शशिकलांकडील 1 हजार 911 कोटी रूपये बेनामी मालमत्ताच; अडचणीत होणार आणखी वाढ

शशिकला यांची तब्बल चार वर्षांनंतर कारागृहातून सुटका झाली आहे. मात्र, शशिकलांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
income tax department says sasikala used demonetised notes for property purchase
income tax department says sasikala used demonetised notes for property purchase

चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांची तब्बल चार वर्षांनतर कारागृहात सुटका झाली आहे. मात्र, त्यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत. माजी मुख्यमंत्री जयललिता आणि शशिकलांच्या संयुक्त मालकीच्या चेन्नई आणि निलगिरीतील कोदंड इस्टेटमध्ये बॉक्समध्ये 1 हजार 911 कोटी रुपये ठेवण्यात आले होते. यात नोटाबंदीच्या आधीच्या पाचशे व हजारच्या नोटा होत्या आणि त्यांचा वापर मालमत्ता खरेदीसाठी करण्यात आल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. 

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात होत्या. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची 27 जानेवारीला सुटका झाली आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने बंगळूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना दोन दिवसांत रुग्णालयातून सोडले जाण्याची शक्यता आहे. 

नोटाबंदीनंतर शशिकला यांनी चेन्नईतील पेरम्बूर येथील स्पेक्ट्र मॉल खरेदीसाठी 130 कोटी रुपयांच्या रद्द नोटांचा वापर केला होता. या प्रकरणी प्राप्तिकर विभागाने त्यांच्यावर बेनामी मालमत्ता कायद्यांगर्तत गुन्हा दाखल केला आहे. शशिकलांची वकिलांना याला आक्षेप घेत या नोटा रद्द झालेल्या असल्याने बेनामी मालत्ता कायदा लागू होत नाही, अशी भूमिका घेतली आहे. 

यावर प्राप्तिकर विभागाने न्यायालयात म्हणणे मांडले आहे. प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे की, शशिकला या नोटाबंदीच्या आधीपासून मालमत्ता खरेदी करण्यासाठी शोधत होत्या. नोटाबंदी 8 नोव्हेंबर 2016 रोजी होऊन पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून रद्द झाल्या. परंतु, या नोटा बदलण्यासाठी 20 डिसेंबर 2016 पर्यंत मुदत होती. यामुळे त्यांनी मॉल खरेदीसाठी जुन्या नोटांच्या माध्यमातून व्यवहार केला असला तरी ती बेनामी मालमत्ताच ठरते. 

शशिकलांच्या सुटका होण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा धसका मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. 

कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी जाण्याआधी शशिकलांनी विश्वासू सहकारी असलेले पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रिपदी बसवले होते. नंतर तेच शशिकलांच्या विरोधात गेले. आता त्यांनी थेट शशिकलांना आव्हान दिले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com