काँग्रेसचे नेतृत्व 2024 पर्यंत सोनिया गांधीच करणार अन् तरुण चेहऱ्यांवर महत्वाची जबाबदारी? - sonia gandhi may continue as congress interim chief till 2024-sj84 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

काँग्रेसचे नेतृत्व 2024 पर्यंत सोनिया गांधीच करणार अन् तरुण चेहऱ्यांवर महत्वाची जबाबदारी?

वृत्तसंस्था
बुधवार, 21 जुलै 2021

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नसल्याने काँग्रेसने आता नवीन पर्यायावर विचार सुरू केला आहे. 

नवी दिल्ली : काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नसल्याने काँग्रेसने आता नवीन पर्यायावर विचार सुरू केला आहे. पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत सोनिया गांधी (Sonai Gandhi)  याच हंगामी अध्यक्ष म्हणून कायम राहतील आणि तरुण चेहऱ्यांना महत्वाची पदे दिली जातील, असा प्रस्ताव समोर आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पक्षाच्या नेत्यांकडून वारंवार मागणी होत असली तरी राहुल गांधी हे अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नाहीत. यामुळे पक्षात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सोनिया गांधी या 2024 च्या पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून कायम राहतील, असा प्रस्ताव समोर आला होता. आता नेतृत्वाने यावर गांभीर्याने विचार करण्यास सुरवात केली आहे. याचबरोबर पक्षातील तरुण नेतृत्वाला महत्वाच्या पदांवर संधी दिली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पुढील लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत. यात तरुण नेतृत्वाला जास्तीत जास्त संधी दिली जाईल. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मदत करण्यासाठी कार्यकारी अध्यक्ष नेमले जातील. यासाठी गुलाम नबी आझाद, सचिन पायलट, कुमारी शैलजा, मुकुल वासनिक आणि रमेश चेन्निथला यांची नावे आघाडीवर आहेत. प्रियांका गांधी यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी असल्याने त्यांच्याकडील सरचिटणीसपद कायम राहील. मात्र, त्यांच्यावर कोणतीही नवीन जबाबदारी सोपवली जाणार नाही, असे सूत्रांनी नमूद केले. 

काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दोन वर्षांपूर्वी राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. अध्यक्षपदाच्या निवडीबाबत  जानेवारी महिन्यात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली होती. या बैठकीत अध्यक्षपदाची निवडणूक जून महिन्यात घेण्याचा निर्णय झाला होता. यानंतर जून महिन्यात काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक झाली. यात 23 जूनला होणारी अध्यक्षपदाची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना संकटामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचे कार्यकारी समितीने म्हटले होते. 

हेही वाचा : राजस्थानमध्ये पंजाब फॉर्म्युला...सिद्धू यांच्याप्रमाणेच पायलट यांना प्रदेशाध्यक्षपद? 

मागील लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला होता. शेवटी सोनिया गांधी यांनाच पुन्हा हंगामी अध्यक्ष म्हणून काम सुरू करावे लागले. पक्षाला अद्याप पुर्णवेळ अध्यक्ष न मिळाल्याने काही नेत्यांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. सतत बैठका होऊनही कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होत नाही. त्यामुळे पक्षांतर्गत मरगळ दिसून येत आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख