उपमुख्यमंत्र्यांच्या पुत्राचे शशिकलांना सदिच्छा देणारे ट्विट; अण्णाद्रमुकमध्ये फुटीची बीजे

शशिकला यांची तब्बल चार वर्षांनंतर कारागृहातून सुटका झाली आहे. मात्र, त्यांच्या सुटकेने सत्ताधारी अण्णाद्रमुकमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
paneerselvam son tweeted for speedy recovery of v k sasikala
paneerselvam son tweeted for speedy recovery of v k sasikala

चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांची तब्बल चार वर्षांनतर कारागृहात सुटका झाली आहे. त्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तमिळनाडूत परतणार आहेत. शशिकलांना सदिच्छा देणारे ट्विट खुद्द अण्णाद्रमुकचे समन्वयक व उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्या पुत्राने केले आहे. यावरुन मोठा गदारोळ सुरू झाला असून, आता अण्णाद्रमुकने शशिकलांबद्दल बोलण्यावरही नेत्यांना बंदी घातली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात होत्या. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची 27 जानेवारीला सुटका झाली आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने बंगळूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना दोन दिवसांत रुग्णालयातून सोडले जाण्याची शक्यता आहे. त्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तमिळनाडूत परततील. 

शशिकलांच्या सुटका होण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा धसका मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. 

शशिकलांची सुटका झाल्यानंतर अण्णाद्रमुक पक्षात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. शशिकलांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या लवकर बरे व्हाव्यात, अशी सदिच्छा करणारे ट्विट पनीरसेल्वम यांचे पुत्र व्ही.पी.जयप्रदीप यांनी केले आहे. यावरुन पक्षात मोठा गदारोळ सुरू झाला आहे. हे ट्विट माणुसकीच्या भावनेतून केल्याचा प्रतिवाद करण्यात येत आहे. यानंतर पक्षाच्या सर्व नेत्यांना शशिकलाबद्दल बोलण्यास बंदी घातलण्यात आली आहे. 

शशिकला मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, नंतर कारागृहात जाण्याआधी त्यांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यामुळे पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. नंतर दोघांमध्ये समेट होऊन ते शशिकलांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांनी शशिकला तुरुंगात असताना त्यांची आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com