सिपाही` कार्यक्रमाची घोषणा केली. महाराष्ट्रातले त्यातले बिनीचे नाव राजीव सातव यांचे होते. ते त्या कामाची माहिती आवर्जून सांगत असत. लगेचच युवक कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली अन त्यांच्यावर व्यक्तीविशेष म्हणून लिहायची संधी चालून आली.

'सकाळ'मध्ये तेंव्हा मुद्रा नावाचे सदर असायचे. विशेष व्यक्तीवरचा लेख असलेले ते सदर. त्यात  राजीव सातवांवर लिहिले अन हा युवक राज्याचा कधीतरी प्रमुख होवू शकेल, असे मनापासून वाटणारे भाकित हात आखडता न घेता मी  करून टाकले. मी तर लिहिले पण राजीवना ते फारसे आवडले नाही. संकोचाचा भाग होताच अन कशाला लिहिलेय, फटाके लागतील, अशी ही त्या नाराजीमागची भावना होती. मराठा नसलेला चेहरा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा होवू शकेल, असा प्रश्नही काहींनी विचारला पण राजीव यांच्याबद्दलचे निरिक्षण योग्य असल्याचेही कितीतरी निरोप आले. त्यात  तरुण मोठ्या संख्येने होतेच. पण कॉंग्रेसमधले काही बडे नेतेही या निरीक्षणाशी सहमत होते. राजीवने मग याच काळात माहिती पुरवली, ती भलतीच रोचक होती. राहुल गांधी मुलाखती घेवून `सिपाही` नेमत, अध्यक्ष ठरवत. राजीवना त्यांनी प्रश्न विचारला की तुमचे आवडते नेते कोण? राजीव यांनी  शरद पवार असे उत्तर दिले.  महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेध घेण्याचा पवारसाहेबांच्या मनात असलेला आराखडा नेहमीच भुलवत आलाय, असे मी राहुलजींना सांगितल्याचे ते सांगत होते. काय प्रतिक्रीया होती त्यांची यावर  असे विचारताच राजीव म्हणाले ," राहुलजींना खरे बोलणारी माणसे आवडतात!``

त्यानंतरच्या लोकसभा निवडणूक विश्लेषण कार्यक्रमात राजीव संपूर्ण दिवस `साम`वर होते. स्टुडिओ बेलापूरला असल्याने त्यांना अन्य  कुठल्याही माध्यमावर जाणे शक्य नव्हते. पण त्यांची त्याबद्दल कोणतीही तक्रार नव्हती. तुमच्या समूहाने माझ्यावर पहिल्यांदा लिहिले. तुमचा माझ्यावर हक्क आहे, असे ते मार्दवाने सांगून  सायंकाळीही चॅनेलवर हजर राहिले. राहुल गांधींच्या बाजुचे बिनतोड विश्लेषण सांगत गेले. डॉ.म नमोहनसिंग दुसऱ्यांदा कसे जिंकले याची उत्तम चिकित्सा ते करत होते. यानंतर त्यांच्या प्रगतीचा आलेख वर वर चढू लागला.

दिल्लीत त्यांचा  अधिकाधिक वेळ जात होता. तरीही महाराष्ट्रात काय सुरु आहे याचा  सतत आढावा घेणे सुरु असायचे. गुजरातमधल्या घडामोडी हा त्यांच्या आवडीचा विषय. कॉंंग्रेस तिथे कशी जिंकणार? जिंकणार नाहीच हो, असे म्हंटले की ते खवळायचे. अर्थात हे खवळणेही त्यांच्या स्वभावानुसार असायचे मर्यादाशील. `युवक नाराज आहेत. ते आमच्याकडे वळणार, हे अर्धा- अर्धा तास समजावायला त्यांना भारी आवडे. 2014 ला ते लोकसभेच्या मैदानात उतरले. हिंगोलीतून जिंकण्याची भिस्त स्वत:च्या संपर्काबरोबरच अशोक चव्हाणांच्या नेटवर्कवरही होती. पंतप्रधानपद हाकेपासून दूर असलेल्या नरेंद्र मोदींची रणरणत्या उन्हात नांदेडला सभा झाली तेंव्हा अशोकरावांचे कार्यकर्ते सटपटले. काही तर हादरलेच. राजीव सातवांचा कुठून तरी फोन आला. `तुम्ही दोघे तरीही जिंकणार, अशोकराव चांगल्या मताधिक्याने अन तुम्ही थोडक्यात, हा माझा अंदाज  ऐकल्यावर `जावून आलात की मुंबईत बसून बोलता आहात, असा प्रश्नही त्यांनी केला. फिरलेय तिकडे, असं म्हंटल्यावर ते शांत झाले. माहित नाही पण `कॉफी नक्की, असे म्हणत त्यांनी फोन ठेवून दिला.

निकालानंतर `कॉफी पे चर्चा` झाली पण विजयाच्या आनंदापेक्षा पक्षासमोरची आव्हानेच राजीव यांच्या गप्पांचा विषय होता. विधानसभा निवडणुकीत काय होणार, हे त्यांनाही स्पष्ट वाचता येत होते. प्रचार झाला ,जे अपेक्षित होते तेच घडले. भाजप सत्तेत आली. कालांतराने सेनाही सरकारचा भाग झाली. फडणवीस यांच्या रुपाने मराठा नसलेला तरूण मुख्यमंत्री झाला होता. महाराष्ट्रात सातवांनी आतापासूनच  सक्रीय व्हावे. भाजपची लोकप्रियता ओसरली तर ते मुख्यमंत्री होवू शकतात, असे काही कॉंग्रेसचे तरूण नेते गप्पांतून सुचवत होते. ही चर्चा ऐकताच ते म्हणाले, ``तसे होवो. भाजपच्या लोकप्रियतेला ओहोटी लागो. पण मी नाही रेसमध्ये! वेगवेगळ्या राज्यात मुख्यमंत्री होवू शकतील असे युवा नेते मात्र तयार होताहेत. मी बघतोय ते डोळ्यांसमोर.``

नंतर खासदार असतानाही बोलणे व्हायचे ते गुजरातबद्दलच. संसदरत्न पुरस्कार मिळाले वगैरेच्या आनंदापेक्षाही ध्यास असायचा गुजरातचा. हार्दिक पटेल सारखे विषय त्यांच्यामुळे खाचाखोचांसकट समजत. राहुल गांधी चुकताहेत का, याची कारणे विचारली तर त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य लोप पावे अन ते म्हणत,``तुम्ही मिडीयावाले त्यांना काय ते म्हणता ना?`` `पप्पू,` असे उच्चारल्यावर ते म्हणत, ``त्यांनाही ते माहिती आहे.  त्यांची प्रामाणिक कटीबद्धता तुम्हा लोकांना कळत नाही. मिळेल एक दिवस यश.`` अशी आशा ते मग बोलून दाखवत. हसऱ्या डोळ्यांमधला तो आशावाद बरोबरच्या पत्रकारांनाही पटत नसे. पण सातव `जेन्युई`न आहेत यावर आम्हा सगळ्यांचे एकमत असे. 
.. . 
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आपण आता लढणार नाही असे त्यांनी सांगताच, `स्थानिक समीकरणांमुळे की आमदार व्हायचेय म्हणून,` या वर नकारार्थी मान हलवत ते म्हणाले ``गुजरात जिंकायचेय म्हणून.`` २०१९ चे वास्तव ते मान्य करत नसत. `प्रो इन्कम्बन्सी`ची मोदीलाट हे भाकीत खरे ठरल्यावर स्वत: म्हणाले, ``तुमचे बरोबर निघाले.`` `बचेंगे तो और लडेंगे`चा सूर होताच अन पुढच्या वेळी बघा हा विश्वासही! नंतर मराठा प्रश्नांवर चर्चा होई. विधानसभेच्या निवडणुकीत भाजप- शिवसेना एकत्र असली तरी पाडापाडी प्रचंड होतेय, हे लक्षात आलेले दोन-तीन गैरभाजपसेना नेते म्हणजे अजितदादा पवार ,जयंत पाटील आणि राजीव सातव.

विधानसभा निवडणूक निकालांनंतर मुख्यमंत्रीपदाचे घोळ सुरु झाले. नवी अतर्क्य आघाडी प्रत्यक्षात येण्याची चिन्हे दिसू लागली. महाराष्ट्रात कॉंग्रेस खरोखर शिवसेनेबरोबर जाईल काय ,यात दोघांना फटका बसेल काय या विचारणेवर ते फक्त दोन वाक्ये बोलले. ``गेलो नसतो तर आमचे आमदार कदाचित एकत्र राहिले नसते. या एकत्र संख्येला फार महत्व असते ताई. शक्ती विभाजित झाली तर फार नुकसान होते हो.``
. . 

राहुल यांच्या नेतृत्वावर पक्षातूनच हल्ले होवू लागले तेंव्हा `जी २३` गटावर पहिल्याने भडकले ते राजीव. पक्षात काही बरोबर सुरू नाही, असे पोटतिडीकीने सांगत होते. त्यानंतर कार्यकारिणीची बैठक ठरली.  निमंत्रक म्हणून त्या वादग्रस्त बैठकीला त्यांनी प्रारंभच राहुल यांची तरफदारी करत केला. दोन्ही बाजूंचे नेते वेगवेगळ्या भूमिकेतून हा घटनाक्रम सांगत होते. पक्ष संकटात होता. पण राजीव पुन्हा उभे होवू, या आशावादावर ठाम असत. प्रियंकांबद्दलची माहिती देवून त्या उत्तर प्रदेशाकडे कसे लक्ष देतील बघा, असे ते सांगत. शेतकरी आंदोलनाच्या २६ जानेवारी रोजीच्या उद्रेकानंतर प्रदीर्घ बोलणे झाले. शेतकरी असंतोषामुळे केंद्रातले सरकार पुढच्या वेळी बदलणार, यावर ते ठाम होते. महाराष्ट्रात शेतकरी नेतृत्व कॉंग्रेसला पुढे नेईल. हे नेतृत्व ऊस कारखानदारीतले नसावे, लढाऊ असावे, अशी राहुलजींची इच्छा असल्याचे त्यांनीच सांगितले. नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळणार, हे त्यातून  स्पष्ट झाले. नंतरच्या छोटयाशा भेटीत ते म्हणाले नाना आमची `बेस्ट बेट` आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात थोडे बोलणे झाले. मग फोनवरच गप्पा होवू लागल्या. `कोविडची काळजी घ्या. गरज असेल तरच फिरा.सॅनिटायजर वापरा. घरचे सगळे ठीक ना, अशी विचारणा होई. कोविडसाठी निर्माण केलेल्या पीएम फंडावर ते टीका करत. खूप काळजी घेत वावरणाऱ्या सातवांनाच संसर्गाची लागण झाली. दिवसागणिक परिस्थिती बिघडत होती. विमानाने हलवणे शक्य नसल्याने तंत्रज्ञांनाच पुण्यात उपचारासाठी तिकडे नेले.

कोविडबाधा होण्यापूर्वीची पाठदुखीसारखी दुखणी डोकं वर काढत होती. सायटोमेगॅलो हा शरीरात दबा धरून बसणारा व्हायरस.राजीव भेटायचे तेंव्हा पोट वारंवार बिघडते, अशी तक्रार करायचे. तुम्ही बारा गावचे पाणी पिता म्हणून असे होते, असे म्हणताच  `काय करणार,` म्हणून हसायचे .त्या पोटदुखीमागे हाच व्हायरस असेल का, आता या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाहीच. ४७ हे जाण्याचे वय नाही. रजनीताई आणि राजीव यांच्या पत्नी मुलांनी काय करावे ? सर्वोत्तम उपचारांनाही दाद न देता ते का गेले याचे उत्तर कुटुंबीय कसे शोधणार? हजारो कोविड मृत्यूत एक महत्वाचा आश्वासक नेता गेला. या महामारीत कुणीही गेला की मन हळहळते.

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे

अकस्मात तोही पुढे जात आहे

असे झालेय. पत्रकाराने संवेदनशील असायला हवे. `सोर्स` गेला तरी दु:ख होतेच. राजीव तर मित्र झाले होते. रुढ अर्थाने मनगटाचा जोर न दाखवणारा, कारखानदारीतल्या समस्यांची भेंडोळी न वाहणारा हा युवक राजकारणी नव्या पिढीच्या राजकारणाचा चेहरा होता. नेतेपणाच्या प्रचलित रुढ संकल्पनेपेक्षा कमालीचा वेगळा. दिल्लीतले यमुनेचे पाणी महाराष्ट्राला भावत नाही या दुखऱया दुर्दैवी यादीत या अकाली जाण्याने  आणखी एक नाव जोडले गेले. राजीव तुम्ही असे अकाली उठून जाल असे वाटले नव्हते. का केलेत असे?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com