`मी फर्ग्युसनचा विद्यार्थी... तुमचा तेव्हाचा मित्र म्हणून आलोय..` - i am student of Fergusson so i come here as your friend said Rajeev Satav | Politics Marathi News - Sarkarnama

`मी फर्ग्युसनचा विद्यार्थी... तुमचा तेव्हाचा मित्र म्हणून आलोय..`

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 16 मे 2021

राजीव सातव यांच्या फर्ग्सुसनमधील आठवणींना त्यांच्या मित्रांचा उजाळा...

पुणे : काॅंग्रेसचे खासदार राजीव सातव (Rajeev Satav no more) यांच्या निधनानंतर त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू त्यांच्या स्नेहीजनांनी उलगडले आहेत. राजकीय पार्श्वभूमी असलेले राजीव सातव हे मूळचे हिंगोली येथील होते.  तरी त्यांचे सुरवातीचे शिक्षण हे पुण्यातील `नूमवि` शाळेत झाले. महाविद्यालयीन शिक्षण हे फर्ग्युसन काॅलेजमध्ये आणि कायद्याचे शिक्षणही पुण्यातच झाले. त्यामुळे पुण्यात त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. त्यातील अनेकांशी त्यांचा अखेरपर्यंत स्नेह होता. 

वरिष्ठ पत्रकार आणि लेखक अभिजित घोरपडे यांनीही त्यांच्या काॅलेजमधील आठवणी व्यक्त केल्या. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये काॅलेजमध्ये पुन्हा एकत्र येण्याच्या दिवसाचे वर्णन केले आहे. ते लिहितात..

वर्ष होतं २०१५. फर्ग्युसनमधून पासआऊट झालेल्याला २० वर्ष झाली होती. त्यामुळे आम्ही 'बीस साल बाद' या नावानं एकत्र जमण्याचं ठरवलं होतं. ठिकाण- अर्थातच फर्ग्युसन कॉलेज. जुने मित्र-मैत्रिणी, शिक्षक, मामा मंडळी.. इतक्या वर्षांनंतर एकत्र जमण्याचा वेगळा आनंद होता. कोण लहान - कोण मोठा, कसलाही भेद नव्हता. त्याच आठवणी, तेच हसणं-खिदळणं.. सर्वांचाच उत्साह ओसांडून वाहत होता. जे मित्र आता नावाजलेले आहेत, मोठं काहीतरी करताहेत, त्यापैकी कोण येईल, कोणाला वेळ मिळणार नाही.. नेमकं सांगता येत नव्हतं. अशाच एकाने कसंबसं उत्तर देऊन 'बघतो, करतो' अशा थाटात कळवलं आणि फिरकलाही नाही तो नाहीच! अनेक जण विचारतं होते, 'राजू येणारंय का? सांगता येत नव्हतं, पण कार्यक्रम सुरू होण्याच्या थोडाच वेळ आधी राजू पोहोचला.

त्या वेळच्या महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या दोन खासदारांपैकी एक; युवक काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष! तो आवर्जून आला. कार्यक्रमात त्याला विशेषस्थान देणं स्वाभाविक होतं. पण काय-कसं? म्हटलं तर पेच होता, म्हटलं तर काहीच नाही! पण तो कसला भारी! जुन्या मित्रांसोबत मागं एका बाकावर जाऊन बसला. ना कोणता तामझाम, ना कोणीतरी वेगळं असल्याचा आव.. लाल टी-शर्ट आणि जीन्स पँट! त्याला म्हटलं, 'अरे पुढं ये की'. तेव्हा बोलला, 'मी फर्गुसनचा विद्यार्थी म्हणून, तुमचा तेव्हाचा मित्र म्हणून आलोय. बस्स् तेवढंच.' दिल्लीला त्याच्या घरी गेलो होतो तेव्हाही असाच अनुभव. निवांत गप्पा, ना कोणी मोठा असल्याचा आव!

तो अभ्यासू, कर्तृत्ववान, सुसंस्कृत नेता होताच. त्याच्या त्या व्यक्तिमत्वाबद्दल अनेकांना अनेक अनुभव असतीलच, पण तो मित्रांसाठी कसा होता, हे कदाचित माहीत नसेल! त्याचं अकाली जाणं हे आम्हा मित्रांचं मोठं नुकसान आहे. आमच्या जनिनीवरच्या या मोठ्या मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली!

सकाळचे बातमीदार मिलिंद संधान यांनी यानिमित्त सातव यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, `राजीवची ओळख कॉलेजच्या निवडणुकीच्या निमित्ताने झाली. महाराष्ट्र राज्याच्या माजी शिक्षणमंत्री रजनीताई सातव यांचा मुलगा म्हणून राजीवला सर्व आम्ही मित्र ओळखू लागलो. मंत्रीमहाशय यांचा मुलगा फार घमेंडी असणार असं सुरवातीला वाटलं म्हणून मी त्यांच्याशी सुरुवातीला लांबच राहू लागलो. परंतु साध्या राहण्याने तो आमच्यात कधी मिसळला हे कळलंच नाही. गप्पागोष्टी, कॉलेजच्या कॅम्पसमध्ये फिरणं, एकत्र डबा खाणे असा आमचा दिनक्रम असे. त्यावेळी आम्ही नाना पेठेत दहा बाय दहाच्या भाड्याच्या खोलीत राहत असे. पण माझ्यासारख्या साध्या मित्राला राजीव त्याच्या कोथरूड येथील मोठया सदनिकेत घरी घेऊन जात असे. मंत्र्यांचा मुलगा म्हणून कोणतेही घमेंड राजीव यांनी बाळगली नाही. महाविद्यालयीन शिक्षणानंतर राजीव यांनी आपले मूळ गाव हिंगोली येथे आपला राजकीय प्रवास सुरु केला. पंचायत समिती सभापती, आमदार, त्यानंतर  2014 मध्ये देशात नरेंद्र मोदींची मोठी लाट असताना ते हिंगोलीतून काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले. त्या काळात मी त्यांना फोन नाही केला. त्यावेळेस त्यांनी माझी मोठ्या आस्थेने चौकशी केली. माझ्या घरी येण्याचे त्यांनी मला सांगितलं होतं. परंतु नंतर त्यांच्यावर पडलेली जबाबदारी यामुळे त्यांना कदाचित ते शक्य झाले नसेल. परंतु अशा या नि:स्वार्थी निगर्वी मित्राचं अचानक एक्झिट होणं, हे मला खूपच अस्वस्थ करणार आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख