चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांची तब्बल चार वर्षांनतर कारागृहात सुटका झाली आहे. त्यांच्या सुटकेमुळे अण्णाद्रमुक पक्षामध्ये सध्या अस्वस्थता वाढली आहे. शशिकलांची सुटका झाल्याने त्यांचे स्वागत करणे पक्षाच्या दोन नेत्यांना चांगलेच महागात पडले आहे. या दोन्ही नेत्यांची तातडीने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात होत्या. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची 27 जानेवारीला सुटका झाली.
शशिकलांची सुटका झाल्यानंतर अण्णाद्रमुक पक्षात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. शशिकलांच्या सुटकेनंतर त्यांच्या स्वागतासाठी दोन नेत्यांनी बॅनरबाजी केली होती. अण्णाद्रमुकचे पदाधिकारी पुलियार आर.अण्णादुराई यांनी त्रिचीमध्ये बॅनर लावले होते. यात अण्णादुराई यांनी या बॅनरमध्ये शशिकलांचा उल्लेख अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस असा केला होता. याचबरोबर पक्षाचे आणखी एक पदाधिकारी सुब्रह्मण्यम राजा यांनी तिरुनेलवेल्लीमध्ये शशिकलांच्या स्वागताचे बॅनर लावले होते.
या सर्व प्रकाराची गंभीर दखल पक्ष नेतृत्वाने घेतली आहे. अण्णादुराई आणि राजा यांची तातडीने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या दोन्ही नेत्यांशी पक्षाच्या इतर नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कोणताही संबंध ठेवू नये, अशी तंबीही देण्यात आली आहे.
या प्रकरणी अण्णाद्रमुकचे समन्वयक व उपमुख्यमंत्री सी. पनीरसेल्वम आणि मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी यांनी एक निवेदन जाहीर केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, या नेत्यांनी पक्षाची उद्दिष्ट्ये आणि तत्वांच्या विरोधात आचरण केले आहे. त्यांना पक्षाची अप्रतिष्ठा केली आहे. यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून, त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.
शशिकलांची सुटका अन् मुख्यमंत्र्यांनी मारले एकाच दगडात दोन पक्षी!
शशिकलांच्या सुटका होण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा धसका मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली आहे.
कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी जाण्याआधी शशिकलांनी विश्वासू सहकारी असलेले पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रिपदी बसवले होते. नंतर तेच शशिकलांच्या विरोधात गेले. आता त्यांनी थेट शशिकलांना आव्हान दिले आहे. नुकतेच पलानीस्वामी म्हणाले होते की, शशिकलांना आम्ही अण्णाद्रमुध्ये प्रवेश देणार नाही. शशिकला म्हणजे काय पक्ष आहेत का? त्यांच्या सुटकेने काहीही फरक पडणार नाही. शशिकलांचे भाचे टी.टी.व्ही. दिनकरन यांच्या पक्षातील बहुतांश नेते आता अण्णाद्रमुकमध्ये परतले आहेत.
Edited by Sanjay Jadhav

