काँग्रेस आमदारांनीच मुख्यमंत्र्यांविरोधात ठोकला शड्डू - Punjab CM should apologise to public says Congress MLA-rm82 | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेस आमदारांनीच मुख्यमंत्र्यांविरोधात ठोकला शड्डू

वृत्तसंस्था
बुधवार, 21 जुलै 2021

प्रदेशाध्यक्षांच्या शक्तिप्रदर्शनामुळे मुख्यमंत्री गटाला धक्का बसला आहे.

चंदीगड : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच नवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्ष केल्याने त्यांच्यातील वाद आणखी वाढला आहे. आता काँग्रेसमधील काही आमदारही मुख्यमंत्र्यांविरोधात उघडपणे बोलू लागले आहेत. आगामी निवडणूक सिद्धू यांच्या नेतृत्वातच जिंकण्याचा दावा आमदार करत आहेत. (Punjab CM should apologise to public says Congress MLA)  

प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंत सिद्धू हे आक्रमक झाले असून, त्यांनी पक्षातील 62 आमदारांना घेऊन आज सुवर्णमंदिर गाठले. मुख्यमंत्री गटातील केवळ 15 आमदार हे त्यावेळी हजर नव्हते. सिद्धू यांच्या शक्तिप्रदर्शनामुळे मुख्यमंत्री गटाला धक्का बसला आहे. त्यातच यातील आतील काही आमदारांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. 

हेही वाचा : काँग्रेसचे नेतृत्व 2024 पर्यंत सोनिया गांधीच करणार

घनौरचे आमदार मदन लाल जलालपुर म्हणाले, '2022 ची निवडणूक सिद्धू यांच्यामुळेच जिंकू, असा मला विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांचे सल्लागार यांना चुकीचा सल्ला देत आहेत. त्यामुळं पंजाब विकासात पिछाडीवर पडत आहे.' तर जालंधरचे आमदार परगत सिंग यांनी थेट मुख्यमंत्र्यांनी माफी मागण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांवर सातत्याने टीका करणाऱ्या सिद्धू यांनी माफी मागावी, असे आवाहन मुख्यंत्र्यांच्या सल्लागारांनी केले होते. त्याला उत्तर देताना परगत सिंग म्हणाले, सिद्धू यांनी माफी का मागावी? मुख्यमंत्र्यांनी अनेक समस्यांची सोडवणूक केलेली नाही. त्यासाठी त्यांनीच माफी मागावी. 

दरम्यान, सिद्धू यांनी आज 62 आमदारांसह सुवर्णमंदिराला भेट दिली. काँग्रेसचे एकूण 77 आमदार असून, केवळ 15 आमदार या वेळी हजर नव्हते. यामुळे ते मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या गटातील असल्याचे मानले जात आहे. सिद्धू यांनी आज केलेल्या या शक्तिप्रदर्शनामुळे पंजाबमध्ये तेच कॅप्टन असल्याचे सिद्ध झाले आहे. पक्ष नेतृत्वाने सिद्धू यांना बढती देऊन मुख्यमंत्र्यांना शह दिल्याचे मानले जात आहे. पक्ष नेतृत्वाच्या वरदहस्तामुळे सिद्धू यांनी पक्षातील बहुतांश आमदार आपल्याकडे वळवून घेतले आहेत. 

हेही वाचा : भाजप ओबीसी मोर्चा; पंकजा मुंडेंना निमंत्रण देण्यास टिळेकर विसरले

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, आता सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते. 

पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांनी सिद्धू यांची पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. याचबरोबर चार कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात आले आहेत. हिंदू आणि दलित असा समतोल साधत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात संगतसिंग गिलझियान, सुखविंदरसिंग डॅनी, कुलजित नागरा आणि पवन गोयल यांचा समावेश आहे. 

पंजाबमधील अंतर्गत वाद विधानसभा निवडणुकीआधी पक्षाला परवडणारा नसल्याने नेतृत्वाने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपद मागितले होते. पक्षाने मात्र, त्यांना प्रचारप्रमुखाची जबाबदारी देण्याची तयारी दर्शविली होती. सिद्धू हे प्रदेशाध्यक्षपदावर ठाम होते. अखेर सिद्धू यांची मागणी पक्षाच्या नेतृत्वाने मान्य केली आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांना हटवले गेले आहे. सिद्धू यांच्यासोबत चार कार्यकारी अध्यक्ष दिले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख