संसदेचा वेळ वाया जात असल्याने आठवले संतापले! केली ही महत्वाची मागणी

अधिवेशनादरम्यान एकही दिवस संसदेचे कामकाज पूर्ण दिवस चाललेले नाही.
संसदेचा वेळ वाया जात असल्याने आठवले संतापले! केली ही महत्वाची मागणी
Minister Ramdas Athawale demands suspension of MPs

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सलग नवव्या दिवशीही विरोधकांनी गोंधळ घातल्याने कामकाजात सतत अडथळे आले. अधिवेशनच्या आदल्यादिवशीच पेगॅसस (Pegasus) स्पायवेअरचे प्रकरण बाहेर आल्यानंतर विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. त्यावरून मागील आठवड्यात राज्यसभेत रणकंदन झालं होतं. तर अधिवेशनाच्या आठव्या दिवशीही असंच दृश्य लोकसभेत पाहायला मिळालं. नवव्या दिवशीही विरोधकांची हा मुद्दा उचलून धरत कामकाज बंद पाडलं. (Minister Ramdas Athawale demands suspension of MPs)

अधिवेशनादरम्यान एकही दिवस संसदेचे कामकाज पूर्ण दिवस चाललेले नाही. यावरून सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले संतापले आहेत. त्यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त करत महत्वाची मागणी केली आहे. 'संसदेचे कामकाज रोखणे अक्षम्य गुन्हा आहे. संसदेचा बहुमूल्य वेळ वाया घालवून देशाचा पैसा वाया जातो. संसदेचे कामकाज रोखल्यामुळे देशाचे नुकसान होते,' असे आठवले म्हणाले आहेत. 

संसदेचे कामकाज रोखणाऱ्या खासदारांवर कारवाई करण्याबाबत कायदा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. सत्ताधारी पक्षांतील गोंधळी खासदारांवरही ही कारवाई व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. 'सलग चार दिवसांपेक्षा जास्त काळ  गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखणाऱ्या खासदारांना दोन वर्षांसाठी  निलंबित करण्याचा कायदा करावा. सरकार पक्षाचा खासदार असो अथवा विरोधी पक्षाचा खासदार असो सर्व खासदारांना हा नियम लागू करावा, असं आठवले यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

दरम्यान, पेगॅसस प्रकरणावरून चर्चेची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली करण्याची मागणीही विरोधकांनी केली आहे. पण सरकारकडून या मुद्यावर चर्चेला नकार देण्यात आला आहे. त्यावरून बुधवारी विरोधकांनी लोकसभेत जोरदार घोषणाबाजी केली. तर दहा खासदारांनी संसदेतच कागद फाडत लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने भिरकावले. 

या प्रकारावरून भाजपनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. कागद फाडणाऱ्या दहा खासदारांचे निलंबन करण्याचा प्रस्ताव सरकारकडून आणला जाण्याची शक्यता आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास दहा खासदारांना अधिवेशनात सहभागी होता येणार नाही. या खासदारांमध्ये टी. एन. प्रतापन, हिबी ईडन, रवनीत सिंह बिट्टू, गुरजीत सिंह औजला, मणिकम टागोर, दीपक बैज, ए. एम. आरिफ, डीन कुरियाकोस, ज्योतीमणी, सप्तगिरी उलाका यांचा समावेश आहे. 

मागील आठवड्यातच एका खासदाराचे निलंबन

मागील आठवड्यात पेगॅससच्या मुद्यावरूनच एका खासदाराचे निलंबन करण्यात आले आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून या प्रकरणावर निवेदन सादर केले जात असताना तृणमूलचे खासदार शंतनु सेन यांनी राज्यसभेत त्यांच्या हातातील कागद हिसकावून घेतले. हे कागद फाडत त्यांनी हवेत भिरकावून दिले होते. या प्रकारानंतर सेन यांना निलंबित करण्यात आले आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in